पॅशन आणि संबंधित कृतीमागील ऊर्जा एकत्र आली की अनोखं काही तरी घडतं. फेरारी या ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील नावाचंही तसंच आहे. प्रसिद्ध दूरचित्रवाणी सादरकर्ता जेरेमी क्लार्कसन यानेही या फेरारीचं वर्णन देवाची देणं असंच केलं आहे.
तर एन्झो फेरारी हा फेरारीचा संस्थापक. संपूर्ण आयुष्य केवळ स्पोर्ट्स कारच्या निर्मितीकरिता खर्ची घालणारा आणि त्यातूनच जगातील बलाढय़ वाहन उत्पादक कंपनी तयार करणारा एन्झो. या विश्वात अवतरली नाही अशा कारची निर्मिती त्याने केली. फेरारीच्या कारचित्रांनी अनेक वाहनवेडय़ांच्या खोल्या सजलेल्या सहजच पहायला मिळेल. अनेकांची ही स्वप्न कार आहे.
फेरारी बॅ्रण्डबद्दल अनेकांना काही गोष्टींबद्दल माहिती असण्याची शक्यता कमीच. निवडक रस्त्यांवर धावणारी मात्र अधिकांच्या पसंतीची ही कार वाहनप्रेमींची सख्या वाढवत आहे. पण ३०० किलो मीटर प्रती तास धावू शकणाऱ्या फेरारीचं वेड असणं साहजिकच आहे.
प्रत्येक वाहन उत्पादकाला त्याची वाहने अधिकाधिक विकली जावी, असं वाटणं स्वाभाविकच आहे. आणि अर्थात त्याद्वारे अधिक पैसा मिळविण्याचं उद्दीष्टही क्रमप्राप्तच. फेरारीबाबत मात्र तसं नाहीय. ही कंपनी वर्षांला केवळ ७०० कार तयार करते. ती त्या अधिकही तयार करू शकते; मात्र ती तसं करत नाही. पण तेही चांगल्या कारणासाठी. ब्रॅण्ड इमेज जपण्यासाठी अधिक मागणी असूनही मर्यादित वाहन पुरवठा कंपनीकडून केला जातो. फेरारीच्या कार या अधिक मूल्यवान आहेत. कारण अधिकांची खरेदीची इच्छा असूनही, मागणी असूनही तिचा पुरवठा मुद्दामच कमी ठेवण्यात आला आहे. यूनिकनेस जपण्यासाठी कंपनी वेगाने उत्पादन अथवा भरमसाठ विक्री करत नाही. ही महागडी कार घेण्यासाठी खरेदीदार अधिक पैसे मोजायलाही तयार असतात. फेरारीनं वाहनातील एखादी स्पेशल एडिशन सादर केली तर ती शोरुममध्ये पोहोचण्याआधीच तिची मागणी नोंदविलेली असते. फेरारीच्या ब्रॅण्डची ही कमाल आहे.
फेरारी गुंतवणुकीच्याबाबतही उत्तम आहे. फेरारी २५०जीओ बर्लिनेट्टा ही १९६२ मध्ये तयार करण्यात आली होती. नुकताच तिच्या एका कारचा लिलाव झाला. त्याला किती किंमत मिळाली? तर ३४.६५ दशलक्ष डॉलर. म्हणजेच भारतीय चलनात २३० कोटी रुपये. आणि ही जगातील एक महागडी कार ठरली..
प्रणव सोनोने pranav.sonone@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Automotive excellence
First published on: 13-05-2016 at 01:43 IST