24 September 2020

News Flash

जाफर गुलाम मन्सूरी

मुंबईत ठिकठिकाणी मिळणारी ‘जाफरभाईज् दिल्ली दरबार’ची बिर्याणी अनेकांना माहीत असेल..

जाफर गुलाम मन्सूरी

 

मुंबईकर आणि मुंबईत नुकतेच थडकलेले  लोक अशा साऱ्यांनाच ज्या संधी मुंबईने दिल्या, त्या अमर्याद संधींचे सोने करणाऱ्या अनेकांपैकी जाफरभाई हे एक. मुंबईत ठिकठिकाणी मिळणारी ‘जाफरभाईज् दिल्ली दरबार’ची बिर्याणी अनेकांना माहीत असेल.. त्यातील ‘जाफरभाई’ ते हे! त्यांच्या निधनाने मुंबईतीलच नव्हे तर दिल्ली, दुबईतील खवय्ये आणि खाद्यसमीक्षक हळहळले असतील. पण जाफरभाई हे मुंबईने एखाद्या बिनमहत्त्वाचा ठरणाऱ्या स्वयंरोजगारिताला किती संधी दिली, याच्या कहाणीचेही एक नायक ठरतात.

त्यांचे वडील गुलाम मन्सूरी हेदेखील बावर्ची- आचारी होते. मुगलाई पद्धतीचे पदार्थ बनवीत. मुंबईत आले, ग्रँट रोडला लतिफउल्ला या इसमाच्या चहाच्या दुकानात २५ टक्के भागीदारी घेऊन त्यांनी तेथे खाण्याचे पदार्थ सुरू केले. गुलाम मन्सूरी यांची खासियत बिर्याणीच. पण १९४९ मध्ये लतिफउल्ला पाकिस्तानात गेले आणि १९५२ साली गुलाम मन्सूरी यांचे निधन झाले. त्यांच्या तिघा मुलांपैकी मोठे जाफरभाई, मुंबईच्या केसी महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होते. आईने ‘तूच दुकान चालव’ असा धोषा लावल्यामुळे अखेर जाफरभाईंचे शिक्षण सुटले. पण मुंबईत ‘बीकॉम’ होऊन त्या वेळी लिखापढीची कामे करणाऱ्या मध्यमवर्गाचा जो आब होता, तो जाफरभाईंनी पदवी न घेताही वागण्याबोलण्यातून जपला. वडिलांचे मदतनीस, मूळचे रत्नागिरीचे याकूबखान यांच्याकडून जाफरभाईंनी मुगलाई खाद्यपदार्थ शिकून घेतले. त्यातही दिल्ली व लखनऊ पद्धतीच्या चवींत प्रावीण्य मिळवले. अखेर १२ वर्षांत, १९६४ मध्ये त्या उपाहारगृहाची संपूर्ण मालकी जाफरभाईंनी घेतली! पण ‘दिल्ली दरबार’ हा टप्पा दूरच होता. ग्रँट रोडच्या काहीशा बदनाम वस्तीमध्ये त्यांनी १९७३ मध्ये एक जागा घेतली आणि तिथे केवळ ‘दिल्ली दरबार’साठीच जाणारे खाद्यप्रेमी वाढले.

कुलाब्यातले दिल्ली दरबार मुंबईस पर्यटक म्हणून येणाऱ्यांनाही माहीत असते, तेही जाफरभाईंनीच १९७६ मध्ये सुरू केले. याच काळात ऑर्डरप्रमाणे खाद्यपदार्थ पुरवण्याची सेवाही त्यांनी वाढवली. ती एवढी की आज भायखळय़ात, दहा हजार ताटे एका दिवसात भरू शकतील एवढय़ा क्षमतेचा खाद्यकारखानाच ‘जाफरभाई’ हे नाव लावतो. ‘जाफरभाईंची बिर्याणी’ ही नाममुद्रा आज मुंबईच्या कोणत्याही उपनगरात दिसू शकते. ते धार्मिक प्रवृत्तीचे होते. इंग्रजी खाद्यपत्रकारांनी ज्या ऋ जू स्वभावासाठी जाफरभाईंची तारीफ नेहमीच केली, त्यामागे मात्र त्यांना गालिब, फैज, अहमद फराज्म आदींच्या काव्याची असलेली आवड, हे कारण असावे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 12:01 am

Web Title: jafar ghulam mansoori abn 97
Next Stories
1 यिरी मेंझेल
2 डॉ. रवींद्रनाथ टोणगांवकर
3 मीना देशपांडे
Just Now!
X