एके काळी मारुतीपेक्षाही भारतात जास्त चालणाऱ्या फियाट कंपनीला सध्या ग्राहकांची फार पसंती नाही. अशा वेळी लिनेआ किंवा आता अ‍ॅव्हेंच्युरा यांसारख्या गाडय़ांच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न कंपनीकडून होत आहे. त्यांच्या अ‍ॅव्हेंच्युरा या गाडीचे क्रॉस व्हर्जन बाजारात उपलब्ध झाले आहे..

युरोपियन ऑटोमोबाइल कंपन्यांबद्दल जगभरात एक विश्वास असतो. या कंपन्यांची इंजिने दणकट आणि उत्तम प्रतीची असल्याने या गाडय़ाही चांगल्या चालतात. युरोपातील एखाद्या देशाप्रमाणेच भारतात अगदी घट्ट रुजलेली एक कंपनी म्हणजे फियाट. पूर्वीच्या काळी उच्च मध्यमवर्गीयांच्या घराबाहेर किंवा एखाद्या पारश्याच्या पोर्चमध्ये एक तरी फियाट हमखास उभी दिसायची. आता मुंबईच्या रस्त्यांवरील काही जुन्या टॅक्सींचा आणि काही शौकीन व्यक्तींनी सांभाळून ठेवलेल्या गाडय़ांचा अपवाद वगळता जुनी फियाट कुठेही दिसत नाही. त्यानंतर फियाटने सिएना, पॅलिओ आणि पुंतो अशा गाडय़ाही बाजारात आणल्या. सचिन तेंडुलकर पॅलिओचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनल्याचा फायदा या गाडीला मिळाला. सध्या या गाडीने अ‍ॅव्हेंच्युरा या कॉम्पॅक सेडान गाडीचे क्रॉस व्हर्जन बाजारात आणले आहे. इटालियन भाषेत अ‍ॅव्हेंच्युरा म्हणजे अ‍ॅडव्हेन्चर किंवा धाडस.. फियाटचे हे नवे ‘धाडस’ कसे आहे ते पाहू या..

बाह्य़रूप

फियाटची ही नवी गाडी प्रथमदर्शनी फोर्डच्या इको-स्पोर्ट गाडीसारखीच दिसते. गाडीकडे समोरून बघितल्यानंतर फ्रंट ग्रिल तुमचा ताबा घेते. चौकोनी आकाराच्या काळ्या रंगातील ही ग्रिल स्पोर्टी लुक वाढवते. त्याशिवाय गाडीचे बम्परही गाडीच्याच रंगात असल्याने गाडीच्या सौंदर्यात भर पडते. काळ्या आणि चंदेरी रंगातील रूफ रेल्स, अँटेना, दरवाजाच्या खाली काळ्या रंगातले डॅश रेझिस्टण्ट, गोलाकार आणि तरीही लांब नळीच्या आकाराचे हेडलँप्स या फीचर्समुळे ही गाडी नक्कीच आकर्षक दिसते. या गाडीची चाके हे गाडीतील एक सौंदर्यस्थळ आहे. गाडीच्या चाकांची रिम आणि आकार खूपच आकर्षक आणि स्पोर्टी आहे. तो या गाडीच्या एकंदरीत दिसण्यात कमालीची भर टाकतो. आजकाल इतर कुठल्याही गाडीसारख्याच या गाडीच्या साइड मिररमध्येही सिग्नलचे एलईडी दिवे समाविष्ट केले आहेत.

गाडी मागून तर खूपच इको-स्पोर्टसारखी दिसते. गाडीच्या मागच्या बाजूला उजवी-डावीकडे बॅक ग्लासच्या कडेला सिग्नलचे दिवे देण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी हे दिवे छान दिसतात.

अंतरंग

गाडीचा डॅशबोर्ड लेदरमध्ये बनवला आहे. त्यामुळे गाडीच्या केबिनला एक प्रकारचा रिच फील येतो. डॅशबोर्डवर मध्यभागी गॉगल क्लॉसेट, एसी व्हेंट्स आहेत. त्याच्या खालोखाल मल्टिमीडिया पॅनल स्क्रीन दिली आहे. या स्क्रीनच्या दोन्ही बाजूंना व्हॉल्युम कंट्रोल आणि इतर बटणे आहेत. चालक आणि त्याच्या बाजूला असलेल्या प्रवाशासाठी ही गाडी खूपच आरामदायक आहे; पण मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांसाठी खूपच कमी लेगस्पेस देऊ केली आहे. त्यामुळे एखादी उंचपुरी व्यक्ती मागे बसली, तर तिला बसताना अडचण होऊ शकते. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान ही बाब त्रासदायक ठरू शकते.

गाडीच्या डॅशबोर्डवर दिलेला कप्पा मोठा असून एखादी छोटीशी बॅग त्यात आरामात राहू शकते. त्याचप्रमाणे गाडीचे स्टीअिरग अ‍ॅडजेस्ट करता येत असल्याने हा चालकांसाठी खूप मोठा फायदा आहे. गाडीत ग्लोव्ह कम्पार्टमेण्ट, डिजिटल क्लॉक आदी सुविधाही आहेत. गाडीच्या केबिनमध्ये फियाटने फार जास्त कोंबाकोंबी न करता ती केबिन सुटसुटीत ठेवण्यावर भर दिला आहे.

