सामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत संघर्ष करून, त्यांना न्याय कसा मिळेल याच ध्यासाने समाजकारण- राजकारणात अनेक जण काम करतात. त्यात फायदा-तोटय़ाचा विचार नसतो. अशांपैकीच एक सोलापूरचे ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातून विधानसभेवर तीनदा निवडून गेलेल्या आडम मास्तरांना नुकतेच ‘कामगारमहर्षी गं. द. आंबेकर जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एके काळी गिरणगाव अशी ओळख असलेल्या सोलापूरमध्ये गिरणी कामगारांची मोठी ताकद होती. नरसय्या आडम यांचे वडील नारायण हे गिरणी कामगार तर आई विडी कामगार. त्यामुळे बेताची घरची परिस्थिती असल्याने त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. पुढे मग कुटुंबाला हातभार लागाला यासाठी ते एखाद्या दुकानाचे हिशेब लिहू लागले, मुलांच्या शिकवण्या घेऊ लागले. त्यातून ते ‘आडम मास्तर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

खडा आवाज, उत्तम संघटनकौशल्य व प्रश्न समजून घेण्याची हातोटी यामुळे सूतगिरणी असो वा यंत्रमाग किंवा विडी कामगार त्यांना आडम यांनी लालबावटय़ाखाली संघटित केले. त्यातून नेतृत्व पुढे आले. पुढे १९७४ मध्ये कामगार वस्तीतून सोलापूर महापालिकेवर ते विजयी झाले. पुढे १९७८ मध्ये ते विधानसभेवर गेले. त्यानंतर १९९५ व २००४ असे तीन वेळा ते आमदार झाले. असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी विधानसभेत आवाज उठवला. या कामाची पावती म्हणून आदर्श लोकप्रतिनिधीचा बहुमान त्यांना मिळाला. एकीकडे संघर्षांतून मागण्या मान्य करून घेताना रचनात्मक कामातून सोलापूरमध्ये दहा हजार महिला विडी कामगारांसाठी कॉ. गोदाताई परुळेकर घरकुलाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला. त्याच्या लोकार्पणासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आले होते. आता त्यांनी पंतप्रधान आवास योजनेतून असंघटित कामगारांसाठी तीस हजार घरकुले उभारण्याची योजना हाती घेतली आहे. त्याला केंद्र व राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे.

chhagan bhujbal uddhav thackeray narendra modi
उद्धव ठाकरेंसाठी महायुतीचे दरवाजे खुले? पंतप्रधानांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, “राजकारणात आजचा शत्रू…”
Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट

कामगार चळवळीत काम करताना साम्यवादी विचारधारेशी तडजोड न करता सतत संघर्ष करणे हे आडम मास्तरांचे वैशिष्टय़. पूर्वी सायकलवरून फिरणारे आडम आता रिक्षातून फिरतात हाच काय तो त्यांच्यात झालेला बदल. कसलाही डामडौल नाही. निवडणुकीतील यशापयशाचा त्यामागे विचार नाही. आज कामगार चळवळीला हादरे बसत असताना त्यांच्यासारख्या व्यक्ती सामान्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. सिटू या माकपच्या कामगार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे आहे. तसेच माकपच्या राज्य सचिवपदाची जबाबदारी २००४ पासून त्यांच्याकडे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. तरीही आडम मास्तर तितक्याच तडफेने आजही कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत आहेत.