राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर प्रोफेसर नईमा खातून यांची कुलगुरुपदी नियुक्त करण्यात आली. त्याआधी १९२० ते १९३० या काळात सुलतान जहां बेगम यांची अलिगढ मुस्लिम युनिर्व्हसिटीच्या पहिल्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली होती.

अलिगढ मुस्लिम युनिर्व्हसिटीची स्थापना १८७५ साली सर सय्यद अहमद खान यांनी केली. सुरुवातीला मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज या नावाने विद्यापीठाची ओळख होती. हेच कॉलेज पुढे जाऊन १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणून नावारुपास आले. युनिर्व्हसिटी म्हणून दर्जा प्राप्त झाल्यानंतर १९२० सालीच सुलतान जहां बेगम या युनिर्व्हसिटीच्या कुलगुरू बनल्या. त्या १९३० पर्यंत या पदावर कायम होत्या. त्यानंतर कित्येक दशके या पदावर पुरुषांचे वर्चस्व होेते. जवळपास १०० वर्षांनंतर पहिल्यांदा या विद्यापीठाला नईमा खातून यांच्यारुपात महिला कुलगुरू मिळाल्या आहेत.

हेही वाचा – स्त्री आरोग्य : गर्भनिरोधासाठी ‘सेफ पिरियड’ किती सेफ? 

नईमा खातून यांचं बालपण ओरिसा राज्यातील एका सामान्य कुटुंबात गेलं. त्यांचं शिक्षणदेखील याच युनिव्हर्सिटीमधून झालं आहे. त्यांनी राजकीय मानसशास्त्र (Political Psychology) मध्ये डॉक्टरेट मिळवली असून त्या या विषयातल्या तत्ज्ञ आहेत. त्या १९८८ पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या एएमयू लेडिज कॉलेजच्या मुख्याध्यापिका व राजकीय मानसशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. तसेच मध्य अफ्रिकेतील नॅशनल युनिर्व्हसिटी ऑफ रवांडा येथे प्राध्यापिका म्हणून एक वर्ष काम केले आहे. त्यांचा ३६ वर्षांचा शिक्षणक्षेत्रातला अनुभव आणि योगदान पाहूनच त्यांची अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विराजमान होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.

ऑक्टोबर २०१५ पासून त्या सेंटर फारॅ स्किल डेव्हलपमेंट अँड करिअर प्लॅनिंग एएमयू विभागच्या संचालक म्हणूनसुद्धा कार्यरत आहेत. नईमा यांच्या नियुक्तीआधी त्यांचे पती मोहम्मद गुलरेझ हे एप्रिल २०२३ ते २३ एप्रिल २०२४ अलिगढ मुस्लिम युनिवर्सिटीचे काळजीवाहू कुलगुरू म्हणून काम पाहत होते.

हेही वाचा – “हिंदू महिला मृत पतीच्या मालमत्तेचा उपभोग घेऊ शकते, पण…”, उच्च न्यायालयाने नोंदवलं महत्त्वाचं मत!

नईमा खातून प्राध्यापिका असून एक प्रख्यात लेखिकासुद्धा आहेत. त्यांनी आजवर आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात स्तंभलेखन केले आहे. तुर्की, रोमानिया, बँकॉक, अमेरिका यासह अनेक देशांत व्याख्यानेसुद्धा दिली आहेत. त्यांनी आतापर्यंत सहा पुस्तकांचे लेखन आणि संपादन केले असून, त्या क्लिनिकल, हेल्थ, अल्पाइड सोशल आणि आध्यात्मिक मानसशास्त्र (Spiritual Psychology) तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत.

प्राध्यापक नईमा खातून यांची नियुक्ती ही महिला सबलीकरणाच्या दिशेनं एक मोठं पाऊल आहे असं म्हटलं जात आहे. नईमा यांची नियुक्ती म्हणजे एएमयूच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे भविष्यात महिलांना शैक्षणिक आणि इतर उच्च ठिकाणी नेतृत्वपद मिळविण्याचा मार्ग मोकळा होण्यास प्रेरणादायी ठरेल असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.