कम्फर्ट

कम्फर्टच्या दृष्टीने ही गाडी अति अपेक्षा पूर्ण करणारी नसली, तरी आरामदायक प्रवासासाठी चांगली आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी थोडी जास्त लेग स्पेस दिली असती, तर या गाडीची कम्फर्ट लेव्हल आणखी वाढली असती. तरीही गाडी चालवताना हेडलाइट्सचा झोत चालकाच्या उंचीप्रमाणे वर-खाली करायचा असेल, तर तशी सोय देण्यात आली आहे. गाडीला पाìकग असिस्ट सिस्टम नसल्याने गाडी पार्क करताना गाडीच्या तीनही आरशांवर खूप भरवसा ठेवावा लागतो. गाडीत मागे बसणाऱ्यांसाठी कप किंवा बॉटल होल्डर देण्यात आलेले नाही. त्याप्रमाणे पुढच्या आसनांच्या मध्ये चालकाचा मोबाइल ठेवण्यासाठी जागा देणे अपेक्षित होते. मनोरंजनासाठी गाडीत सीडी प्लेअर नसला, तरी यूएसबी पोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आदी गोष्टींमुळे मनोरंजनाची हमखास हमी मिळते. त्याशिवाय गाडीत नॅव्हिगेशन सिस्टम असल्याने चालकाला गाडी चालवताना फार अडचण जाणवत नाही. गाडीत असलेले मल्टिमीडिया पॅनल टचस्क्रीन असल्याने फोन करण्यापासून गाणे बदलण्यापर्यंतचे पर्याय सहज हाताळता येतात. हे कंट्रोल गाडीच्या स्टीअिरगवरही आहेत. गाडीचे साइड मिर्स चालकाच्या सीटवर बसल्या बसल्या अ‍ॅडजेस्ट करता येऊ शकतात.

इंजिन

गाडीच्या इंजिनावर बोलण्याआधी गाडीचा टॉर्क जबरदस्त आहे, हे सांगायला हवे. पहिल्या गिअरमध्येच गाडी झटक्यात पिकअप घेते. १३६८ सीसी पॉवर असलेले, १.४ लिटर पेट्रोल इंजिन असलेल्या या गाडीला २१० एनएम एवढा टॉर्क दिला आहे. त्यामुळे ही गाडी ० ते १०० किमी एवढय़ा वेगासाठी केवळ १४ सेकंद घेते. विशेष म्हणजे गाडी ताशी १५० किमीच्या वेगाने धावतानाही रस्त्यावर अजिबात हलत नाही किंवा गाडीतून आवाजही येत नाही.

इकॉनॉमी

गाडी वेगात असताना अचानक ब्रेक लागल्यास ब्रेक लॉक होऊ शकतात. हे टाळण्यासाठी गाडीत अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आहे. त्याशिवाय गाडीत सेंट्रल लॉकिंग सिस्टम, पॉवर डोअर लॉक, चाइल्ड लॉक, चालक आणि त्याच्या बाजूच्या प्रवाशासाठी एअरबॅग्ज, मागील आसनांसाठी सीटबेल्ट्स, गाडीला दोन्ही बाजूंनी कोणी ठोकल्यास सुरक्षेसाठी बीम्स, कीएलस एण्ट्री, क्रॅश सेन्सर्स, अँटी थेफ्ट डिव्हाइस आदी फीचर्स देण्यात आले आहेत.

सुरक्षा

या गाडीची फ्युएल इकॉनॉमी हा काहीसा गाडीच्या क्रॉस व्हर्जनला अगदीच साजेसा मुद्दा आहे. साधारणपणे क्रॉस व्हर्जन गाडय़ा स्पोर्टी असल्याने त्यांचे मायलेज कमी असते. फियाट अ‍ॅव्हेन्च्युरा क्रॉस ही गाडीही त्याला अपवाद नाही. पेट्रोल व्हर्जनमधील या गाडीचे मायलेज शहरात ११.२ किमी प्रति लिटर आणि हायवेवर १४ किमी प्रति लिटर एवढे कमी आहे. त्यामुळे ४५ लिटरची टाकी पूर्ण भरल्यानंतर गाडी साधारण ६००-६५० किमी एवढी धावते.

अनुभव

गाडीचा टॉर्क भन्नाट असल्याने गाडी वेग पकडताना उत्तम वेग पकडते. त्याचप्रमाणे गाडी थांबण्यासाठी ब्रेक लावल्यानंतर गाडीचा वेग पटकन नियंत्रणातही येतो. गाडी देखणी असल्याने रस्त्यावरून गाडी चालताना लोक माना वळवून वळवून गाडीकडे बघतात. हायवेवर ही गाडी चालवण्यासारखा आनंद नाही. १३६८ सीसी क्षमतेच्या इंजिनमुळे आणि २१० एनएम टॉर्कमुळे गाडी हायवेवर चित्त्याच्या चालीने पळते. कंपनीने चाइल्ड लॉक फीचर दिल्याचे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात चालकाच्या आसपास दिलेल्या अनेक पॅनल्समध्ये आणि बटणांमध्ये हे बटण सापडत नाही, किंबहुना अनेकदा शोधूनही ते दिसले नाही. त्यामुळे गाडी चालता चालता कोणी ती उघडण्याचा प्रयत्न केल्यास ते सहज शक्य होऊ शकते. हे खूपच धोकादायक आहे. त्याशिवाय पेट्रोल इंजिनच्या मानाने गाडी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गिअरमध्ये धावताना इंजिनचा आवाज खूप येतो.

किंमत

६.८५ लाख ते ९.८५ लाख

एवढी आहे.

रोहन टिल्लू – rohan.tillu@expressindia.com