मल्याळम् चित्रपटसृष्टीला वर्तमानाचे भान देणारे आय. व्ही. ससी यांनी अनेक नवे विषय केवळ मल्याळम्मध्ये नव्हे, तर भारतीय चित्रपटांमध्ये आणले. अगदी आतादेखील त्यांनी ‘बर्निग वेल’ या चित्रपटाची तयारी सुरू केली होती.. समुद्रातील तेलविहिरीला आग लागते, या पाश्र्वभूमीवर तो चित्रपट होता. त्याच्या अभ्यासासाठी आखाती देशांतही ते जाऊन आले होते आणि तंत्रदृष्टय़ा आपला हाही चित्रपट उच्च दर्जाचाच असेल, अशी ग्वाही देत होते. पण अखेर, त्यांच्या अनेक आजारांनी त्यांना थकविले आणि मंगळवारी, वयाच्या अवघ्या ६९ व्या वर्षी त्यांना मृत्यूने गाठले.

‘पतिता’ हा मिथुन चक्रवर्तीची भूमिका असलेला चित्रपट १९८० साली त्यांनी ‘हिट’ करून दाखवला. त्या वर्षी दहा कोटी रुपयांचा गल्ला ‘पतिता’ने जमविला होता. ‘अनोखा रिश्ता’ (१९८६) हा त्यांचा दुसरा हिंदी चित्रपटही चालला, पण तिसरा ‘पुलीस की जंग’ (१९९५) मात्र टुकार निघाला. काही उत्तम, काही बरे असे देत राहणाऱ्या या दिग्दर्शकाची खरी कारकीर्द घडली ती मल्याळम्मध्येच!

आज इरप्पम् वीडु शशिधरन् हे त्यांच्या नावाचे पूर्णरूप अन्य दाक्षिणात्य नावांप्रमाणेच कुणाला माहीत नसेल, त्यांनी चार दशकांत सुमारे दीडशे चित्रपट दिग्दर्शित केले हेही केरळबाहेर फारसे ज्ञात नसेल..  पण केरळच्या कोळिकोड जिल्ह्यातील कुठल्याशा खेडय़ात २८ मार्च १९४८ रोजी जन्मलेल्या ‘ससी’ यांचा ‘हर नाइट्स’ (मल्याळम् : ‘अवलुदे रावुकाल’) हा चित्रपट १९७० च्या दशकात चित्रपटांबद्दल सजग असलेल्या प्रत्येक भारतीयाला माहीत होता. परिस्थितीवशात देहविक्रय करणाऱ्या एका तरुणीचे वास्तव टिपणारा तो चित्रपट! मल्याळम् भाषेत तोवर एकाच चित्रपटाला ‘फक्त प्रौढांसाठी’ प्रमाणपत्र मिळाले होते आणि ‘अवलुदे रावुकाल’ हा दुसरा. या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू असतानाच त्यांना ‘सीमा’ (लग्नापूर्वीचे नाव शांती) ही नवी नायिका सापडली. त्यांनी तिला हेरले, तेव्हा ती कनिष्ठ कलाकार होती, मैत्रिणीसह स्टुडिओतच डबा खात बसली होती! पुढे हीच सीमा, त्यांची पत्नी झाली आणि या दाम्पत्याने ३० चित्रपट केले. चाळिशीपार झालेल्या सीमासह त्यांना ‘हर नाइट्स’चा उत्तरायुष्याचा भागही करायचा होता. अशीच दीर्घकालीन भागीदारी त्यांनी ज्ञानपीठचे मानकरी ठरलेले मल्याळम् लेखक एम टी वासुदेवन नायर यांच्यासह केली. नायर स्वत:देखील चित्रपट दिग्दर्शन करीत, पण त्यांनी लिहिलेले सर्वाधिक चित्रपट ससी यांनी दिग्दर्शित केले आहेत. पद्मराजन आणि टी. दामोदरन या लेखकांनीही अशीच साथ ससी यांना दिली. आजचा यशस्वी अभिनेता माम्मुटी याला १९८१ साली पहिल्यांदाच ‘नायक’पद मिळाले ते ससी यांच्याच ‘तृष्णा’ या चित्रपटात. त्यानंतर दोनच वर्षांनी, ससी यांच्या १९८३ सालच्या एका चित्रपटात आणखी एक नवा अभिनेता नायक झाला.. चित्रपट होता ‘इनियेंकुलम’ आणि हा नायक होता.. मोहनलाल!

हा असा इतिहास घडवीत असतानाही ससी कायम पुढल्या चित्रपटात गर्कच असत. एकाच वेळी तीन-चार चित्रपटही करण्याचा झपाटा १९८० च्या दशकात त्यांनी दाखवला होता. पण २००९ पर्यंत त्यांना रक्तदाब, मधुमेह या नकोशा साथीदारांनी गाठले होते. त्यातच हृदयविकाराचा एक झटकाही येऊन गेला होता. मात्र २०१४ सालचा ‘जे सी डॅनियल पुरस्कार’ हा केरळ राज्यातर्फे चित्रपटकर्मीना दिला जाणारा सर्वोच्च कारकीर्द-गौरव पुरस्कार स्वीकारताना ते पुन्हा खुलले होते. ‘आणखी बरेच करायचे आहे’ हे त्यांचे पालुपद कायम होते. अर्थात, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी केलेले बरेच काही उरले आहे.