scorecardresearch

Premium

ग्राहकराणी : तक्रारीत तथ्य असेल तरच करा तक्रार

एखादी महागडी वस्तू विकत घेतली आणि ती बिघडली असं समजून संतापून एखादा ग्राहक त्या दुकानात तक्रार नोंदवायला जातो. तिथंही समाधान झालं नाही, तर थेट ग्राहक तक्रार निवारणाकडे जाण्याचा विचार सुरू करतो. पण आपल्या तक्रारीत खरंच तथ्य आहे का, याची शहानिशा आधी करायला हवी, मगच पुढचं पाऊल टाकायला हवं.

Consumer, products, consumer court, shopkeeper, complaints
ग्राहकराणी : तक्रारीत तथ्य असेल तरच करा तक्रार ( photo courtesy – freepik )

अर्चना मुळे

नमाच्या घराची वास्तुशांत होती. तिची बहीण गीताने तिला मिक्सर ज्यूसर गिफ्ट केलं होतं. आठ दिवसांनी घराची आवराआवर झाल्यावर नमाने ज्यूसर काढला. घरात भरपूर संत्री होती. ज्यूस करावा म्हणून तिने त्याची सगळी तयारी केली आणि ज्यूसर सुरू केला, पण काही केल्या ज्यूसर सुरू होईना. नमाची चिडचिड सुरू झाली.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
How to deal with a difficult boss
तुमचा बॉस निर्दयी स्वभावाचा आहे का? खडूस बॉसबरोबर कसे वागावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स….
Loksatta chaturanga Governor Ramesh Bais Consider changing school timings
शाळेची वेळ: सकाळची की दुपारची?

तिने गीताला फोन लावला. ज्यूसर सुरू होत नसल्याचं सांगितलं. एवढं करून ती थांबली नाही. तिने दुसऱ्याच दिवशी ज्यूसर गीताकडे परत पाठवला. गीतानेही तो वापरून न बघता जिथून ज्यूसर घेतला त्या दुकानात फोन लावला. फोन उचलला गेला नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी ती मिक्सरचा बाॅक्स घेऊन थेट दुकानात गेली. तिथं मालकाला म्हणाली, “हा मिक्सर सुरू होत नाही. कसला खराब मिक्सर दिलाय. मला तो बदलून हवाय.”

“अहो वहिनी, नवीन मिक्सर आहे. तुम्हाला फंक्शन्स कळली नसतील. मिक्सर घेऊन जा. मी माणूस पाठवतो. तो तुम्हाला फंक्शन्स नीट समजावून सांगेल.”

तीस वर्षं मी मिक्सर वापरते. मला काही सांगू नका. मला मिक्सर बदलून हवाय. तिने रागाने मिक्सर तिथंच ठेवला आणि घरी आली. दुसऱ्याच दिवशी तिने थेट ओळखीच्या वकिलाचं ऑफिस गाठलं. वकिलांसमोर तिने भरपूर बडबड केली आणि शेवटी म्हणाली, “आत्ताच्या आत्ता त्या दुकानदाराविरोधात मला ग्राहक मंचाकडे तक्रार करायची आहे.”

“बोला… तक्रारीमध्ये काय लिहायचंय?” वकिलाने विचारलं.

“ते मला काय माहीत? वकील तुम्ही आहात ना? त्या दुकान मालकाविरुद्ध मिक्सर बदलून देत नाही म्हणून तक्रार नोंद करा.”

“बरं… एक सांगा. तुम्ही हा मिक्सर शेवटचा कधी चालवून बघितला?”

“माझ्या बहिणीने बघितला. नाही सुरू झाला.”

“पण दुकानदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना मिक्सरचे फंक्शन्स कळले नसतील असं असू शकतं.”

“काहीही काय? तुम्ही तक्रार नोंदवा आणि विषय संपवा बघू.”

“हे बघा ताई. ग्राहक न्यायालयाकडे तक्रार नोंदवणं सोपं असतं; परंतु आपल्या तक्रारीतही खरेपणा असायला हवा. आपल्याला राग आला. म्हणून आपण तक्रार करू शकत नाही. आत्ता तुम्हाला खूप राग आलाय. रागाच्या भरात अशी उगीचच तक्रार करणं योग्य नाही. वकील असलो तरी ज्या केसमध्ये काही तथ्यच नाही ती केस मी घेत नाही.”

