मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. काही जणांना पोटदुखी, अशक्तपणा, थकवा या समस्या जाणवतात. तर या दिवसांमध्ये रक्तप्रवाह कधी कमी जास्त होतो, त्यामुळे सतत चार-पाच तासांनी सॅनिटरी पॅड बदलून घ्यावे लागते. जर आपण स्वच्छता राखली नाही तर आपल्याला इतर काही समस्यादेखील उद्भवू शकतात. पण, सध्या मासिक पाळीदरम्या सॅनिटरी पॅड व्यतिरिक्त टॅम्पॉन किंवा मेंस्ट्रुअल कप वापरण्याचे पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत. तरीही अनेक महिलांच्या मनात मेंस्ट्रुअल कप वापरण्याची भीती असते. तर आज आपण या लेखातून अशा एका संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या खास उपक्रमामुळे १० हजार महिलांनी मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅडला नकार देऊन मेंस्ट्रुअल कप वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१९ पासून गुडगावमध्ये ‘प्युअर हार्ट्स’ (Pure Hearts) ही एक नॉन प्रॉफिट संस्था ‘माझी ओळख’ (मेरी पेहचान) मोहीम राबवत आहे. एनसीआरमधील कार्यशाळा, गावं आणि मदतनीस समुदायांमध्ये मोफत मासिक पाळीच्या मेंस्ट्रुअल कप वाटप करून महिलांना सक्षम बनवते आहे. ज्या स्त्रियांनी सॅनिटरी पॅड वगळून मासिक पाळीच्या मेंस्ट्रुअल कपला स्वीकारलं आहे, त्यांना या मोहिमेत ‘कपव्हर्ट’ (‘cupverts) असे म्हणतात. तर या बदलामुळे ड्रेनेज सिस्टीममधील अडथळे कमी होण्यास व कचरा व्यवस्थापन पद्धतीससुद्धा मदत होते. तर आज या संस्थेबद्दल आणि मासिक पाळीत मेंस्ट्रुअल कप वापरणं खरंच सुरक्षित आहे का, थोडक्यात जाणून घेऊ.

हेही वाचा…कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

१० हजारांहून अधिक स्त्रिया प्युअर हार्ट्स संस्थेच्या ‘माझी ओळख’ (मेरी पेहचान) या मोहिमेत सामील झाल्या आहेत. या मोहिमेदवारे महिला पर्यावरणाविषयी जागरूकता आणि प्रतिनिधित्व करणाऱ्या योध्या बनल्या आहेत. या स्त्रियांच्या प्रयत्नांमुळे एनसीआरमधील गावांमध्ये मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड्सचा कचरा काही प्रमाणात कमी झाला आहे. प्युअर हार्ट्सचे स्वयंसेवक पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्यासह पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. प्युअर हार्ट्सचे स्वयंसेवक वृक्षारोपण, पर्यावरणपूरक पद्धती, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी विविध उपक्रम नेहमी आयोजित करतात. तसेच मूत्रमार्गात संसर्ग आणि पुरळ यांसारख्या स्वच्छतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून विनामूल्य वैद्यकीय तपासणीदेखील करून देतात. प्युअर हार्ट्स संस्थेद्वारे केलेल्या सर्वेक्षण आणि संशोधनातून असे दिसून आले आहे की, मासिक पाळीच्यादरम्यान दूषित सॅनिटरी नॅपकिन्स दीर्घकाळ वापरामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. पण, याविरुद्ध मासिक पाळीचे कप तुम्ही आठ ते दहा वर्षे वापरू शकता. त्यामुळे मेंस्ट्रुअल कप सुरक्षित, सर्वात आरामदायक आणि पर्यावरणास अनुकूल असा तुमचा ‘पीरियड पार्टनर’ आहे; असे संस्थेचे निरीक्षण आहे.

गुडगावमधील फोर्टिस येथील स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख मुक्ता कपिला या प्युअर हार्ट्सच्या ‘माझी ओळख’ (मेरी पेहचान) या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. वरिष्ठ डॉक्टर, प्राध्यापक सदस्य आणि आरोग्य सेवा प्रदाते यांच्या सहकार्याने, मासिक पाळीच्या मेंस्ट्रुअल कपसाठी चॅम्पियन्सचे नेटवर्क स्थापित केले गेले आहे. मासिक पाळीसाठी मेंस्ट्रुअल कप हा एक चांगला उपाय का आहे, हे सांगण्यासाठी प्युअर हार्ट्सच्या स्वयंसेवकांनी १०० कार्यशाळा आयोजित केल्या आहेत, ज्यात प्रत्येकी ८० ते १५० महिलांचा समावेश आहे.

