22 February 2019

News Flash

सुदीप लखटाकिया

एनएसजी दलाच्या महासंचालकपदी नुकतीच आयपीएस अधिकारी सुदीप लखटाकिया यांची नियुक्ती करण्यात आली

सुदीप लखटाकिया

राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनएसजी) म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो २६ नोव्हेंबर २००८ मधील मुंबई हल्ल्यातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमधील त्यांचा सहभाग. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात एनएसजी ही जगात सहाव्या क्रमांकाची नावाजलेली संस्था आहे.  दहशतवादी हल्ले व विमान अपहरण किंवा तत्सम प्रसंगात या जवानांची कसोटी लागत असते. त्यांचे नव्वद दिवसांचे प्रशिक्षणही अतिशय खडतर असते. जर्मनीच्या जीएसजी ९ व ब्रिटनच्या एसएएस सुरक्षा संस्थेच्या धर्तीवर या संस्थेची स्थापना करण्यात आलेली असून त्यांच्या काही ब्लॅक कॅट कमांडोजना प्रशिक्षणासाठी इस्रायलमध्येही पाठवण्यात येते. या एनएसजी दलाच्या महासंचालकपदी नुकतीच आयपीएस अधिकारी सुदीप लखटाकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एनएसजी कमांडोज ही सुरक्षेच्या क्षेत्रात देशाची शान आहे, हीच प्रतिमा यापुढेही टिकून ठेवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. देशात एनएसजीची एकूण पाच केंद्रे असली तरी त्याचे मुख्यालय गुरुग्राममधील मनेसर येथे आहे. गृहमंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो करीत असतात. या संस्थेचे प्रमुख बनलेले लखटाकिया हे तेलंगण केडरचे १९८४ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असून सध्या ते केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष महासंचालक आहेत. सध्या एनएसजीचे महासंचालक असलेले एस. पी. सिंह हे ३१ जानेवारी रोजी निवृत्त होत असून त्यांच्याकडून ते सूत्रे घेतील. पुढील वर्षी जुलैपर्यंत लखटाकिया हे एनएसजीचे महासंचालक राहतील त्यानंतर ते निवृत्त होत आहेत.  प्रत्यक्ष दहशतवाद व नक्षलवाद मोहिमांविरोधातील मोर्चेबांधणीत लखटाकिया हे निपुण आहेत.  केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक या पदावर नियुक्त होण्यापूर्वी ते आठ वर्षे एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप) या सुरक्षा संस्थेत महानिरीक्षक होते. देशातील वाढत्या दहशतवादी कारवाया बघता एनएसजीची भूमिका महत्त्वाची आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या मोहिमांमध्ये एनएसजीला सुधारणा कराव्या लागणार आहेत, कारण त्यात अनेक उणिवा आतापर्यंत सामोऱ्या आल्या आहेत. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी जे सहाही हल्लेखोर मारले गेले ते इतर सुरक्षा दलांनी मारले होते. त्यामुळे सज्जता व डावपेच यात दोन्हींमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचे काम एनएसजीला द्यावे की नाही हाही एक वादाचा मुद्दा आहे, या आव्हानातून ठोसपणे मार्ग काढता आला तर लखटाकिया यांची कारकीर्द एनएसजीचा चेहरामोहरा बदलवू शकेल.

First Published on January 22, 2018 1:17 am

Web Title: sudeep lakhtakia appointed new nsg chief