पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील मराठी विषयातले पहिले विद्यावाचस्पती प्रा. ना. गो. नांदापूरकर, प्रा. भालचंद्र महाराज कहाळेकर, भगवंतराव देशमुख प्रभृतींचा निकटचा सहवास आणि वाङ्मयीन संस्कार घेतलेले अनेक विद्यार्थी पुढील काळात साहित्यिक, समीक्षक म्हणून नावाजले गेले. यातील पहिले नाव महाराष्ट्रभर विख्यात झालेले विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे. डॉ. सुधीर रसाळ, प्रा. द. पं. जोशी  या आणि अशांच्या प्रभावळीतील आणखी एक नाव म्हणजे, परळी वैजनाथ येथील प्रा. मधु जामकर.

मराठवाडय़ाच्या मातीत एका सामान्य जोशी कुटुंबात जन्म घेतलेले जामकर शालेय शिक्षणासाठी १९५० नंतर हैदराबादी गेले. हा शैक्षणिक पल्ला यशस्वीपणे पार करून त्यांनी पुढे उस्मानिया विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए. केले. भालचंद्र कहाळेकर हे त्यांचे गुरू. त्या वेळच्या तेथील वातावरणाचा जामकरांवर स्वाभाविक परिणाम झाला. विद्यार्थिदशेतच कवितेशी जुळलेले नाते पुढे नेत, कवी म्हणून त्यांनी मराठवाडय़ाबाहेरही आपली ओळख प्रस्थापित केली. १९५८ साली औरंगाबादेत तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर प्रा. जामकर यांना याच विद्यापीठात वा. ल. कुलकर्णी यांच्या हाताखाली संशोधन सहायक पदावर काम करण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने ते परळीहून औरंगाबादसारख्या मोठय़ा ठिकाणी रुजू झाले होते. विद्यापीठातील कामामुळे तेथेच किंवा अन्य मोठय़ा शहरात प्राध्यापक होण्याचा पर्याय त्यांच्यापुढे होता; पण परळीशी शिक्षक या नात्याने जुळलेले ऋणानुबंध त्यांना याच गावात प्राध्यापकपदी घेऊन आले. या महत्त्वाच्या धार्मिक व सांस्कृतिक शहराच्या जडणघडणीचे गेल्या पाच दशकांचे साक्षीदार असलेले जामकर महाविद्यालयीन सेवेतून पंधरा वर्षांपूर्वी निवृत्त झाले, ते एक विद्यार्थिप्रिय शिक्षक आणि प्रज्ञेच्या अंगाने अध्यापन करणारे सर्जक ही ओळख कायम ठेवूनच.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

जामकरांचा खरा प्रांत कवितेचा. क्षितिजा (१९८१) हा त्यांचा पहिला कवितासंग्रह, त्यानंतरच्या पंधरा वर्षांत दोनच काव्यसंग्रह त्यांच्या खाती जमा झाले, तरी साठोत्तरी मराठवाडय़ातील कवितेत त्यांनी मोलाची भर घातली. या कवितेचे विलोभनीय रूप त्यांच्या कवितेतून दिसले. आपुलाचि वाद, दीपकळी, आकाशदिवे, मावळतीचे रंग, मराठी कविता- रंग आणि अंग, ग्रंथोपजीवीये यांसारख्या ग्रंथांतून एक सर्जनशील साहित्यिक अशी ओळख त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केली. अनंत भालेराव, नरहर कुरुंदकर ही जामकरांची आदरस्थाने. त्यांच्या सहवासातून समाजवादी मंडळींमध्ये वावरलेले जामकर दुसऱ्या बाजूला समरसतावादी मंडळींनाही आपले वाटले, हेही नमूद करावे लागेल. यातून १७ व्या समरसता संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांनी स्वीकारला. त्याआधी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यविस्तारात तसेच ‘प्रतिष्ठान’ या  नियतकालिकासाठी त्यांनी भरीव योगदान दिले. बीड जिल्ह्य़ातील दोन्ही अ. भा. मराठी साहित्य संमेलने तालुक्यांच्या ठिकाणी झाली. त्यांच्या आयोजनातून जामकरांचे संघटनकौशल्य, कामाची शिस्त आणि महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक, लेखक-कवींशी असलेल्या त्यांच्या स्नेहपूर्ण संबंधांचा सर्वानाच प्रत्यय आला. प्रा. जामकर यांना आतापर्यंत विविध पुरस्कार व  मानसन्मान मिळाले. पण आपल्या कर्मभूमीतील मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद  वयाची पंच्याहत्तरी झाली तरी त्यांच्या वाटय़ाला आले नाही, अशी खंत त्यांच्या चाहत्यांना वाटते. केवळ विचार मांडून जामकर थांबले नाहीत, तर आपल्या वैचारिक निष्ठेला व्यवहाराची जोड दिली. म्हणून त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीबद्दल आज (शनिवारी) दाजी पणशीकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव परळी येथे होत आहे, ही घटनाही नोंद घ्यावी अशीच आहे..