पूनम अग्रवाल यांनी याबद्दल सांगितले की, मासिक पाळीबद्दल चिंता दूर करण्यासाठी आणि सुरळीत संक्रमण घडवून आणण्यासाठी स्वयंसेवक प्रत्येक कार्यशाळेनंतर समर्पित व्हॉट्सॲप ग्रुप तयार करतात, जिथे उपस्थित असलेल्या महिला त्यांच्या अनुभवांवर चर्चा करतात, सल्ला घेतात आणि मेंस्ट्रुअल कप योग्य वापराबद्दल जाणून घेतात.

प्युअर हार्ट्सच्या शालू जोहर साहनी म्हणाल्या की, आम्ही महिलांना मासिक पाळीचा मेंस्ट्रुअल कप मोफत वाटून स्वच्छता आणि आरामाची एक अनोखी भेट देतो, जेणेकरून ते त्यांच्या मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्याचा खर्चही वाचवू शकतील.

हेही वाचा…सात समुद्र पार करणारी ‘दर्याची राणी’; कोण आहे बुला चौधरी? जाणून घ्या…

तर प्युअर हार्ट्सच्या याच प्रयत्नांना गावातील ‘आशा वर्कर्स’कडून महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला आहे, ज्यामुळे त्यांनी दिलेल्या माहितीचा अधिक प्रसार होतो आहे आणि गुरुग्राममधील विविध गावे आणि खेड्यांतील स्त्रिया या उपायाचा अवलंब करतानाही दिसत आहेत. एकूणच ही संस्था ‘माझी ओळख माझे स्वातंत्र’ – माझा कचरा ही माझी जबाबदारी या घोषणेच्या राजदूत बनत आहेत. ही संस्था बायोडिग्रेड होण्यासाठी ५००-६०० वर्षे लागणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सना किंवा पॅड्सना वगळण्याचा अभिमान बाळगतात.

गुरुग्राममधील विविध सार्वजनिक आरोग्य केंद्रातील (PHC) अनेक आशा कामगार महिलांनी मेंस्ट्रुअल कपशी मैत्री केली आहे आणि प्युअर हार्ट्सच्या बुलंद आवाज आणि समाजातील बदलाचा एक उत्तम उदाहरण ठरल्या आहेत. पूनम (आशा वर्कर, तिगारा) याबद्दल म्हणाल्या आहेत, “तिगारा गावातील महिला कपव्हर्ट झाल्यामुळे, गाव स्वच्छ झाले आहे आणि त्यांना पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी पॅड कचऱ्यात पडलेले दिसतात. अधिक महिलांवर याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे प्युअर हार्ट्सच्या त्यांच्यासाठी अधिक कार्यशाळेचे नियोजन करावे’, असे त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

या मोहिमेमुळे उत्तर रेल्वे, नर्सिंग विद्यार्थी विभाग आणि SGT विद्यापीठाचे प्राध्यापक, शिव नाडर स्कूल आणि हेरिटेज एक्सपेरिएंशियल स्कूलच्या महिला मदतनीस कर्मचारी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित संस्थांना फायदा झाला आहे. गुरुग्राम महानगर विकास प्राधिकरणच्या (GMDA) नेहा यांनीसुद्धा लवकरच मासिक पाळीच्या क्रांतीमध्ये त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच या संस्थेबद्दल गुरुग्राममधील फॅशन डिझायनर प्रिती जैन म्हणाल्या की, “माझा कचरा ही माझी जबाबदारी आहे. मी गेल्या नऊ वर्षांपासून मासिक पाळीचा कप वापरत आहे आणि मी प्रत्येकाला याची शिफारस करते की, त्यांनी मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅडला वगळून मेंस्ट्रुअल कपमध्ये आरामशीरपणे बदल करावा आणि मासिक पाळीचा कार्यकाळ आनंदी घालवावा.