23 January 2018

News Flash

सुरक्षित एसयूव्ही, तिगुआन

फोक्सवॅगनने मोठय़ा दिमाखात भारतीय एसयूव्ही बाजारात प्रवेश केला आहे.

समीर ओक | Updated: August 4, 2017 12:58 AM

सर्वसामान्यांना ८ ते १५ लाख रुपयांपर्यंतची कार घेणे सुलभ जाते. मात्र आता २५ ते ३५ लाख रुपयापर्यंतच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हींची बाजारात वाढती मागणी आहे. ७ आसनी एसयूव्ही गाडय़ांचा दबदबा असणाऱ्या सेगमेंटमध्ये फोक्सवॅगनने आपली ५ आसनी एसयूव्ही तिगुआन बाजारात दाखल केली आहे. बीएमडब्लू एक्स१ आणि मर्सिडीज-बेंझ जीएलएसारख्या लक्झरी एसयूव्हींना स्वस्त पर्याय म्हणून फोक्सवॅगनच्या तिगुआनचा विशेष पर्याय आहे.

फोक्सवॅगनने मोठय़ा दिमाखात भारतीय एसयूव्ही बाजारात प्रवेश केला आहे. मात्र गाडय़ांची किंमत जवळपस २७.९८ लाख ते ३१.३८ लाख रुपये (एक्स शोरूम, नवी दिल्ली; वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या पूर्वीची किंमत) आहे. ही किंमत सर्वसामान्यांसाठी निश्चितच जास्त आहे. खरेतर, टोयोटा फॉच्र्युनर आणि फोर्ड एंडेव्हरसारखी सात मोठी मोठी आसने असणाऱ्या कारच्या किमतीपेक्षा ही किंमत जास्त आहे. मात्र, ही कार कुटुंबासाठी लक्झरी आणि सुरक्षित असा अनुभव देणारी असल्याने तिगुआन भारतीय बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण करेल यात शंका नाही.

डिझाइन

२०१७ च्या मे महिन्यात फोक्सवॅगनने तिगुआन ही अतिशय दिमाखदार लूक असणारी एसयूव्ही भारतात दाखल केली. या गाडीचे डिझाइन इतर गाडय़ांप्रमाणे दिसायला अतिशय सुबक आहे. कंपनीने अनेक दिमाखदार वैशिष्टय़े तिगुआनमध्ये देण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही. यापूर्वीच्या एसयूव्हींप्रमाणे यामध्ये कोणतेही साम्य नाही, ही यातील एक चांगली बाब म्हणायला हरकत नाही. या किमतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या इतर एसयूव्ही या भव्य आणि अवजड आहेत. मात्र तिगुआनमधील अत्याधुनिक डिझाइनचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येतो.तिगुआनचा पुढील भाग हा नवीन जनरेशनच्या सेडानसारखाच आहे. फोक्सवॅगनने क्रोमचा वापर अतिशय उत्तम प्रकारे रेडियेटल ग्रिल आण एअर डॅम पुढील बम्परवर केला आहे. बोनेट ग्रिलमध्ये व्हीच्या आकारात जोडण्यात आली आहेत. पुढे तुकतुकीत अशा एलईडी हेडलाइट्स देण्यात आल्या आहेत. या एलईडी हेडलॅम्पपुळे तिगुआनचा पुढील भाग अतिशय आकर्षक वाटतो. ३ झोन एसी,  ड्राइव्ह मोड, अ‍ॅक्टिव्ह हूड, एबीएस, ईएससी, टायर प्रेशर मॉनिटरिंग, पॅडल शिफ्ट, इलेक्ट्रिक अ‍ॅडजस्ट होणारी चालकाची सीट, क्रूज कंट्रोल, अ‍ॅण्ड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कार प्ले टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हीटिड फ्रंट सीट्ससारखी अत्याधुनिक वैशिष्टय़े यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. अधिक वैशिष्टय़ांमध्ये पॅनारोमिक सन रूफ, इझी ओपन बूट, पूश बटन स्टार्ट यांचा समावेश आहे. त्यामुळे या गाडीतील प्रवास कंटाळवाणा होत नाही. गाडीचा मागील भाग अतिशय साधा दिसत असला तरीही त्यावरील डिझाइन अतिशय सुबक असे आहे. ते कमी बॅजिंगसह ठेवण्यात आले आहे.  या गाडीतील पुढील दोन्ही सीट अतिशय आरामदायक आहेत.

