लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या दीर्घिकाही आपण दुर्बिणींच्या मदतीने शोधू शकतो. पण सगळ्याच दीíघका शोधण्यास सोप्या असतात असे नाही. विशेषकरून अलीकडेच शोधण्यात आलेल्या ईजीएस ७७ सारख्या दीर्घिका या शोधण्यास कठीण; कारण त्यांच्यापासून निघालेला प्रकाश निर्वेधपणे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ही दीर्घिका शोधण्याची अवघड कामगिरी करणाऱ्या नासाच्या चमूत भारतीय वंशाचे गोव्यातील खगोल वैज्ञानिक विठ्ठल तिळवी यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी ईजीएस ७७ हा दीर्घिका समूह शोधण्यात २०१३ पासून नासाच्या चमूसोबत सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे आतापर्यंत इतक्या दूर अंतरावरचा दीर्घिका समूह शोधण्यात प्रथमच यश आले आहे. हा दीर्घिका समूह १३ अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे. या संशोधनासाठी एकूण चार वर्षे निरीक्षणे करावी लागली. विश्वाची बाल्यावस्था अभ्यासण्याची संधी या दीर्घिका समूहाच्या शोधामुळे मिळणार आहे.

विश्वउत्पत्तीच्या वेळी कुठली रसायने अस्तित्वात होती हे समजू शकणार आहे. ईजीएस ७७ सारख्या दीर्घिका शोधण्याचे काम अवघड आहे, याचे कारण त्यांच्यापासून निघणारा प्रकाश हा हायड्रोजनच्या धुक्याने अडलेला असतो. पण काही वेळा हे हायड्रोजन-धुके याच दीर्घिकांतील उष्णतेमुळे कमी होते, त्यामुळेच ही दीर्घिका शोधण्यात यश आले. विशेष म्हणजे तिळवी यांचे काम एवढय़ापुरतेच मर्यादित नाही तर २०१७ मध्ये विश्वातील सर्वात जुन्या कृष्णविवराचा शोध घेणाऱ्या पथकातही ते सहभागी होते. तिळवी हे सध्या नासाच्या हबल दुर्बिणीच्या मदतीने कृष्णविवरांचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिक समूहाचे प्रमुख आहेत. नासा २०२५ मध्ये वाइड फील्ड इन्फ्रारेड सव्‍‌र्हे टेलिस्कोप दुर्बीण सोडणार आहे, त्यातही त्यांचा सहभाग आहे. तिळवी हे सध्या अमेरिकेतील अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतील स्कूल ऑफ अर्थ अ‍ॅण्ड स्पेस एक्स्प्लोरेशन या संस्थेत अभ्यागत संशोधक आहेत. ते मूळचे गोव्याचे असल्याने तेथील राज्य उच्च शिक्षण मंडळातही त्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. गोवा विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेऊन पुढील शिक्षण त्यांनी अमेरिकेतील मिशिगनमध्ये पूर्ण केले. टेक्सासच्या ए अ‍ॅण्ड एम विद्यापीठाच्या मिशेल इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल फिजिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रॉनॉमी या संस्थेत त्यांनी काम केले. तिळवी यांच्या ताज्या संशोधनातून विश्वाचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे.

खगोल विज्ञानाबाबतची उत्सुकता केवळ हौशी स्वरूपात असून चालत नाही, त्यासाठी बरेच परिश्रम व चिकाटी लागते हेच त्यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या संशोधनातून दिसून येते. यातून तरुणांना संशोधनासाठी प्रेरणाही मिळू शकेल.