होंडाच्या अमेझ या कॉम्पॅक्ट सेडानने अवघ्या तीन वर्षांत लोकप्रियतेचे शिखर गाठले. बाहेरून दिसायला छोटी वाटली तरी आतून प्रशस्त असलेली आणि चांगला मायलेज देणाऱ्या कॉम्पॅक्ट सेडानने होंडालाही चांगलाच हात दिला, त्यांचा बाजारहिस्सा वाढवण्यात. हीच अमेझ आता थोडय़ाफार फरकाने पुन्हा एकदा कारप्रेमींच्या भेटीला आली आहे. आणि अर्थातच पुन्हा एकदा लोकप्रिय ठरू लागली आहे.. आधीच्या अमेझचा अनुभव अमेिझग होता आणि नव्याचाही तोच अनुभव आहे..

एखाद्या घरात खूप सारी भावंडे आहेत. त्याच घरात एखादे नवीन बाळ जन्माला आले तर त्याचे कोण कौतुक होते. त्याच्या बाललीला पाहताना घरातल्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. हळूहळू हे भावंड मोठे झाले की त्याच्या खोडय़ा वाढायला लागतात. त्यात ते हुशार असले तर मग बघायलाच नको. ते पुढे जाऊन घराची कीर्ती दिगंत करते वगरे वगरे.. होंडा कार्स या जपानी कार निर्मात्यांच्या घरातही तीन वर्षांपूर्वी असेच एक भावंड जन्माला आले. त्याचे नामकरण लाडाकोडाने अमेझ असे करण्यात आले. हळूहळू ते रस्त्यावर रांगू लागले, मग धावू लागले आणि आता तर ते वेगात पळू लागले आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल दोन लाखांपर्यंत अमेझ लोकांनी विकत घेतल्या. त्यामुळे अर्थातच होंडा परिवारात हे अपत्य मोठेच लाडके ठरले आहे. आता तर त्याचा नवा अवतारही आला आहे बाजारात. ब्रियो, सिटी, मोबिलिओ, सीआरव्ही आणि आता बीआरव्ही या सर्व भावंडांमध्ये अमेझने सर्वाधिक पसंती मिळवली आहे. त्यामुळेच नव्या अवतारात ही गाडी अधिक खुलून दिसते.

बारूप

अमेझच्या नव्या अवतारात पुढे तिला नवीन फ्रण्ट ग्रिल देण्यात आले आहेत. तर जाडसर अशा क्रोम स्लॅटचा मुलामा त्याला देण्यात आला आहे. त्यामुळे हिचा तोंडवळा काहीसा मोबिलिओसारखा वाटतो. हेडलॅम्प आणि टेललॅम्पमध्ये थोडा बदल करण्यात आला असून ते अधिक कव्‍‌र्ही करण्यात आले आहेत. तर बूट स्पेस थोडा अधिक करण्यात आला आहे. ४०० लिटर क्षमतची ही ट्रंक आहे. त्यामुळे एका छोटय़ा आकाराच्या कुटुंबाचे सामान त्यात अगदी आरामात बसू शकते. बी पिलपर्यंत नव्या होंडाचा आकार ब्रियोसारखा वाटतो. मात्र, असे असले तरी आतून हिचा असलेला प्रशस्तपणा कुठेही कमी पडत नाही. याबाबतीत नव्या अमेझची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.

अंतरंग

नव्या अमेझमध्ये डॅशबोर्ड बदलण्यात आला आहे. पियानो ब्लॅक अशा रंगात असलेला डॅशबोर्ड अधिक अत्याधुनिक करण्यात आला आहे. त्यात आयताकृती एसी व्हेंट्स आहेत. स्पीडोमीटर, टेकोमीटर, ओडोमीटर यांना निळ्या रंगाची झाक देण्यात आली आहे, जी की पूर्वी नािरगी रंगाची होती. टेकोमीटर आणि स्पीडोमीटर यांना आता एका छोटय़ा डिजिटल स्क्रीनची साथ देण्यात आली आहे. या छोटय़ा स्क्रीनवर तुमच्या इंधन टाकीत किती इंधन आहे, त्यावर तुम्ही किती प्रवास करू शकता, बाहेरील तापमान वगरे गोष्टी स्पष्टपणे कळू शकतात. तसेच तुम्हाला तुमच्या मोबाइलला कनेक्ट करण्यासाठी ब्ल्यू टूथ सुविधाही देण्यात आली आहे. एसीला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलची सुविधा आहे.

मायलेज

डिझेल मॉडेल हायवेला प्रतिलिटर २५ किमी तर शहरात २३ किमी मायलेज देते. तर पेट्रोल मॉडेल हाच मायलेज अनुक्रमे १७ आणि १५ किमीचा देते. पेट्रोल व्हर्जन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तर डिझेल मॉडेल फक्त मॅन्युअल गीअरमध्येच उपलब्ध आहे. पाच गीअरची गाडी आहे.

सुरक्षा

सुरक्षेच्या बाबतीत होंडाने कोणतीही तडजोड केलेली नाही. नव्या अमेझमध्ये डय़ुएल एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. तसेच अँटिलॉकिंग ब्रेकिंग सिस्टीम आहे. तुम्ही सीटबेल्ट लावायला विसरला असाल तर त्याची आठवण करून देणारी सिस्टीमही यात आहे. तसेच चालकाला त्याच्या सोयीनुसार सीट अ‍ॅडजस्ट करता येण्याची सुविधाही आहे.

चालवण्याचा अनुभव

अमेझचे डिझेल मॉडेल चालवण्याचा अनुभव मिळाला. अर्थातच हा अनुभव सुखावह होता. ब्रेकिंग सिस्टीम उत्तम. ट्रॅफिकमध्ये गाडी अगदी स्मूद होती. भर पावसात गाडी चालवतानाही कोणतीच अडचण जाणवली नाही. फक्त एकच गोष्ट खटकली आणि ती म्हणजे इंजिनाचा होणारा आवाज. गाडीच्या काचा खाली केल्या की हा आवाज जाणवण्याइतपत खटकतो. एरवी पाच जणांसाठी ही कॉम्पॅक्ट सेडान अगदी सर्वोत्तम ठरेल.

स्पर्धा कोणाशी?

  • स्विफ्ट डिझायर
  • फोर्ड फिगो अस्पायर
  • टाटा झेस्ट
  • फोक्सवॅगन अ‍ॅमियो

किंमत

पाच लाख ४० हजारांपासून पुढे

vinay.upasani@expressindia.comc