19 October 2018

News Flash

आशालता करलगीकर

संगीतकार विश्वनाथ ओक आकाशवाणीत असताना ते ‘स्वरशिल्प’ नावाचा कार्यक्रम सादर करायचे. 

आशालता करलगीकर

‘चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे’ असा एकनाथ महाराजांचा कूट अभंग आशालता करलगीकर त्यांच्या बहुतांश कार्यक्रमांत म्हणायच्या. भैरवी रागात बांधलेल्या चालीमुळे सर्वाच्या तो ओठी आला. हैदराबादमध्ये महामहोपाध्याय स. भ. देशपांडे या गुरूंकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या आशालता करलगीकर यांचे नुकतेच औरंगाबाद येथे निधन झाले आणि ‘आंध्रलता’चा सूर हरवला. करलगीकर यांनी एकदा राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादांसमोर गाणे सादर केले होते आणि ते म्हणाले, ‘या तर आंध्रलता आहेत.’ तेव्हापासून त्यांना ही प्रेमाची उपाधी मिळाली.

संगीतकार विश्वनाथ ओक आकाशवाणीत असताना ते ‘स्वरशिल्प’ नावाचा कार्यक्रम सादर करायचे.  हैदराबादमध्ये संगीताचे शिक्षण झालेल्या करलगीकरांच्या गाण्यांचा बाज काहीसा कर्नाटकी अंगाने जाणारा होता. शब्दोच्चारही कधी कधी दाक्षिणात्य असायचे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या आशालताबाईंचे उर्दू भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. गाण्यातला शब्दार्थ त्यांना पक्का कळालेला असे. तो त्या स्वरातून मांडत. त्यामुळेच पं. नाथराव नेरळकरांबरोबर त्यांनी गज़्‍ालांचे कार्यक्रम केले. रागांचे व्याकरण त्यांना बारकाईने माहीत होते. आवाजाचा पल्लाही कुठपर्यंत वाढू शकतो आणि कुठे तो नियंत्रित करायचा, याचे उत्तम ज्ञान असणाऱ्या गायिका म्हणून त्यांचा नावलौकिक होता. ख्यालगायनाबरोबरच सुगम संगीताचे त्यांचे कार्यक्रमही लोकप्रिय होते.

आशाताई विवाहानंतर औरंगाबादकर झाल्या. विजापूर हे त्यांचे जन्मगाव. वडील व्यवसायानिमित्त हैदराबाद येथे स्थायिक झाले आणि तेथेच त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यांनी चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केले; पण सिनेसंगीतऐवजी शास्त्रीय संगीताची बैठकच त्यांना अधिक भावत असे. शास्त्रीय संगीताचे दोन हजारांहून अधिक कार्यक्रम त्यांनी केले. पंडित भीमसेन जोशी, ज्येष्ठ नृत्यांगना इंद्राणी रहमान यांच्यासोबत त्यांनी काबूल शहरात १९६३ साली गायन केले होते. त्यांना सूरमणी, सूरश्री असे मानाचे सन्मान मिळाले होते. त्यांनी हिंदी व तेलुगू चित्रपटांमध्ये पाश्र्वगायन केले होते. १९६६ मध्ये ‘मुजरिम कौन’ या चित्रपटासाठी त्यांनी गायन केले होते. २०हून अधिक रचना त्यांनी गायिलेल्या आहेत. दर वेळी नवीन शिकण्याची त्यांची इच्छा असायची. कोणत्या गुरूकडून कोणत्या विषयाचे शिक्षण घ्यायला हवे, याचेही त्यांना आकलन होते. पंडित व्ही. आर. आठवले, तसेच इतरही गुरूंकडून त्यांनी काही शिक्षण घेतले. गज़्‍ाल या गायन प्रकारात शब्दार्थ सुरातून मांडायचे असतात. ती गज़ल उलगडून दाखवायची असते. काव्य पोहोचवायचे असते. आशालता करलगीकर हे काम अनोख्या पद्धतीने करायच्या.

First Published on January 10, 2018 1:34 am

Web Title: senior singer ashalatha karajgikar