मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. यादरम्यान अनेकदा महिलांबरोबर गैरवर्तनाच्या घटना समोर येतात. त्यामध्ये मौल्यवान वस्तूची चोरी होणं, एखादीला मुद्दामहून धक्का देणं, गर्दीचा फायदा घेत स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्ट्सना हात लावणं, महिलांकडे वाईट नजरेनं पाहणं, छेडछाड, विनाकारण महिलांच्या डब्यात डोकावणं, त्यांच्यावर नजर ठेवून असणं, पाठलाग करणं आदी अनेक गोष्टी घडतात. पण, स्त्रिया यावर व्यक्त होण्यास किंवा तक्रार करण्यास अनेकदा घाबरतात. परंतु, याच विषयाला अनुसरून मार्चमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं आणि मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले. अनेक महिला अशा प्रकरणांबद्दल तक्रार का करीत नाहीत, त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? या सर्वेक्षणातून कोणती माहिती समोर आली, याबद्दल आपण या लेखातून अधिक जाणून घेणार आहोत.

मुंबई रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेची चिंता समजून घेण्यासाठी गव्हर्न्मेंट रेल्वे पोलिस (जीआरपी)ने मार्चमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा २,९९३ महिला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळविला. प्रत्येक महिलेला २१ प्रश्न विचारण्यात आले आणि सर्वेक्षण केलेल्यांपैकी निम्म्या महिला ऑफिसला जाणाऱ्या होत्या. या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, २,९९९ पैकी सुमारे एक-पंचमांश महिलांनी गेल्या सहा महिन्यांत अनेक गुन्ह्यांचा सामना केला आहे आणि त्यापैकी बऱ्याच महिलांनी या प्रकरणांची तक्रार न करणं पसंत केलं आहे. महिलांनी तक्रार का केली नाही, अशी विचारपूस केल्यानंतर त्यामागे ‘लांबलचक पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेची भीती’ आणि ‘या सर्व प्रक्रियेत फक्त आणि फक्त वेळ वाया जातो’, अशी कारणं समोर आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा…१० हजार महिलांचा सॅनिटरी पॅडला नकार, मेंस्ट्रुअल कप खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या ‘या’ संस्थेचा खास उपक्रम

एकूण प्रतिसादकर्त्यांपैकी सुमारे १८ टक्के महिलांनी सांगितले की, त्यांना एक किंवा अधिक गुन्ह्यांचा सामना करावा लागला आहे. तर आठ टक्के महिलांनी सांगितले की, त्यांना रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये दुखापत झाली आहे. तर, ७१ टक्के महिलांनी कधीही याबद्दल तक्रार केली नसल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रकरणांबद्दल तक्रार न करण्याची मुख्य कारण म्हणजे लैंगिक गुन्ह्यांची तक्रार करताना लाज वाटते; तर चोरीच्या प्रकरणांमध्ये एखादी वस्तू मौल्यवान नसल्यामुळे त्याचे विशेष महत्त्व न वाटणे अशी कारणे महिलांनी सर्वेक्षणाद्वारे दिली आहेत.

सर्वेक्षण करणाऱ्या कार्यकर्त्या प्रीती पाटकर म्हणाल्या की, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया किचकट असते आणि तक्रार नोंदवायला गेल्यावर अनेकदा अधिकाऱ्यांकडून राग व्यक्त केला जाणे, चिडचिड होणे किंवा उदासीनता या प्रकारची वागणूक अनुभवायला मिळते. प्रीती पाटकर म्हणाल्या की, आम्ही अनेक वर्षांपासून हे पाहत आलो आहोत. वेतनकपातीचा सामना करावा लागू नये म्हणून अधिकाऱ्यांना गुन्ह्यांची तक्रार न करण्यास भाग पाडले जाते.

तसेच अभ्यास किंवा सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, गेल्या सहा महिन्यांत गुन्ह्यांचा सामना कराव्या लागलेल्या महिलांनी फलाटावर ३७ टक्के, रेल्वेस्थानकाबाहेर १३ टक्के, फूटओव्हर ब्रिजवर १२ टक्के आणि तिकीट खिडकीवर पाच टक्के महिलांनी रात्री ९ नंतर लोकल ट्रेनमध्ये त्यांना असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सुरक्षिततेसाठी महिला प्रवाशांनी तिकीट खिडकी, फूटओव्हर ब्रिज आणि भुयारी मार्ग व महिलांच्या डब्यांमध्ये कॅमेरा बसविण्याची मागणी वा सूचना केली आहे. त्याचबरोबर ट्रेनमधील डब्यांत पोलिस कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करावी, फलाट व्यवस्थित ठेवणे, गर्दीचे नियोजन करणे, महिला डब्यांचा आकार वाढविणे आणि तिकीट तपासणी वाढवणे आदी मागण्या महिलांकडून करण्यात आल्या आहेत. DG (रेल्वे)च्या प्रज्ञा सवादे या अभ्यास वा सर्वेक्षणाचे निकाल उत्तम नियंत्रणासाठी रेल्वेबरोबरसुद्धा शेअर करणार आहेत.