प्लॅस्टिक क्वॉलिटी आणि फिट फिनिशिंग लक्झरी कारप्रमाणे आहे. चालकाला गाडी चालवताना योग्य वातावरण राहील याची काळजी यामध्ये घेण्यात आली आहे. पारंपरिक इतर एसयूव्हींच्या तुलनेत या गाडीतील अंतर्गत रचना अतिशय वेगळय़ा धाटणीची आहे. केबिनची रचना अतिशय आकर्षक आहे. चालकाला आवश्यक ते ठिकाण शोधून देण्यासाठी यूआय टचस्क्रीन दिमतीला आहेच.

कामगिरी

तिगुआनचा सगळय़ात महत्त्वाचा भाग म्हणजे या गाडीची कामगिरी अर्थात परफॉरमन्स. आंतरराष्ट्रीय पातळीवर फोक्सवॅगन तिगुआन अनेक पॉवरट्रेन्स ऑफर करते. तथापि, भारतामध्ये २.० लिटरचे डिझेलचे इंजिन यामध्ये असून, ते १४२ बीएचपीची पॉवर आणि ३४० एनएम टॉर्क देते. इंजिन अतिशय स्मूत चालते. ही गाडी रस्त्यावरील आपली पकड कायम ठेवते. याबाबत इतर गाडय़ांमध्ये ही गाडी सर्वात आघाडीवर आहे. इंजिनसोबत ७ स्पीड डीएसजी गीअरबॉक्स देण्यात आले असून, शहर आणि महामार्गावरून ही गाडी चालवण्यास कोणताही त्रास जाणवत नाही. ऑल व्हील ड्राइव्हचा पर्यायही यामध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे वेगवेगळय़ा हवामानामध्ये, हिमवर्षांव सुरू असताना याचा उपयोग होऊ शकतो. यामुळे गाडीतील स्टीयरिंग फील, पॉवरट्रेन आणि वाहनामधील वातानुकूलित यंत्रणा बदलण्यास मदत होते.

चालविण्याचा अनुभव

फोक्सवॅगन तिगुआन एमक्यूबी प्लॅटफॉर्मवर आधारित असल्याने ती वजनाला हलकी आहे. गाडीला उत्तम प्रकारचे सस्पेन्शन असल्याने गाडीमध्ये बसल्यानंतर रस्त्यावरील खड्डय़ांचा फारसा परिणाम जाणवून येत नाही. ज्यावेळी खडबडीत रस्त्यावरून गाडी जात असते त्यावेळी केबिनमधील एनव्हीएच पातळी प्रभावीत होते. त्यामुळे गाडी विनाअडथळा पुढे जात राहते. तिगुआनचे सेल्फ सीलिंग टायर्स आहेत. यामुळे उत्तम ब्रेक लागतो. मायलेजच्या बाबतीतही तिगुआन (१७.०६ किमी प्रति लिटर) उत्तम आहे. त्यामुळे ती भारतीयांच्या पसंतीस उतरू शकते.

या गाडय़ांशी स्पर्धा

 • टोयोटा फॉच्र्युनर,
 • फोर्ड एंडेव्हर,
 • ुंदाई टक्सन एसयूव्हींसह
 • ऑडी क्यू३,
 • बीएमडब्ल्यू एक्स१,
 • मर्सिडीज जीएलए २००,
 • पजेरो लक्झरी एसयूव्ही

वैशिष्टय़े

 • इंजिन : २.० लिटर
 • पॉवर : १४१ बीएचपी
 • टॉर्क : ३४० एनएम
 • इंधन प्रकार, क्षमता : डिझेल, ७१ लिटर
 • मायलेज : १७.०६ किमी प्रति लिटर
 • पॉवर विंडो : पुढील आणि मागील
 • ब्रेक : डिस्क ब्रेक

किंमत

२७.९८ ते ३१.३८ लाख रुपये (एक्स शोरूम)

ls.driveit@gmail.com

First Published on August 4, 2017 12:58 am

Web Title: volkswagen tiguan
 1. No Comments.