व्हायोलिन या वाद्याने भारतीय संगीतात प्रवेश केल्यानंतर तंतुवाद्याच्या दुनियेत प्रचंड खळबळ माजली असेल. रबाब, सारंगी यांसारख्या वाद्यांनी भारतीय स्वरांचे आकाश भरून गेलेले असताना, त्यांच्या स्पर्धेत या नव्या पाश्चात्त्य वाद्याने के लेला प्रवेश त्या वेळी बहुतेकांना खुपलाही असेल. परंतु भारतीय संगीतातील स्वागतशीलता याहीवेळी पुन्हा एकदा सिद्ध झाली आणि हजार वर्षांपूर्वी भारतीय संगीतात मुसलमानी अमदनीतील संगीताचे आरोपण होऊन एक नवेच संगीतविश्व जसे आकाराला आले, तसेच व्हायोलिनमुळेही घडले. भारतीय कलावंतांच्या प्रतिभेमुळे हे वाद्य भारतीय संस्कृतीमध्ये कधी विरघळून गेले, ते ब्रिटिशांनाही समजले नाही. ते देश सोडून गेले, तरी या वाद्याने धारण के लेला भारतीय वेश मात्र उतरला नाही. कोलकात्याच्या शिशिरकना धर चौधरी यांच्यासारख्या अनेकांनी या वाद्यावर जी हुक मत साध्य के ली, त्यामुळे या वाद्याची लोकप्रियताही वाढली आणि भर मैफिलीतील वाद्य म्हणून त्याला पसंतीची दादही मिळाली. पन्नासच्या दशकात वाद्यवादनाच्या क्षेत्रात महिलांचे प्रमाण फारच कमी होते. अशा वेळी शिशिरकना धर चौधरी यांनी व्हायोलिन या वाद्याला जवळ के ले आणि ख्यातनाम व्हायोलिन वादक पंडित व्ही. जी. जोग यांच्याकडे वाद्यवादनाचे धडे गिरवायला सुरुवात के ली. मेंदूत निर्माण होणारे संगीत वाद्यातून बाहेर येण्यासाठी वाद्यावर कमालीचे प्रभुत्व असावे लागते. ते मिळेपर्यंतच बहुतेकांची दमछाक होते. शिशिरकना यांनी ते नुसते मिळवले नाही, तर त्यावर स्वत:च्या मननाने त्याच्या स्वतंत्र अभिव्यक्तीची तयारी के ली. ख्यातमान सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांच्याकडूनही त्यांनी तालीम घेतली आणि मैफिली गाजवत असतानाच या वाद्याच्या अध्यापनाची जबाबदारीही मनापासून स्वीकारली. अमेरिके तील अली अकबर खाँ यांच्या संस्थेत त्या व्हायोलिन वादनाच्या शिक्षणात गुंतल्या आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा, प्रतिभेचा स्पर्श त्यांच्या अनेक शिष्यांना होऊ शकला.

शिशिरकना यांना संशोधनातही रस असल्यामुळे अमेरिके तील त्यांचे वास्तव्य यासाठी फारच उपकारक ठरले. मैहर घराण्याचे उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांच्या संगीत रचनांचे लेखन करण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले. त्यापूर्वी सवींद्र भारती विद्यापीठातील वाद्यवादन विभागातही त्यांनी अध्यापक म्हणून काम के ले होते. व्हायोलिन या वाद्याचा मोठा भाऊ म्हणता येईल, अशा ‘व्हायोला’ या वाद्याला भारतीय अभिजात संगीतात प्रवेश मिळावा, यासाठी शिशिरकना यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या व्हायोलिनवरील आलापीतून एखादी कविताच व्यक्त होते, अशी भावना त्यांचे शिष्य मुखर करतात. वादनात काटेकोरपणा बाणवण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. वाद्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी ते आवश्यक असले, तरी शिशिरकना त्याबाबत अधिक आग्रही असत. संगीतविश्वात सुमारे सात दशके  आपल्या कलेने आणि विद्यादानाने प्रभावित करणाऱ्या या विदुषीला संगीत नाटक अकादमीचा सन्मानही लाभला होता.

वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांच्या निधनाने, एक प्रदीर्घ संगीत परंपरा थांबली. कलावंत म्हणून मिळालेला लौकिक सांभाळतानाही आपल्यातील माणूसपण जपणाऱ्या कलावंत म्हणून त्यांची ओळख, त्यांच्या सहवासात आलेला संगीतातील प्रत्येकजण कधीच विसरू शकणार नाही.