11 August 2020

News Flash

जॅक वेल्श

१९८१मध्ये ते जीईचे सर्वात युवा सीईओ बनले.

मोठय़ा अमेरिकी कंपन्या अधिक अजस्र होण्याच्या काळात म्हणजे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात या फुगवटय़ाचे एक प्रेरक ठरले जॅक वेल्श. जनरल इलेक्ट्रिक अर्थात जीईचे ते तब्बल २० वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. या काळात जीईचे भांडवल बाजारातील मूल्य १४ अब्ज डॉलरवरून ४०० अब्ज डॉलरवर (जवळपास २७०० टक्के मूल्यवृद्धी) पोहोचले. वेल्श १९५७मध्ये मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून केमिकल इंजिनीअर झाले, त्यावेळी अनेक चांगल्या कंपन्यांनी त्यांना नोकरी देऊ केली होती. पण उच्च शिक्षणाला प्राधान्य देऊन, १९६०मध्ये इलिनॉय विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएच.डी. करून ते बाहेर पडले आणि जीईमध्ये रुजू झाले. तेथील तुटपुंजी पगारवाढ आणि कॉर्पोरेट नोकरशाही त्यांना अजिबात पसंत पडलेली नव्हती. तेथून बाहेरच पडायचे होते. पण वरिष्ठांनी समजूत काढली आणि वेल्श यांच्या इच्छेनुसार बडय़ा कंपनीतील आळसावलेल्या कार्यसंस्कृतीपेक्षा छोटय़ा कंपनीतील उत्साही आणि आशादायी संस्कृती रुजवण्याचे आश्वासनही दिले. ही संस्कृती स्वतंत्रपणे स्वतहून राबवण्याची पहिली संधी वेल्श यांना १९६८मध्ये, प्लास्टिक उत्पादन विभागाचे प्रमुख बनल्यावर मिळाली. पुढे १९७१मध्ये धातू आणि रासायनिक विभाग त्यांच्या पंखाखाली आले. दोनच वर्षांनी धोरणविषयक विभागाचे प्रमुख बनले आणि सहा वर्षे त्या पदावर राहिले. १९८१मध्ये ते जीईचे सर्वात युवा सीईओ बनले. त्यांना स्वत:च्या पसंतीची कार्यसंस्कृती संपूर्ण समूहात राबवण्याची संधी मिळाली. काय होती ही कार्यसंस्कृती? भांडवल आणि संपत्ती निर्मितीवरच भर. ज्या उद्योगात जीई कंपनी असेल, तेथे ती पहिल्या वा दुसऱ्या क्रमांकावरच राहील. एखादी कंपनी मानांकनात घसरू लागली, की तिला बंद करावे किंवा विकून टाकावे! सीईओ कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षांत वेल्श यांनी जवळपास १०० कंपन्या विकून टाकल्या. कोणालाही कसलीही उसंत देणे त्यांच्या स्वभावात बसत नव्हते.

‘सिक्स सिग्मा’ हे व्यवस्थापनशास्त्रातील धोरण वेल्श यांनी कठोरपणे राबवले आणि यशस्वी करून दाखवले. उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यवस्थापकांना कंपनीचे भागभांडवलही दिले गेले. खराब कामगिरी करणाऱ्या तळातील व्यवस्थापकांची हकालपट्टी करण्यात आली. अमेरिकेत अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी प्रोत्साहन दिलेल्या भांडवलवादी संस्कृतीचे वेल्श प्रतिनिधी होते. कंपनी नफ्यातच राहिली पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजता आली पाहिजे, हे वेल्श यांचे जीवनसूत्र. त्यांना नवीन उद्योगांची, क्षेत्रांची उत्तम जाण होती. माध्यमे, बँकिंग या क्षेत्रांमध्ये जीईने त्यांच्याच अमदानीत शिरकाव केला. हे प्रत्येक उद्योग अखेपर्यंत यशस्वीच राहिले, असे नव्हे. पण वाढत राहिले पाहिजे, शोधत राहिले पाहिजे हे तत्त्व वेल्श यांनी अखेपर्यंत पाळले. त्यांच्या निधनाने एक प्रदीर्घ उद्योगाध्याय संपुष्टात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2020 12:07 am

Web Title: profile jack welch akp 94
Next Stories
1 बलबीर सिंग कुल्लर
2 लॉरेन्स टेस्लर
3 न्या. एस. मुरलीधर
Just Now!
X