नव्वदच्या दशकात तत्कालीन हीरो होंडा कंपनीनंतर मोटरसायकल उत्पादनामध्ये बजाज ऑटोचे नाव होते. स्प्लेंडर व पॅशन या दोन मोटरसायकलची कामगिरी उत्तम होत होती. अशाच वेळी बजाज ऑटोने बॉक्सर, कॅलिबर, अस्पायर, िवड १२५ सारख्या मोटरसायकल बाजारपेठेत सादर केल्या होत्या. मात्र, या मोटरसायकलना व्यावसायिक यश काही मिळाले नव्हते. अशाच काळात बजाज ऑटोचा पल्सर हा ब्रँड यशस्वी होऊ लागला होता. सेगमेंट नवा असला तरी यामुळे बजाज ऑटोला मोटरसायकल बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळेच तरुणांना भावणारी, पॉवर फुल तरीही मायलेज व किमतीबाबत रास्त ठरू शकणारी मोटरसायकल निर्माण करण्यावर बजाज ऑटोने लक्ष केंद्रित केले होते. त्यातून डिस्कव्हर हा ब्रँड जन्माला आला. २००४-०५ मध्ये कंपनीने पहिली डिस्कव्हर मोटरसायकल लाँच केली. याच काळात कम्युटर मोटरसायकल सेगमेंटमध्ये शंभर सीसी मोटरसायकलची बाजारपेठत चलती होती. हेच लक्षात घेऊन बजाज ऑटोने १२५ सीसीचे इंजिन असणारी डिस्कव्हर लाँच केली. इलेक्ट्रिक स्टार्ट, ट्रिप मीटर, फ्यूएर गॅग, सेमी स्पोर्टी डिझाइन व प्रति लिटर ६५-७० किमी मायलेज ही याची वैशिष्टय़े होती. सुरुवातीस मोटरसायकल चांगली भावली. पण, शंभर सीसीच्या तुलनेत मायलेज कमी असल्याने बजाज ऑटोने २००५-०६ मध्ये ११० सीसीचे प्रति लिटर १०० किमी मायलेज असणारे मॉडेल लाँच केले. यामध्ये नवीन ग्राफिक, ग्रॅब रेल्स, नवे सस्पेन्शन, मॅगव्हील असणारे मॉडेल लाँच केले. यासही चांगाला प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच कंपनीने पुढे जाऊन २००७-०८ मध्ये डिस्कव्हरचे १३५ सीसीचे मॉडेल लाँच केले. यामध्ये पुढील आणि मागील चाकाचा आकार वाढविण्याबरोबर, रिअर मड कॅप, काळ्या रंगातील अलॉय व्हील, नायट्रॉक्स सस्पेन्शन, डिस्कब्रेक याचबरोबर डीटीएसआयची जोड दिली. पल्सरच्या तुलनेत स्वस्त व बरेचसे लुक्स मिळतेजुळते होते. अर्थात, याच मोटरसायकलमुळे अन्य प्रीमियम ब्रँडवर परिणाम होत असल्याने पुढे हे मॉडेल बंद करण्यात आले. २००९ च्या काळात होंडा, टीव्हीएस यांच्याकडूनही अनेक मोटरसायकल बाजारात येत होत्या. तसेच, १२५ सीसीपेक्षा १०० व ११० सीसीच्या मोटरसायकलना अधिक मागणी होती. त्यामुळेच बजाज ऑटोने २००९-१० मध्ये डिस्कव्हरचे शंभर सीसीचे मॉडेल लाँच केले. यास डीडीएस-एसआय हे इंजिन बसविले होते. या मॉडेलला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बजाज ऑटोने २०१०-११ पुन्हा एकदा १२५ सीसीचे व्हर्जन लाँच केले आणि याचे सुधारित व्हर्जन २०११-१२ मध्ये १२५ एसटी (स्पोर्ट्स टूरर) बाजारात आणली. नवी डिस्कव्हर बाजारात आणताना त्यात अनेक बदल केले. यात प्रामुख्याने पूर्णपणे नवे डिझाइन करून पुढील बाजूस पेटल डिस्कब्रेक, मोनोशॉक नायट्रॉक्स सस्पेन्शन या फीचरबरोबर चार व्हॅल्व्हचे इंजिन हा यातील महत्त्वाचा बदल करण्यात आला. यानंतर बजाज ऑटोने डिस्कव्हरची टी, एम ही मॉडेलही अनुक्रमे लाँच केली. अर्थात, याही मॉडेलना सुरुवातीस प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच पुढे जाऊन २०१५-१६ मध्ये डिस्व्हरचे १५० सीसीचे मॉडेलही लाँच झाले. यामध्ये एस आणि एफ या दोन मॉडेलचा समावेश होता. एफ मॉडेल हे हाफफेअिरगचे होते. सुरुवातीस याही मॉडेलना प्रतिसाद मिळाला. पण, आता डिस्कव्हर १००, १२५ एसटी, १५० सीसी मॉडेल उपलब्ध नाहीत. केवळ १२५सीसीचे मॉडेल भारतीय बाजारपेठेत आहे. गेल्या दीड दशकाहून अधिक कालावधीत डिस्कव्हरची अनेक मॉडेल लाँच झाली आहेत. पण, कोणते मॉडेल जास्त यशस्वी ठरले याची चर्चा करण्यापेक्षा डिस्कव्हर ब्रँड बाजारपेठेत टिकून राहिला आहे. बजाज ऑटोचा पल्सरनंतर हा दुसरा यशस्वी ब्रँड म्हणावा लागेल. मास सेगमेंट वा कम्युटर मोटरसायकल सेगमेंटमध्ये जोरदार स्पर्धा आहे. सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या डिस्कव्हर १२५ सीसीची स्पर्धा ही होंडाच्या सीबी शाइन १२५ आणि हीरो मोटोकॉर्पच्या ग्लॅमर मोटरसायकलशी आहे. १२५ सीसी सेगेमेंटमध्ये मोठा व्हीलबेस (१३०५ एमएम) डिस्कव्हरचा आहे. तसेच, पॉवरही स्पर्धक मोटरसायकलच्या तुलनेत थोडी अधिक म्हणजे ११ आहे. अर्थात, या जमेच्या बाजू डिस्कव्हरला स्पर्धकांमध्ये सरस ठरवितात का, हे येणारा काळच ठरवेल.

obhide@gmail.com