भारतात ऑटोमॅटिक व्हर्जन असलेल्या दुचाकीची मोबिलिटी म्हणून सुरुवात कायनेटिक होंडाने केली, हे आपल्या सर्वाना माहीत आहे आणि मागच्या लेखात आपण ते वाचलेही. होंडाने भारतात दोन वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांसाठी दोन वेगळ्या कंपन्यांची निवड केली होती. दीड दशकाहून अधिक काळ ही साथ संबंधित कंपन्यांबरोबर राहिली. मात्र, आíथक उदारीकरणामुळे तसेच देशात माहिती तंत्रज्ञान युगाने बाळसे धरल्याने पुढे जाऊन हिरो आणि कायनेटिक या कंपन्यांबरोबर असणारी आपली भागीदारी होंडाने थांबविली.

कंपनी स्वत:च्या क्षमतेवर भारतात पाय पसणार याचे सूतोवाच १९९८ मध्ये मिळाले होते. तसेच, याच काळात भारतीय बाजारपेठेत मोटरसायकलचा टक्का वाढायला लागला होता. वाहनांची उदयोन्मुख बाजारपेठ असलेल्या भारताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे परकी कंपन्यांना माहिती होते. त्यामुळेच कायनेटिकशी भागीदारी संपुष्टात आल्यावर होंडाने भारतात विस्तार करण्यासाठी शंभर टक्के स्वत:ची मालकी असलेली उपकंपनी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया लिमिटेडची (एचएमएसआय) स्थापना केली. हिरोबरोबर भागीदारी असल्याने मोटरसायकल लगेचच लाँच होणार नाही, हे स्पष्ट होते. अर्थात, मोटरसायकलची विक्री ही स्कूटरपेक्षा अधिक होते आहे, हे माहिती असूनही होंडा कंपनीने पुन्हा एकदा आपले नशीब स्कूटर या सेगमेंटवरच अजमावण्याचे धाडस केले. याच काळात अन्य भारतीय कंपन्यांनी गिअर स्कूटरसाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले. मात्र, होंडाने भारतात पहिले उत्पादन लाँच करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या ऑटोमॅटिक स्कूटरचा पर्याय निवडला. अर्थात, यासाठी कंपनीने नव्या दमाचे फोर स्ट्रोक, शंभर सीसी असणारे इंजिन विकसित केले आणि २०००-०१ मध्ये मोठय़ा दिमाखात संपूर्ण मेटल बॉडी, बटन स्टार्ट, महिला-पुरुष दोघेही वापरू शकतील, अशी अ‍ॅक्टिवा ही ऑटोमॅटिक स्कूटर लाँच केली. संपूर्णपणे भारतीय बाजारपेठेचा विचार करून ही स्कूटर बनविण्यात आली. कंपनीने सुरुवातीस किंमतही ४० हजार रुपयांच्या आसपास ठेवली होती. होंडाच्या तंत्रज्ञानाविषयी शंका नसल्याने ग्राहकांनी या स्कूटरला आपलेसे केले.

गिअरलेस, फोरस्ट्रोक, बटनस्टार्ट, उत्तम शॉकअ‍ॅबसॉर्बर, स्कूटरसारखी डिक्की (हेल्मेट राहील एवढी) आणि पाय ठेवण्याची जागा पूर्णपणे फ्लॅट, तसेच पुढेही डिक्कीची सोय (पर्याय उपलब्ध) या अ‍ॅक्टिवाच्या जमेच्या बाजू होत्या. तसेच, शंभर सीसीची असल्याने लांब पल्ल्याच्या नाही, मात्र चाळीस-पन्नास किलोमीटर अंतर जाण्यासाठी तसेच आवश्यक वस्तू वाहून नेण्यासाठी ही स्कूटर उपयुक्त ठरली. त्यामुळे सुरुवातीपासूनच अ‍ॅक्टिवा लोकांना आवडली. तसेच, महिलांनाही गिअरलेस स्कूटरमध्ये स्कूटीपेक्षा ताकदवान अधिक आरामदायी पर्याय मिळाला. त्यामुळे महिलांमध्येही अ‍ॅक्टिवा वाहनाचा पर्याय बनली. कंपनीने इटर्नो ही गिअर स्कूटरी बाजारपेठेत लाँच केली होती. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, अ‍ॅक्टिवाची घोडदौड सुरूच होती. १९९१ च्या तुलनेत दुचाकी चालविणाऱ्या महिलांची संख्या वाढू लागली होती. त्यामुळे होंडाने आपल्या अ‍ॅक्टिवामध्ये बदल करून २००८-०९ च्या आसपास आठ बीएचपी (सुरुवातीस सात बीएचपीचे इंजिन) असणारे नवे मॉडेल लाँच केले. यामध्ये कॉम्बिब्रेक ही ब्रेकिंगची नवी सिस्टम देण्याबरोबर कंपनीने अँटी थेप्ट ठरू शकेल, असे की शटर लॉकची सुविधा यात दिली. तसेच, नव्या अ‍ॅक्टिवाची प्रति लिटर अंतर कापण्याची क्षमताही बारा ते पंधरा टक्क्यांनी सुधारली.

अ‍ॅक्टिवा ही थोडी जड आहे, महिलांना त्यामुळे ती चालविणे अवघड जात असल्याचे अनेक ग्राहक बोलत होते. त्यामुळे कंपनीने २०१३ मध्ये अ‍ॅक्टिवा आय लाँच केली. यामध्ये आमूलाग्र बदल म्हणजे वजन घटविण्यात आले. अ‍ॅक्टिवा कमी पॉवरची असल्याने आणि १२५ सीसीच्या ऑटोमॅटिक स्कूटरला मागणी वाढत असल्याने कंपनीने २०१४ मध्ये अ‍ॅक्टिवा १२५ लाँच केली. यामध्ये टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, डिस्कब्रेक (पर्याय), टय़ूबलेस टायर आदी फीचर समाविष्ट केली. आजही ऑटोमॅटिक स्कूटरमध्ये होंडा अ‍ॅक्टिवा ही आघाडीवर असली तरी टीव्हीएस, सुझुकी या कंपन्यांकडून आकर्षक ऑटोमॅटिक स्कूटर लाँच झालेल्या आहेत. मात्र, भारतात फोरस्ट्रोक ऑटोमॅटिक स्कूटर प्रसिद्ध करण्यामध्ये होंडाचा वाटा मोठा आहे. तसेच, होंडाच्या भारतामधील व्यवसायास बळकटी आणि विस्तारामध्ये अ‍ॅक्टिवाचे योगदान खूप मोठे आहे. अनेक वर्षे अ‍ॅक्टिवा ही कंपनीची एकमेव ओळख राहिली होती. त्यामुळेच अ‍ॅक्टिवाला होंडाचा ‘युनिकॉर्न’ म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मित्रहो, दुचाकी चालविताना हेल्मेट अवश्य घाला.

obhide@gmail.com