scorecardresearch

Premium

वयाच्या तीन वर्षांपूर्वीच मुलांवर ‘शिक्षणसक्ती’ करताय? पालकांनो, हे वाचाच!

‘मुलं तीन वर्षांची होण्यापूर्वीच त्यांना सक्तीनं ‘प्रीस्कूल’मध्ये घालणं कायद्याच्या दृष्टीनं अयोग्य आहे. मुलांनी अशा प्रकारे तीन वर्षं शाळेत काढली असल्यानं त्यांना वयाची सहा वर्षं पूर्ण होण्यापूर्वीच पहिलीत घ्या, असा धोशा लावणंही चुकीचं आहे,’ असं नुकतंच गुजरात उच्च न्यायालयानं एका खटल्यात म्हटलं आहे… या निमित्तानं अशाच एका ‘प्रीस्कूलग्रस्त’ बाळाची गोष्ट!

children preschool
‘‘आरटीई’ कायद्यानुसार १ जून २०२३ रोजी सहा वर्षं पूर्ण नसलेल्या मुलांना पहिलीत घेता येणार नाही,’ असं गुजरात उच्च न्यायालयानं नुकतंच सांगितलं आहे. (फोटो सौजन्य- पिक्साबे)

चारुशीला कुलकर्णी

“विहानचं काय सुरू आहे समजत नाही. वर्गात त्याच्याबरोबरचे अभ्यास करतात, ‘पोएम’ म्हणतात, ‘स्टोरीटेलिंग’ पण जमतं त्यांना… हा मात्र ढिम्म! चेहऱ्यावरची रेष हलत नाही.” इरा तावातावाने सुशांतच्या समोर तक्रारींचा पाढा वाचत होती. सुशांत मात्र विहान कोपऱ्यात बसून काय करतोय याचा अंदाज घेत होता. त्याबरोबर विहानच्या बाबतीत ‘आपलं नेमकं कुठे चुकलं’ हा प्रश्न त्याच्या डोक्यात सुरू होता.

Nagpur Bench High Court
केवळ घटनास्थळी उपस्थित होते म्हणून… ३६ वर्षांनंतर निर्णय देताना उच्च न्यायालय काय म्हणाले जाणून घ्या
parent allegation on english school for not allowing students to sit in class over non payment of fees
शुल्क न भरल्याने विद्यार्थ्याला चार महिन्यांपासून वर्गात बसू दिले नाही; सोलापुरात ‘त्या’ इंग्रजी शाळेवर दुसऱ्या पालकाचा आरोप
Accused who assaulted student in Dombivli not arrested yet complaint to Thane Police Commissioner
डोंबिवलीत विद्यार्थ्याला मारहाण करणारे आरोपी मोकाट, ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Career Mantra
करिअर मंत्र

इरा, सुशांतचं नोकरदार कुटुंब. घरातले मोठे गावाकडे, हे दोघं नोकरीनिमित्तानं शहरात. लग्नाची नव्याची नवलाई संपताच ‘पाळणा कधी हलणार’ हा प्रश्न उभयतांना आडून आडून विचारला जाऊ लागला. इरानं ब्रेक घेऊन विहानला जन्म दिला. सतत त्याच्याकडे लक्ष देणं, व्हिडीओ- ऑडिओ सीडी लावून त्याला भरवणं, मोबाईलवर श्लोक लावून त्याला ऐकवणं, यात दोन वर्षं सरली. विहानच्या अवतीभोवती आई-वडिलांव्यतिरिक्त- त्यातही आईशिवाय जास्त कुणी नसे. त्यामुळे तो नकळत एकटा पडण्यास सुरूवात झाली. कॉलनीतल्या बागेत नेल्यावर समवयस्क मुलांमध्ये खेळण्यापेक्षा तो आईची ओढणी किंवा स्कार्फ पकडून तिच्याच अवतीभोवती करत असे. खाण्याची ‘नाटकं’ तर होतीच. ‘इतर मुलांमध्ये दिसणारा स्मार्टनेस आपल्या मुलात का नाही?’ या विचारानं इरा अस्वस्थ व्हायला लागली.

आणखी वाचा-मैत्रिणींनो, आर्थिक गुंतवणूक करायचीय?… मग ‘या’ ६ गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवं!

