Who Is Ritika Sajdeh: प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एका ‘स्त्री’चा हात असतो असं म्हणतात, भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या आयुष्यात सुद्धा त्याची पत्नी रितिका सजदेह अशीच ‘लेडी लक’ ठरत आहे. मागील काही दिवसात विशेषतः मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची जबाबदारी रोहितच्या हातून हार्दिक पांड्याच्या हाती गेल्यावर अनेकांनी रोहितच्या महानतेचे दाखले दिले आहेत. रोहित हा कसा बेस्ट कर्णधार आहे हे सांगणाऱ्या पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत. पण जर आपल्याला आठवत असेल तर आज पाठिंबा देऊन, टिपं ढाळणारी अशीच गर्दी विश्वचषकात भारत पराभूत होताच, आशिया चषक भारताच्या हातून निसटल्यावर रोहित शर्माला प्रचंड ट्रोल करत होती. तेव्हाही त्याच्या पाठीशी उभी असणारी, एकमेव व्यक्ती म्हणजे रितिका. या एकमेकांवरील प्रेम व विश्वासामुळे रोहित व रितिका आज एक आदर्श जोडपं म्हणून सुद्धा पाहिलं जातं. या जोडप्याची पहिली भेट, प्रेम, लग्न याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. इतकंच नाही तर, केवळ रोहित शर्माची पत्नी म्हणूनच नव्हे तर रितिका एक व्यक्ती म्हणून कोण आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत.

रितिका सजदेहच्या कामाचा आढावा

मूळची मुंबईकर असणारी रितिकाची ओळख ही केवळ क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी इतकीच नसून ती स्वतःच एक पॉवरहाऊस आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे, ती तिची मतं ठाम मांडताना अनेकदा दिसते. तर स्पष्टपणे बोलणारी रितिका ही तितकीच हसरी- खेळती असल्याचं सुद्धा तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून लक्षात येतं. रितिकाचे इन्स्टाग्रामवर २४ लाख फॉलोवर्स आहेत.

स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या क्षेत्रात रितिकाचा प्रवास कॉर्नरस्टोन स्पोर्ट अँड एंटरटेनमेंटच्या निर्मितीने सुरू झाला होता. तिचा चुलत भाऊ बंटी सचदेवा याने स्थापन केलेल्या या कंपनीतुन तिने कामाची सुरुवात केली होती. या कंपनीच्या प्रगतीमध्ये सुद्धा रितिकाचे मोठे योगदान आहे. तिने अनेक खेळाडूंना या कंपनीचा भाग बनवून या लहानश्या सुरुवातीला मोठ्या व्यायसायाचे रूप दिले होते. रोहितच्या आधी रितिकाने विराट कोहलीची मॅनेजर म्हणून सुद्धा काम केले होते. सध्या रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील कामाचं नियोजन करणारी रितिका ही मैदानात रोहित खेळत असताना मात्र एका पत्नीच्या, चाहतीच्या नात्याने नवऱ्याला खंबीरपणे साथ देत असते.

रितिका व रोहित शर्माची भेट कशी झाली?

रितिका सजदेह आणि रोहित शर्मा यांची पहिल्यांदा २००८ मध्ये रिबॉक स्पोर्टिंग इव्हेंटमध्ये भेट झाली होती. युवराज सिंगने त्यांची ओळख करून दिली होती. मैत्रीच्या रूपात सुरू झालेल्या या नात्याचे लवकरच प्रेमात रूपांतर झाले आणि मग रितिका रोहितची मॅनेजर झाली. २०१५ मध्ये रोहित रितिकाचे लग्न झाले.

हे ही वाचा<< “बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?

क्रिकेटच्या पलीकडे, रितिका पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (PETA) च्या अनेक उपक्रमांमध्ये सुद्धा सहभाग घेत असते. ३० डिसेंबर २०१८ ला रितिका व रोहितने समायरा या गोड मुलीला जन्म दिला होता. रितिका व समायारा रोहितला पाठिंबा देण्यासाठी अगदी बहुसंख्य सामन्यांसाठी उपस्थित असतात.