13 December 2017

News Flash

टॉप गीअर : स्कूटर उत्पादक ते मोटरसायकल निर्माती

सीबीझीमुळे निर्माण झालेली बाजारपेठ ही नवी संधी असल्याने, अनेक कंपन्या या सेगमेंटकडे वळल्या.

ओंकार भिडे | Updated: March 17, 2017 3:04 AM

भारतात १२५ सीसीपेक्षा अधिक सीसीची मोटरसायकल विकली जाऊ शकते आणि याला वाढता वर्ग असल्याचे तत्कालीन हिरो होंडाच्या सीबीझी या मोटरसायकलने दाखवून दिले होते. दीडशे सीसी, उत्तम पिकअप, स्पोर्टी स्टाइलिंग, डिस्कब्रेक, बटनस्टार्ट याच्यामुळे आपली स्वतची अशी वेगळी ओळख निर्माण होत असल्याची भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळेच विशेषत तरुणाईमध्ये या मोटरसायकलची क्रेझच होती, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. याच काळात देशातील अन्य दुचाकी उत्पादक कंपन्यांना मोटरसायकलची नवी बाजारपेठ खुणावत होती. तशी याची सुरुवात १९९७-९८ पासूनच झाली होती. कारण देशातील गीअर स्कूटरची बाजारपेठ कमी होऊ लागली होती आणि देशातील आघाडीच्या स्कूटर उत्पादक कंपनीपुढे प्रश्न निर्माण झाले होते. पारंपरिक मोटरसायकलच्या बाजारपेठेत बजाज ऑटोपुढे हिरो होंडाच्या स्प्लेंडरचे आव्हानच होते आणि अनेक उत्पादने सादर करूनही हवी तशी बाजारपेठ कंपनीला मिळवण्यात बजाज ऑटोला अडचण येत होती.

सीबीझीमुळे निर्माण झालेली बाजारपेठ ही नवी संधी असल्याने, अनेक कंपन्या या सेगमेंटकडे वळल्या. बजाज ऑटोही याला अपवाद नव्हती. हिरो होंडाची सीबीझी १९९९ च्या आसपास बाजारपेठेत आली होती. मात्र, बजाज ऑटोने लगेचच या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची घाई केली नाही. स्वतला संशोधन आणि विकासासाठी वेळ दिला आणि २००१च्या अखेरीस कंपनीने पूर्णपणे नवी भारतीय तंत्रज्ञानाने बनविण्यात आलेली पल्सर मोटरसायकल बाजारपेठेत लाँच केली. कंपनीच्या अन्य मोटरसायकलपेक्षा ही पूर्ण वेगळी होती आणि यास १५० सीसीचे सिंगल सििलडरचे १३ एचपीचे इंजिन बसविण्यात आले होते. कंपनीने डिस्कब्रेक हे स्टँडर्ड फीचर म्हणून या मोटरसायकलला दिले. रचनेच्या बाबतीत मोटरसायकल उजवी होती. पल्सरला बाजारपेठेतून प्रतिसाद मिळू लागला होता. दीडशे सीसी मोटरसायकल घेणाऱ्यांमध्ये पल्सरची चर्चा होत होती. तसेच, कंपनीने किंमतही स्पर्धक कंपनीच्या तुलनेत आकर्षक ठेवली होती. हे करत असतानाच कंपनीने पल्सरमध्ये सुधारणा करण्यावर भर दिलेला होता. त्याचाच एक भाग म्हणून २००१-०२ मध्ये १८० सीसीचे मॉडेल लाँच झाले. यास बटन स्टार्ट स्टँडर्ड फीचर (१५० सीसीला बटन स्टार्टचा पर्याय दिला) आणि १५ एचपी पॉवर देण्यात आली होती. हे मॉडेल येईपर्यंत बाजारपेठेत २०० सीसीच्या आतील मॉडेल उपलब्ध नव्हते. त्यामुळे बाजारपेठेतून पल्सरला मागणी वाढू लागली. बाजारपेठेतील आपले स्थान भक्कम करण्यासाठी आणि पल्सरच्या रूपाने मिळालेले चेतक रूपी यशाचा अश्वमेध आघाडीवर ठेवण्यासाठी कंपनीने २००३ मध्ये डीटीएसआय टेक्नॉलॉजी, ट्विन स्पार्कप्लग असलेले पल्सरचे पूर्णपणे नवे मॉडेल बाजारपेठेत लाँच केले. यामध्ये पहिल्या पल्सरच्या तुलनेत एचपी १ने वाढविण्याबरोबर मायलेज वाढविण्यावर भर देण्यात आला. तसेच, आधीच्या राऊंड हेडलॅम्पच्या जागी नवा हेडलॅम्प येण्याबरोबर त्यास पायलट लॅम्पही आले. याही मॉडेलला बाजारपेठेत प्रतिसाद मिळाला. मोटरसायकल अधिक आकर्षक, स्पोर्टी बनविण्याचे प्रयत्न कंपनीने चालूच ठेवले आणि याचाच एक भाग म्हणून कंपनीने ऑलॉय व्हील्स, न्रिटॉक्स शॉअबसॉर्बर, अधिक मोठा फ्यूएल टँक असणारे पल्सरचे नवे मॉडेल लाँच केले. देशात प्रथमच १७ इंच ऑलॉय व्हील्स दुचाकीच्या मागील चाकास देण्यात आले होते. यामुळेही पल्सरची लोप्रियता वाढण्यास मदत झाली. तसेच, कंपनीने फीअर द ब्लॅक नावाने केलेली पल्सरचा स्पीड दर्शविणारी जाहिरातदेखील अपििलग होती.