कॉलनीतली विहानच्या वयाची मुलं हातात पेन-पेन्सिल पकडत, भिंतीवर रंगानं काही तरी रंगवत, कागदाच्या घड्या घालून काही तरी करण्याचा प्रयत्न करत. अगदी काहीच नाही, तर ही लहान मुलं अखंड बडबड करून घरातल्यांना भंडावून सोडत. विहान या सर्वांत कुठेच नव्हता. ‘तो ‘ॲबनॉर्मल’ नसला तरी ‘नॉर्मल’ मुलांसारखं वागत नाहीये,’ असं म्हणून इरानं त्याला शिकवायच्या जिद्दीनं बळे बळे ‘प्ले ग्रुप’मध्ये घातलं. विहानला ‘शू लागली’ हेही सांगता येतं नव्हतं. इरा त्याला डायपर लावून शाळेत पाठवत होती. कधी कुरकुर, कधी रडारड करत विहान शाळेत रमला खरा, पण अभ्यासाची गाडी काही पुढे सरकत नव्हती. ‘प्ले ग्रुप’मध्ये खेळ, ‘नर्सरी’मध्ये ए-बी-सी-डी, ‘ज्युनिअर केजी’मध्ये ‘वन टू हन्ड्रेड’ अंक, असं शिकवत होते. ते विहानला शिकवताना इराचीच दमछाक व्हायची. विहानच्या सांगितलेलं लक्षात राहात असे, पण लिहिणं, सर्वांसमोर व्यक्त होणं त्याच्या पचनी पडत नव्हतं. घरी तो बडबड करे, पण बाहेर समोरच्याच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल विहान ‘स्माईली इमोजी’सारखा चेहरा करत असे. ‘त्याला सीनिअर केजीमध्ये रिपीट करा’ असा सल्ला शाळेतून इरा आणि सुशांतला मिळाला आणि दोघं चक्रावलेच. ‘आमचा मुलगा सीनिअर केजी नक्की पास होईल. तो फक्त लाजतोय. तो सहा वर्षांचा नसला तरी त्याला पहिल्या यत्तेच घ्या,’ हा धोशा दोघांनी शाळेत जाऊन लावला. शाळेनं मात्र विहाननं वयाची सहा वर्षं पूर्ण केल्याशिवाय पहिलीत प्रवेश देणार नसल्याची ठाम भूमिका घेतली होती.

आई-वडिलांसमोर बोलणारा विहान शाळेत गप्प का असतो? त्याला खरंच शाळेत सांगितलेलं सगळं समजतंय, की आपल्याला तसं वाटतंय? असे प्रश्न इरा आणि सुशांतला पडले होतेच. त्यांनी शेवटी मानसोपचारतज्ञांची मदत घेतली. तेव्हा विहानवर खूप कमी वयात ‘प्ले ग्रुप’पासून अभ्यासाचा आलेला ताण, अभ्यासाविषयी निर्माण झालेली भिती, लवकर लेखनाच्या अट्टाहासानं हात, मान, डोळे यांवर येणारा ताण, अशा अनेक गोष्टी समोर आल्या. शेवटी योग्य वेळेआधीच आजूबाजूचं पाहून विहानला शाळेत घालण्याचा आपला निर्णय चुकला, याचा त्यांना पश्चाताप झाला.

आणखी वाचा-नातेसंबंध- डेटिंगला जाताना…

पालकांची मानसिकता व त्याचे मुलांवर परिणाम याबद्दल मानसोपचारतज्ञ डॉ. हेमंत सोननीस सांगतात, “सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खरं तर ‘फॉर्मल’ शिक्षणाची आवश्यकता नाही. या मुलांना शाळेत जाण्याचा एकच उपयोग म्हणजे त्यांच्या वयाच्या इतर लहान मुलांबरोबर खेळता येतं. विशेष:त आजच्या फ्लॅट संस्कृतीत, विभक्त कुटुंब पध्दतीत हा पर्याय स्वीकारला जातो. मात्र पालकांना मुलांना मोठं करण्याची घाई झालेली असते. माझं मूल स्पर्धेत मागे पडू नये, मी पालक म्हणून कमी पडत आहे का? ही असुरक्षितता पालकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे मुलांचा शाळा प्रवेश हा एक प्रकारे प्रतिष्ठेचा विषय असतो. ‘नामांकित शाळे’त मुलाला पुढे ॲडमिशन मिळावी, या मृगजळामागे धावताना पालक प्ले ग्रुपच्या जाळ्यात अडकतात. कधी हे त्यांच्या मनाला पटत नसलं, तरी इतर लोक काय म्हणतील म्हणून मुलांचा लहान वयात शाळाप्रवेशाचा सोहळा पार पडतो. मात्र हे सर्व करताना मुलांच्या नैसर्गिक वाढीचा विचार व्हायला हवा.”

‘‘आरटीई’ कायद्यानुसार १ जून २०२३ रोजी सहा वर्षं पूर्ण नसलेल्या मुलांना पहिलीत घेता येणार नाही,’ असं गुजरात उच्च न्यायालयानं नुकतंच एका खटल्यात अधोरेखित करून पालकांची याविषयीची मागणी रद्दबादल ठरवली, तसंच पालकांच्या या ‘शिक्षणघाई’बद्दल नाराजीही व्यक्त केली. या निमित्तानं तरी पालकांनी या गोष्टीचा विचार करायलाच हवा.

lokwomen.online@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: It is illegal to force children to go to preschool before they turn three years old mrj

First published on: 12-09-2023 at 17:48 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×