भूतकाळ आणि वर्तमानाबरोबरच भविष्यातील संगीताचा वेध घेण्याची क्षमता असणारा संगीतकार म्हणून नरेंद्र भिडे हे नाव मराठी चित्रपटसृष्टीला परिचित आहे. केवळ संगीतकार म्हणून काम करतानाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा ध्वनिमुद्रणाचा स्टुडिओ उभा करण्याची जिद्द त्यांनी बाळगली आणि ती पूर्णत्वालाही नेली. त्याचा सर्वात मोठा फायदा मराठी चित्रपटसृष्टीला झाला. याचे कारण मुंबईतील असे सुसज्ज स्टुडिओ मराठी चित्रपटांसाठी उपलब्ध होण्यात अनेक अडचणी येत असत. नरेंद्र भिडे यांनी नेमकी हीच गरज ओळखून पुण्यात भव्य स्टुडिओची उभारणी केली आणि त्यानंतर जवळजवळ सर्व मराठी चित्रपटांची गाणी, पार्श्वसंगीत, संवाद यांचे ध्वनिमुद्रण एकाच छताखाली होऊ लागले. स्वत:ला संगीताचा उत्तम कान असल्याने त्या सगळ्या प्रक्रियेत भिडे मन लावून सहभागी होत. अगदी आवश्यक असले, तर त्यात सर्जनाची भरही घालत. त्यामुळे ते सगळेच काम अधिक सुंदर होऊन जाई. ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे सहायक म्हणून काम करताना त्यांना जी नजर प्राप्त झाली, ती नंतरच्या काळात त्यांच्या कारकीर्दीसाठी फारच उपयोगी ठरली. मोडक यांच्या अकाली निधनानंतर मराठी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी बव्हंशी नरेंद्र भिडे यांनीच सांभाळली.

अतिशय सज्जन, मनमिळाऊ आणि पारदर्शी व्यक्तिमत्त्व असलेल्या भिडे यांचा जनसंग्रह प्रचंड म्हणावा असा. स्वत: संगीतकार असताना त्यांच्या स्टुडिओत ध्वनिमुद्रणासाठी आलेल्या तरुण संगीतकाराच्या पाठीवरही शाबासकीची थाप मारून त्याला अचंबित करण्याचे अनेक प्रसंग घडले. ‘दुसऱ्याचे काम चांगले असेल, तर ते त्याला प्रत्यक्ष सांगणे फार महत्त्वाचे असते,’ अशी त्यांची भूमिका होती. तो त्यांच्या जगण्याचाच भाग होता. ध्वनिमुद्रण, संगीत याबरोबरच ललित संगीताचा अभ्यास हे त्यांचे आणखी एक वैशिष्टय़. ‘लोकसत्ता’च्या रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये याच वर्षी त्यांचे ललित संगीताबद्दलचे पाक्षिक सदरही प्रसिद्ध होत होते. ते संगीतप्रेमींमध्ये अतिशय लोकप्रियही झाले होते. या सदरातील शेवटचा लेख प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांचे अकाली निधन झाले.

कोणत्याही कामात पूर्णत्वाने झोकून देण्याच्या वृत्तीमुळे भारतीय अभिजात संगीताची तालीम घेताघेताच पाश्चात्त्य संगीताचाही अभ्यास त्यांनी केला. मराठी चित्रपट, नाटक व चित्रवाणीवरील अनेक मालिकांसाठी भिडे यांनी संगीत दिले. जाहिरातीसाठीच्या अनेक जिंगल्सही भिडे यांनी तयार केल्या. राज्य नाटय़ पुरस्कार, राज्य चित्रपट पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वावर मोहोर उमटविणारे ठरले. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांचे निधन होणे ही म्हणूनच चटका लावणारी घटना आहे.