लिंक्डइनवर ‘ऐश्वर्या तौकरी’ [Aishwarya Taukar] नावाच्या तरुणीने शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये लिहिल्यानुसार ऐश्वर्या ही त्यांच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती आहे, जिने मास्टर्सची पदवी प्राप्त केली आहे. स्वतःचे करियर घडवण्यासाठी, घर सोडण्यापासून ते वय लहान असताना घरच्यांच्या लग्नाच्या मागण्यांना ठामपणे नकार देणे अशा अनेक समस्यांचा सामना ऐश्वर्याने केला असल्याचे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. स्वतंत्रपणे स्वतःला घडविण्यासाठी ऐश्वर्याला नेमक्या कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागले आहे पाहूया.

ऐश्वर्या तिच्या चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहे, असे तिने लिहिलेल्या पोस्टवरून समजते. “मागच्या आठवड्यात मास्टर्सची पदवी प्राप्त करून, मी आमच्या कुटुंबामधील ‘मास्टर्स पदवी’ शिक्षण पूर्ण करणारी पहिली ठरले असून; मी शेवटची व्यक्ती नसेन याची मला खात्री आहे. आमच्या कुटुंबात, गाव सोडून जाणारी, कॉलेजमध्ये अभ्यास करणारी, पदवी प्राप्त करणारी, ऑफिसला जाणारी आणि वेगळ्या देशात राहणारी मी पहिलीच आहे”, असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा : दोन पानी रेझ्युमेने मिळवून दिली Google अन् Microsoft कंपनीत नोकरीची संधी! पाहा सोनाक्षी पांड्येचा प्रवास

लहानपणी गल्लीतील मुलांबरोबर क्रिकेट खेळण्यापासून ते लहान वय असतानाच लग्न लावून देण्याच्या घरच्यांच्या निर्णयांना खंबीरपणे नकार देत ऐश्वर्याने आपले विचार स्पष्टपणे घरच्यांसमोर मांडण्यास सुरुवात केली. इतकेच नाही, तर आपल्याला शिक्षण घेऊन पुढे काहीतरी करायचे आहे हे विचारदेखील पालकांना समजावून देण्याचा प्रयत्न तिने केला. नंतर वयाच्या केवळ १९ व्या वर्षी ऐश्वर्याने त्यांच्या लहानशा शहराबाहेर असणारी इंटर्नशिप स्वीकारली. २१ व्या वर्षी स्वतःचे घर सोडून भारतातील सर्वात गजबजलेल्या शहरात राहण्यास सुरुवात केली.

कम्युनिकेशन शाळेत शिक्षण घेत असताना ऐश्वर्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता. मात्र, अशावेळीही तिला तिच्या कुटुंबाकडून प्रोत्साहन मिळण्याऐवजी, त्यांच्या “या सगळ्या गोष्टी लहान शहरातील मुलींच्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत”, अशा विचारांचा सामना करावा लागत होता.

ऐश्वर्याने लिहिलेल्या पोस्टमधून असे समजते की, तिने मोठ्या PR फर्ममध्ये काम करून अनेक गोष्टी शिकून उत्तम प्रगती केली होती. त्यानंतर, या कामामधून २.५ वर्षांची विश्रांती घेण्याचा निर्णय तिने घेतला. विश्रांती घेतल्यानंतर ऐश्वर्याने स्वयंसेवी कामे आणि स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगण्यास सुरुवात केली. यात तिने पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशी जाण्याचा निर्णय घेतला. तिथे “तुमचा कामाचा अनुभव पुरेसा नाही”, असे ऐकूनदेखील ऐश्वर्या खचून गेली नाही. उलट दोन नोकऱ्या सांभाळून ऐश्वर्याने तिच्या पुढच्या शिक्षणाला पुन्हा एकदा सुरुवात केली. “कमी अनुभव आहे म्हणून हार मानू नका. त्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून, स्वतःच्या भल्यासाठी स्वतःमध्ये सतत बदल करत पुढे जात राहा”, असे ऐश्वर्याने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

“कोणतीही गोष्ट करण्यासाठी प्रथम असणे, हे कोणत्याही ठिकाणी कायम भीतीदायकच असते. त्यामुळे प्रथम असणे म्हणजे ‘परफेक्ट’ असणे गरजेचे नाही. कोणत्याही अडथळ्यांशिवाय, चुकीच्या निर्णयांशिवाय, फेरविचारांशिवाय हा प्रवास होणे अशक्य आहे. मी किती चुका केल्या आहेत हे देवाला बरोबर माहीत आहे”, असे ऐश्वर्याने लिहिले आहे.

हेही वाचा : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘ट्रॅक्टर क्वीन’ कोण? जाणून घ्या भारतातील सर्वांत श्रीमंत महिला उद्योजकाची माहिती….

“याचा अर्थ असा आहे की, तुम्ही दररोज थोडे-थोडे पुढे जात आहेत, मात्र ती प्रगती पटकन कुणाच्या लक्षात येत नाही. परंतु, तुम्ही तयार केलेल्या मार्गावरच तुमच्या नंतर येणारी व्यक्ती पुढे जाणार आहे किंवा कदाचित ते त्यांचा स्वतःचा मार्ग निर्माण करू शकतील.” असे लिहून लिंक्डइनवरून ऐश्वर्याने तिचा प्रवास थोडक्यात शेअर केला आहे.

शेवटी, “स्वतःला कायम प्रगतीच्या दिशेने ढकलत राहा, तुम्हाला यश नक्की प्राप्त होईल आणि जरी तुम्ही तुमच्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाहीत, तरीही तुम्ही आधीपेक्षा अधिक कुशल आणि खंबीर नक्कीच झाला असाल”, असा सल्ला देत ऐश्वर्याने आपली पोस्ट संपवली आहे.