रोहित पाटील

आज आपल्या देशात मर्दानी साहसी खेळातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत महिलांनी आपलं वर्चस्व स्थापित केलं आहे. देशातील विविध राज्यातील महिला यामध्ये आपलं योगदान देत आहेत. जम्मू काश्मीर देखील आता त्यात मागे नाही. होय, काश्मीर खोऱ्यातील अशीच एक सामान्य घरातील मुलगी जिने सामाजिक रुढी, बंधने झुगारून पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात स्वत:चं वर्चस्व प्रस्थापित करून जम्मू कश्मीरमधील पहिली महिला पॉवरलिफ्टर बनण्याचा मान मिळवला आहे.

कोण आहे सायमा?

सायमा ही सामान्य घरातील मुलगी. तिनं तिचं शिक्षण श्रीनगमधून पूर्ण केलं. तिनं होम सायन्समधून पदवी मिळवली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जिथे करिअरसाठी मुली नेहमीची ठरलेली क्षेत्रं निवडतात, तिथं तिनं पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पॉवर लिफ्टिंग खेळाला करियर म्हणून निवडलं. यामध्ये तिला पती उबेझ हाफिज याचीदेखील साथ मिळाली- जो मुळात स्वत: एक पॉवर लिफ्टर आहे. आणि त्यानंच तिला यामध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केलं.

आणखी वाचा-Navjyot kayr : मिस वर्ल्ड स्पर्धेत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय वंशाची महिला आहे तरी कोण?

जम्मू कश्मीरमध्ये दरवर्षी राज्य स्तरीय पॉवर लिफ्टिंगची स्पर्धा आयोजित केली जात होती. पण २०२० साली प्रथमच पॉवर लिफ्टिंग असोसिएशनतर्फे महिलांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत सायमाने तब्बल २५५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावून जम्मू कश्मीरमधील पहिली महिला पॉवर लिफ्टर विजेती होण्याचा मान मिळवला. लग्न होऊन एका मुलाची आई असूनसुद्धा अशी कर्तबगारी केल्याबद्दल सर्व क्षेत्रातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. समाजातील रूढी-परंपरांना बळी पडून स्वत:ची स्वप्नं तशीच मनात गाडून टाकणाऱ्या महिलांसमोर एक उत्तम उदाहरण प्रस्थापित करायचं होतं असं सायमाचं म्हणणं आहे.

आणखी वाचा-मुकेश अंबानींची आई कोकिलाबेन यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क; तब्बल एवढ्या कोटींची आहेत मालकीण

सायमाचे पती म्हणतात की, ते जिममध्ये इतरांना ट्रेनिंग देत असताना सायमादेखील अधून मधून जिममध्ये यायची तेव्हा ती थोडंफार वर्क आऊट करायची. त्यावेळीच मी तिच्यातले गुण हेरले आणि तिला पॉवरलिफ्टींगसाठी प्रोत्साहित केलं.

गोल्ड मेडल मिळाल्यानंतर अजून कसून सराव करून काश्मीर खोऱ्यातील अनेक मुलींना पॉवर लिफ्टिंगचं प्रशिक्षण देत आहे. भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नेतृत्व करून ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालण्याच तिचं स्वप्न आहे.