13 December 2019

News Flash

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे

नरवणे हे मूळचे पुण्याचे. त्यांचे शालेय आणि प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले.

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे

भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती झाली आहे. लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे नरवणे हे सेवा ज्येष्ठतेनुसार लष्कर प्रमुखपदाच्या स्पर्धेतील प्रमुख दावेदार आहेत. जगातील बलाढय़ लष्करांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतीय लष्करात १३ लाख अधिकारी-जवानांचा फौजफाटा आहे. उपप्रमुख म्हणून नेतृत्व करताना त्यांना ३७ वर्षांतील सेवेचा अनुभव कामी येईल.

नरवणे हे मूळचे पुण्याचे. त्यांचे शालेय आणि प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० मध्ये लष्करात दाखल झाले. शीख लाईट इन्फ्रंट्रीमधून त्यांच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लष्कराच्या विविध विभागांत पुढे त्यांना काम करण्याची संधी मिळाली. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महुस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. दहशतवाद, फुटीरतावाद विरोधातील कारवायांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. दोन वर्षांपूर्वी प्रजासत्ताक दिन संचलनाचे नेतृत्व त्यांनी केले. नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली. परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. खडतर लष्करी सेवेत रमलेल्या नरवणे यांना बागकामाचीदेखील आवड आहे. लष्करी हद्दीत उद्यान, वाहतूक बेटांच्या सौंदर्याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाते. योगासने हा त्यांच्या दिनक्रमातील महत्त्वाचा भाग. लष्करी सेवेत त्यांनी ही आवड जोपासली.

बदलत्या परिस्थितीत लष्करासमोरील आव्हाने बदलत आहेत. लष्कराचे आधुनिकीकरण प्रगतिपथावर आहे. लष्कर उपप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळताना नरवणे हे आपले कर्तृत्व सिद्ध करतील, हे निश्चित.

First Published on July 24, 2019 12:03 am

Web Title: lieutenant general manoj naravane profile abn 97
Just Now!
X