जिंदादिल, निर्भीड आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्वामुळे ‘भारतीय बॉक्सिंगचे विश्वदूत’ ठरलेले आणि मुष्टियुद्धातील पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक ओमप्रकाश भारद्वाज यांच्या निधनाने बॉक्सिंग क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. भारद्वाज हे बॉक्सिंगचे विद्यापीठ होते. त्यांचे शिक्षण कमी झाले असले तरी पतियाळाच्या राष्ट्रीय क्रीडा संस्थेत (एनआयएस) १९७५ मध्ये बॉक्सिंगचा पहिला पदविका अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली होती. पुणे येथे भारतीय सैन्यदलात हवालदारपदी असलेले भारद्वाज स्वत: उत्तम बॉक्सिंगपटू होते. १९७३ मध्ये सैन्यदलाने सेवामुक्त केल्यानंतर भारद्वाज राष्ट्रीय क्रीडा संस्थेत निदेशकपदी रुजू झाले. भारत सरकारने १९८२च्या नवी दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी समिती स्थापन केली. त्यात ‘एनआयएस’ने भारद्वाज यांच्यावर प्रशिक्षकांचे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सोपवली. गुरबक्ष सिंग संधू यांच्यासह भारद्वाज यांनी भारतीय बॉक्सिंगला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॉक्सिंगची पताका डौलाने फडकू लागली. १९८८च्या सेऊल आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग संघाने पदकांची लयलूट केली. त्याआधी १९८५ मध्ये भारत सरकारने भारद्वाज यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान केला होता. बॉक्सिंगपटूंना सोयीसुविधा पुरवण्यासाठी भारतीय बॉक्सिंग महासंघाशी त्यांना अनेकदा संघर्ष करावा लागला. त्यांच्या मागण्यांची यादी भली मोठी असायची, पण ती बॉक्सिंगपटूंच्या भल्यासाठीच असायची. कडक शिस्तीचे भारद्वाज बॉक्सिंगपटूंकडून खडतर सराव करवून घेत. त्यामुळेच वीरेंद्र थापा, कौर सिंग, जे. एल. प्रधान, हवा सिंग, जयपाल सिंग आणि एम. के. राय यांसारखे दिग्गज खेळाडू त्यांच्या हाताखाली तयार झाले. १९६८ ते १९८९ या कालावधीत भारतीय बॉक्सिंगचे प्रशिक्षकपद सांभाळताना त्यांनी देशाला अनेक आंतरराष्ट्रीय पदके मिळवून दिली. आजही अनेक प्रशिक्षक भारद्वाज यांचीच प्रशिक्षणशैली अवलंबत आहेत. भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक, प्रशासक, समालोचक आणि निवड समितीचे अध्यक्ष यांपुरते मर्यादित न राहता भारद्वाज यांनी देशातील बॉक्सिंगच्या विकासासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बॉक्सिंगचा प्रसार करण्यासाठी ते सदैव तयार असत. पुढे भारद्वाज यांनी बॉक्सिंग उपकरणांच्या उत्पादकांसाठी सल्लागार म्हणूनही काम केले. चौकटीपलीकडे जात त्यांनी पुरस्कर्ते शोधण्यासाठीही धडपड केली. दूरचित्रवाणी तसेच प्रसारमाध्यमांमध्ये बॉक्सिंगचे अनेक चांगले कार्यक्रम करण्यात त्यांचा हातखंडा होता. जिंदादिल स्वभावामुळे अनेक क्षेत्रांत त्यांनी मित्र जोडले.