“असं काय करताय? मी किती आशेने आले तुमच्याकडे.”

“थांबा मी तुम्हाला एक केस समजावून सांगतो. एका व्यक्तीने एका मोठ्या कंपनीविरोधात अशीच एक तक्रार ग्राहक मंचाकडे केली होती. बऱ्याच वेळा कंपनीकडे तक्रार करूनही त्यांनी ऐकलं नाही, असं त्या ग्राहकाचं म्हणणं होतं. त्या ग्राहकाने बिल, वाॅरंटी कार्ड सगळं तक्रार अर्जासोबत जोडलं होतं, परंतु त्याच्या ज्यूसर मिक्सरमध्ये बिघाड आहे हे सिद्ध करणारं एकही कागदपत्र तो जमा करू शकला नव्हता. त्याच्या तक्रारीसाठीचा ठोस पुरावा नसल्याने ग्राहक न्यायालयाने ग्राहकाच्या विरोधात निकाल दिला. तुमच्या आणि त्याच्या तक्रारीमधलं साम्य मला जाणवतंय. अहो, तुम्ही दुकान मालकाकडे किंवा मिक्सर कंपनीकडे कुठलीही लेखी तक्रार केली नाही. दुकानदाराने बिघडलेला मिक्सर तुम्हाला विकला याचे कोणतेही पुरावे तुमच्याकडे नाहीत. तुम्ही कंपनीच्या कस्टमर केअरकडे लेखी तक्रार नोंदवा. मिक्सर बिघडलेला असल्याचे पुरावे गोळा करा. मग माझ्याकडे या. मी तुम्हाला ग्राहक न्यायालयातून न्याय मिळवून देईन.”

गीताला वकिलांचं म्हणणं पटलं. तिने विचार केला, की आपण एकदा मिक्सर चालवून बघायला काय हरकत आहे. ती दोन दिवसांनी दुकानात जाऊन म्हणाली, “मला वाटतं, मी तो मिक्सर एकदा लावून बघावा. तुम्हाला त्याचे फंक्शन माहीत असतीलच.”

दुकानदाराने तो लावून बघितला तर सहज सुरू झाला. ही गोष्ट पहिल्याच दिवशी करायला हवी होती, असं दोघांनाही वाटलं. विनाकारण आठ-दहा दिवस मानसिक त्रासात गेले होते. गरज नसताना वकिलाचं ऑफिस गाठलं होतं. तिला स्वत:चाच राग येत होता. तिने नमाकडे मिक्सर पाठवला. तिने मिक्सर जोडताना, सुरू करतानाचा व्हीडिओ तिला व्हाॅट्सॲपवरून पाठवला. ती मेसेजमध्ये म्हणाली, “अगं नमा, एकदा नीट वाचायचं ना. त्याच्यासोबत दिलेल्या माहितीपुस्तिकेत सगळं लिहिलेलं असतं.” अगदी खरं आहे की, ग्राहक तक्रार निवारण मंच ग्राहकांना हक्क मिळावा यासाठीच देश, राज्य, जिल्हा पातळीवर निर्माण करण्यात आले आहेत. तक्रार नोंदवण्याची पद्धत सोपी आहे. ऑनलाइन तक्रार करण्याची सोय आहे. जिल्हा कार्यालयात तक्रार नोंदवता येते. मात्र वस्तू खरेदी केल्याचं बिल, वाॅरंटी कार्ड, त्या वस्तूबद्दलची नेमकी तक्रार, तक्रार नोंदीच्या प्रती, तत्सम कंपनीकडे तक्रार करून त्याचा पाठपुरावा केल्याचे पुरावे, त्या वस्तूबद्दलच्या तक्रारीचे ठोस पुरावे असं सगळं ग्राहकाकडे नसेल तर ग्राहकाविरुद्ध निकाल लागतो. अशा वेळी ग्राहक मंचाचं म्हणणं असं असतं की, ग्राहकावर अन्यायच नाही झाला तर न्याय कसला मागता? त्यामुळे ‘ग्राहकराणी’ लक्षात ठेव, मंचाकडे तक्रार करताना वरील गोष्टींचा तुला विचार करावा लागेल.

archanamulay5@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Consumer products consumer court and complaints asj

First published on: 28-09-2023 at 10:37 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×