कंपनीने सतत ग्राहकांना नवीन देण्याचा प्रयत्न चालूच ठेवला आणि २००६-०७ मध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. यात मोटरसायकलमध्ये सेमी डिजिटल स्पीड कन्सोल, एलईडी टेल लॅम्प, कारप्रमाणे ऑटोमॅटिक टर्नऑफ होणारे इंडिकेटर, बॅकलिट स्विच, स्वतंत्र पायलट लॅम्प दिला आणि देशातील मोटरसायकलच्या बाजारपेठेत अशी फीचर असणारी पल्सर ही पहिलीच मोटरसायकल ठरली. हे करताना कंपनीने मोटरसायकलच्या इंजिनमध्येही सुधारणा केल्या. चालविणाऱ्या उच्चतम स्पीडवर व्हायब्रेशन कमी मिळावेत यावर भर देण्याबरोबर गीअरशिफ्टमध्ये बदल केला. या सर्व गोष्टी बाजारपेठेतील अन्य स्पर्धक कंपन्यांच्या मोटरसायकलमध्ये नव्हत्या. तसेच, कंपनीने २२०सीसीची डीटीएस-एफआय (फ्यूएल इंजेक्शन) असणारी पल्सर २००७ मध्ये बाजारात लाँच केली. याला ऑइल कूल्ड असणारे २२० सीसीचे इंजिन व १९.५० बीएचपी दिली. तसेच, रेअर डिस्कब्रेक्स, क्लिपऑन हँडलबार, सेमी नेकेड फेअिरग दिले. याचा काळात बजाज ऑटोने नवे ब्रँड कम्युनिकेशन लाँच केले. यामध्ये जुन्या हमारा बजाज जाहिरातीचे आधुनिक स्वरूप दाखविण्यात आले.

याच काळात टीव्हीएस, यामाहा, हिरो होंडा यांच्या दीडशे ते २२० सीसी मोटरसायकल बाजारपेठेत उपलब्ध होत्या. यामध्ये फिएरो, अपाचे, सीबीझी या मोटरसायकलचा समावेश होता. पल्सरला हिरो होंडाच्या करिझ्मा या मोटरसायकलची स्पर्धा २००३ पासून सुरू झाली. मात्र, करिझ्माचा करिश्मा त्या तुलनेत जास्त दिसलेला नाही. बजाज ऑटोने २०१० पर्यंत पल्सरमध्ये अनेक छोटे-मोठे बदल केले. तसेच, कम्युटर सेगमेंटपर्यंत मजल मारू शकणाऱ्या ग्राहकाला आकर्षति करण्यासाठी कंपनीने २०१० मध्ये पल्सर १३५एलएस हे पल्सरचे १३५ सीसीचे मॉडेल लाँच केले. मात्र, कमी सीसीच्या पल्सरला बाजारपेठेने स्वीकारले नाही. असे असले तरी एकेकाळी स्कूटरची कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बजाज ऑटोची नवी ओळख मोटरसायकल बनविणारी कंपनी, अशी पल्सरमुळे नक्कीच झाली आहे.        (पूर्वार्ध)

ओंकार भिडे obhide@gmail.com

First Published on March 17, 2017 3:04 am

Web Title: scooter manufacturers to motorcycle producer