जगातील हवामानबदलांचा प्रश्न सोडवायचा असेल तर या क्षेत्रात गांधींसारखे नेतृत्व करणारा कुणी तरी आला पाहिजे, इथपासून ते ज्यांना डार्विनचा सिद्धांत खरा असो वा खोटा मान्यच नाही त्यांच्यापुढे हवामानाच्या प्रश्नावर डोकेफोड करण्यात काहीच अर्थ नाही, अशी टोकाची विधाने करणारे हवामान वैज्ञानिक म्हणजे हान्स जोआकिम शेलह्य़ुबर. पृथ्वीच्या तापमानातील वाढ आता दोन अंशांच्या आत रोखायला हवी, असे आपण अनेकदा वाचले असेल, तर हा आकडा प्रथम ज्यांच्या संशोधनातून पुढे आला ते म्हणजे शेलह्य़ुबर. त्यांना नुकताच टोकियो येथे ‘दी  ब्लू प्लॅनेट पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

सध्या बॉन येथे पॅरिस हवामान कराराचा पाठपुरावा करण्यासाठी परिषद सुरू आहेच. अमेरिकेने पॅरिस करारातून माघार घेतल्यामुळे सगळे जण त्या देशाच्या भूमिकेकडे डोळे लावून बसले आहेत. शेलह्य़ुबर यांच्या मते ओबामांसारख्या नेतृत्वाने या प्रश्नाला जेवढे महत्त्व दिले तेवढे कुणीच दिले नाही. त्यांना नुकताच देण्यात आलेला असाही ग्लास फाऊंडेशनचा ब्लू प्लॅनेट पुरस्कार ५० दशलक्ष येनचा आहे.  हवामानबदलाच्या विषयास एक विज्ञान शाखा म्हणून नावारूपास आणण्यात शेलह्य़ुबर यांचा मोठा वाटा आहे. जर्मनीतील पोटसडॅम इन्स्टिटय़ूट ऑफ क्लायमेट रीसर्च या संस्थेचे ते संचालक आहेत. हवामानबदलासारख्या मुद्दय़ांवर उपाययोजनांसाठी त्यांनी जर्मनीत प्रसंगी राजकीय नेत्यांशी वादही घातले आहेत. लोकांना त्यांच्या सवयी बदलण्यासाठी जरा धाकदपटशाच केला पाहिजे अशी थोडीशी लोकशाही मार्गाच्या विरोधी जाणारी भाषा ते बोलत असले तरी  त्यांच्या अधिकारवाणीने कान उपटण्याचा कुणाला रागही येत नाही. जपानचे हवामान धोरण ठरवण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.  ते कॅलिफोर्निया विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकशास्त्र संस्थेत डॉक्टरेटनंतरचा अभ्यास करीत होते. त्या वेळी सांता बार्बरा येथे उन्हाळा फार कडक होता. त्यावर त्यांनी अभ्यास केला. तेथील हवामान बऱ्यापैकी स्थिर होते. इतरत्र मात्र कधी बर्फ तर कधी कडक उन्हाळा अशी टोकाची स्थिती होती. त्यामुळे त्यांनी हवामानाचा अभ्यास जो सुरू केला तो कायमचाच. ते जर्मनीच्या चॅन्सेलरचे सल्लागारही होते. १९९२ मध्ये त्यांनी हवामानबदलांचा अभ्यास करण्यासाठी ‘पॉट्सडॅम इन्स्टिटय़ूट फॉर क्लायमेट रीसर्च’ ही संस्था स्थापना केली. हवामान प्रणालीतील अरेषीय गतिकीचा गुंतागुंतीचा अभ्यास त्यांनी मांडला. हवामानबदलांचा प्रश्न जागतिक पातळीवर नेण्यात त्यांना पोप फ्रान्सिस यांची मदत झाली होती. संगणकीय सादृश्यीकरणाच्या मदतीने त्यांनी अतिशय विश्वासार्ह व वास्तववादी असे काही निष्कर्ष काढले होते. २०१३ मध्ये त्यांनी ‘एक्सपांडिंग दी डेमोक्रॅसी युनिव्हर्स’ या शोधनिबंधात असे म्हटले होते की, जग आर्थिक प्रगती व व्यक्तिगत साधनसंपत्तीच्या मागे लागले आहे; पण पृथ्वीवरील साधनसंपत्ती संपून गेल्यावर आपला ग्रह राहण्यास योग्य राहणार नाही. त्याचे अस्तित्वच धोक्यात येईल. २ ते ४ अंश सेल्सियसचा फरक पृथ्वीच्या तापमानात पडला तर आपल्या जागतिक समुदायातील समाज संपन्न सांस्कृतिकतेकडून विनाशाकडे केव्हा जाईल हे कळणार नाही, असा धोक्याचा इशारा त्यांनी देऊन ठेवला आहे तो विसरून चालणार नाही.