News Flash

टॉप गीअर : अ‍ॅक्टिव्हा १२५

अ‍ॅक्टिव्हा ही होंडाची ऑटोमॅटिक स्कूटरच्या पोर्टफोलिओतील सर्वात यशस्वी ठरलेली आहे.

अ‍ॅक्टिव्हा ही होंडाची ऑटोमॅटिक स्कूटरच्या पोर्टफोलिओतील सर्वात यशस्वी ठरलेली आहे. पारंपरिक अ‍ॅक्टिव्हा मॉडेल हे ११० सीसी सेगमेंटमध्ये आहे. गेल्या काही काळापासून ११० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या ऑटमॅटिक स्कूटरना मागणी वाढत आहे. सुझुकीची अ‍ॅक्सिस ही १२५ सीसी सेगमेंटमधील एक यशस्वी स्कूटर ठरली आहे. त्यामुळेच होंडाने १२५ सीसीमध्येही आपला जम बसविण्यासाठी होंडा अ‍ॅक्टिव्हा १२५ लाँच केली. सध्या उपलब्ध असणारी अ‍ॅक्टिव्हा १२५ ही सेकंड जनरेशन म्हणजे बीएस आयव्ही अर्थात, पर्यावरणाचे नवे मानक पूर्ण करणारी स्कूटर आहे. इंजिनच्या व्यतिरिक्त यामध्ये अन्य काही बदल होंडाने केले आहेत.

अ‍ॅक्टिव्हाला १२५ सीसीचे इंजिन असून, ८.५२ बीएचपी पॉवर मिळते. होंडाने पूर्णपणे नव्याने विकसित केलेले इंजिन होंडा इको टेक्नॉलॉजीने युक्त आहे. इंजिनची ताकद पिकअप घेताना चांगली असल्याचे जाणवते. तसेच, ताशी ७०-८० किमीचा वेग गाठल्यावरही इंजिनचे व्हायब्रेशन होत नाही. स्कूटर ही वेगाने चालविण्याचे वाहन नाही. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने मर्यादित वेगाचे भान आपण ठेवायला हवे. इकोनॉमी मोडवर म्हणजे स्कूटर चालविल्यास मायलेज मार खात नाही व वाहनाची झीजही फार होत नाही. १२५ सीसीचे इंजिन असल्याने शहराच्या ट्रॅफिकमध्ये मायलेज प्रति लिटर ४०-५० किमी, तर हायवेवर यापेक्षा अधिक म्हणजे ४५-५० किमी मिळू शकते. चालविणाऱ्यास हादरे कमी बसावेत यासाठी पुढील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिले आहे. तसेच, मागील बाजूस पारंपरिक सस्पेन्शन आहे. पण, दोन्ही सस्पेन्शन चांगली आहेत.

डिझाइन व स्टाइल याबाबत होंडाने अ‍ॅक्टिव्हा १२५ अधिक स्टायलिश करण्याचा प्रयत्न केला आहे. स्कूटरची बॉडी मेटलची असली तरीही लाइटवेट आहे. फ्रंट स्टायलिंग आकर्षक करण्यासाठी दोन्ही इंडिकेटरच्या मध्ये क्रोम दिली आहे. नव्या मॉडेलमध्ये एलईडी पायलट लॅम्प दिला आहे. त्यामुळे स्कूटरला एक प्रीमियम लुक मिळाला आहे. तसेच, ऑटोमॅटिक हेडलॅम्प ऑन हे फीचरही यात समाविष्ट करण्यात आले आहे. स्पीडोमीटर सेमी डिजिटल केला आहे. अलॉय व्हील्स, टय़ूबलेस टायर्स, कॉम्बी ब्रेकिंगसह पुढील बाजूस डिस्कब्रेकचा पर्याय दिला आहे. ग्रॅबरेलही थोडय़ा वेगळ्या पद्धतीचे आहे. १८ लिटरच्या डिक्कीसह मोबाइल चार्जरची सुविधा दिली आहे. पण, हे स्टँडर्ड फीचर नाही. पारंपरिक अ‍ॅक्टिव्हाच्या तुलनेत १२५ सीसीचे मॉडेल नक्कीच चांगले वाटते. यामध्ये प्रीमियम फील आहेत. तसेच, यातील मुख्य फरक हा स्पस्पेन्शन (११० सीसीच्या मॉडेलमध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन नाही) असून, अधिक सीसी हाही एक फरक आहे. मायलेजमध्ये दोन्ही स्कूटरमध्ये फार फरक नाही. त्यामुळेच ११० सीसीचा विचार करणाऱ्यांनी १२५ सीसी मॉडेल नक्कीच चालवून बघायला हरकत नाही. १२५ सीसी मॉडेल डिलक्स, स्टँडर्ड, स्टँडर्ड अलॉयमध्ये उपलब्ध आहे.

अ‍ॅक्टिव्हा १२५ सीसीची स्पर्धक असलेल्या नव्या अ‍ॅक्सेसला १२५ सीसी, टेलिस्कोपिक स्पस्पेन्शन, टय़ूबलेस टायर्स, सेमी डिजिटल कन्सोल आदी फीचर दिली आहेत. तसेच, यास थोडा रेट्रो लुकही दिला आहे. मात्र, तो लुक प्रत्येकाला आवडेलच असे नाही. अ‍ॅक्टिव्हा ब्रँडची असणारी छाप, १२५ सीसीमध्ये करण्यात आलेले बदल यांच्यामुळे अ‍ॅक्टिव्हा १२५ नक्कीच चांगली आहे.

obhide@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 2:13 am

Web Title: information honda activa 125
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 अर्ज ‘किआ’ है..
3 टॉप गीअर : होंडा एव्हिएटर
Just Now!
X