14 August 2020

News Flash

कमल शेडगे

देवनागरी सुलेखन आणि टायपोग्राफीचे प्रयोग महाराष्ट्रात करून मराठीजनांना अक्षरांच्या सौष्ठव आणि  ‘सांगतेपणा’चे भान शेडगे यांनी दिले.

कमल शेडगे

मकबूल फिदा हुसेन, एस. एच. रझा, सदानंद बाक्रे आदी ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’द्वारे भारतीय कलेचा आधुनिक इतिहास घडवणारे चित्रकार आणि कमल शेडगे यांच्यात एक साम्य आहे : ‘प्रोग्रेसिव्ह’ चित्रकारांना प्रोत्साहन देणारे तत्कालीन चित्रकार आणि एका बडय़ा इंग्रजी वृत्तपत्राचे ‘आर्ट डायरेक्टर’ वॉल्टर लँगहॅमर यांनीच, कमल शेडगे यांचेही गुण पहिल्यांदा हेरले होते! कमल शेडगे यांनीही इतिहास घडवलाच; पण अक्षरकार म्हणून. देवनागरी सुलेखन आणि टायपोग्राफीचे प्रयोग महाराष्ट्रात करून मराठीजनांना अक्षरांच्या सौष्ठव आणि  ‘सांगतेपणा’चे भान शेडगे यांनी दिले.

अक्षरांचे निरनिराळे आकार मराठीत शेडगेंच्या पूर्वीही होते. ‘लोकसत्ता’ हे शीर्षनाम (मास्टहेड) करणाऱ्या दीनानाथ दलालांची अक्षरे किंवा रघुवीर मुळगावकरांची प्रासादिक- जणू देव्हाऱ्यातूनच खाली उतरलेली- अक्षरे ही त्याची साक्ष देतात. पण ‘इतिहास घडवणारे कलावंत आपापल्या काळातल्या संधींवर स्वार होऊन स्वगुणांनी मोठा पल्ला गाठतात’ हे देवनागरी अक्षरांच्या बाबतीत  कमल शेडगे यांच्याकडून झाले. ‘जेजे कला महाविद्यालया’च्या उपयोजित कला विभागात शिकलेले र. कृ.  जोशी हे शेडगे यांचे समकालीन, जाणकार सुलेखनकार आणि पुढे संगणकावर आज सर्रास वापरला जाणारा ‘मंगल’ हा टंक (फॉण्ट) बनवणारे अक्षरकार. याउलट कमल शेडगे हे कलाशाळेत न गेलेले, वडीलही वृत्तपत्र-मासिकांत ‘आर्टिस्ट’ या पदावर असल्याने त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालेले आणि संगणकात अखेपर्यंत गम्य नसलेले. पण आज ‘लोकसत्ता’ची अग्रलेखादी शीर्षके ज्या भारदस्त चौकोनी टंकात असतात, त्याचीही मूळ बीजे कमल शेडगे यांनी ‘गगनभेदी’ नाटकाच्या केलेल्या जाहिरातीत शोधावी लागतात.

काम करणे- सतत, मनापासून, विचारपूर्वक काम करणे- हा शेडगे यांच्या यशाचा मंत्र होता. त्यांच्या अक्षरकलाकृतींची प्रदर्शने १९७९ पासून अनेकदा भरली असली, तरी ते निव्वळ या प्रदर्शनांसाठी काम करणारे नव्हते. वृत्तपत्रासाठी, प्रसंगी त्याच वृत्तपत्र समूहातील हिंदी-इंग्रजी नियतकालिकांसाठी, दिवाळी अंकासाठी आणि मुख्य म्हणजे शेकडो नाटकांच्या जाहिरातींसाठी काम त्यांनी केले. हे सारे काम उपयोजित स्वरूपाचे. नाटकाची जाहिरात विश्वासाने त्यांना देणारे- आणि पुढे किमान ८० नाटकांच्या जाहिराती शेडगेंकडूनच करून घेणारे- दिवंगत नाटय़निर्माते मोहन वाघ हेही दृश्यभाषेत विचार करू शकणारे (नेपथ्यकार) असल्याचा उपयोग झाला असेलही. पण अनेक नाटय़संस्थांचा आधार असलेले शेडगे हे अक्षराकारांना आरपार जाणणारे होते. लिहिलेल्या शब्दाचा अर्थ, अन्वय अक्षरातून पोहोचवायचा आहे याची पक्की समज असलेले होते.

कमल शेडगे निवर्तले आणि ही अक्षरे उरली.. ‘वपु’, ‘लता’ यांना व्यक्तिरेखाटनांचेही रूप शेडगे यांनी दिले. ‘शुभमंगल सावधान’च्या अनुस्वाराला अक्षता, तर ‘नागमंडल’च्या अनुस्वारात फणा काढणारे शेडगे आता त्यांच्या मराठी/ हिंदी नाटक/ चित्रपटांच्या नावांच्या अक्षरांतून आणि त्यांच्या तीन पुस्तकांतून कायमचे स्मृतीत राहतील!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 12:01 am

Web Title: kamal shedge profile abn 97
Next Stories
1 सर एव्हर्टन वीक्स
2 गीता नागभूषण
3 स्क्वॉड्रन लीडर परवेझ जामस्जी (निवृत्त)
Just Now!
X