scorecardresearch

Premium

गच्चीवरची बाग : लोभस, सुंदर हिरवे झुंबर

कधीकधी कुंड्या हवेतही टांगता येतात. फॅब्रिकेटेड कुंड्यांना अडकवलेली ही शिंकाळी म्हणजे हिरवी झुंबरे. छोट्या बाल्कनीत वेगवेगळ्या प्रकारची फुलांची व पानांची ही हिरवी झुंबरे वाऱ्यावर हळूवार झुलतात व आपल्याला आणि इतरांनाही आनंद देतात.

Terrace Garden, plants, trees, decorations, chandeliers
गच्चीवरची बाग : लोभस, सुंदर हिरवे झुंबर ( image courtesy – freepik )

प्रिया भिडे

कुंड्यांमधील विविधता व त्यांची मांडणी यामुळे बागेची शोभा तर वाढतेच; शिवाय त्यातील बदल आपल्यालाही सतत नावीन्याचा आनंद देते. कुंड्यांची रचना वेगवेगळ्या पद्धतीत करता येते. काही कुंड्या जमिनीवर, काही पायऱ्यांवर, एखादी कुंडी शोभिवंत दगडावर, जुन्या जात्यावर अथवा वाळक्या ओंडक्यावर ठेवता येते. तर, कधीकधी या कुंड्या हवेतही टांगता येतात. फॅब्रिकेटेड कुंड्यांना अडकवलेली ही शिंकाळी म्हणजे हिरवी झुंबरे.

health supplement pills marathi news, health supplement pills benefits marathi, health supplement pills effects on body marathi news
Health Special: आरोग्यपूरक गोळ्या – कोणी घ्याव्यात? किती घ्याव्यात?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धती
gobi manchurian marathi news, gobi manchurian banned in goa
एकट्या मंचुरियननेच यांचं काय बिघडवलंय?
Roses Jaswandi Mogra Plants Will Grow Flowers In 10 Days Using This Jugaad Fitkari Turti Water Once A Month Check Video Gardening
महिन्यातून एकदा तुरटी वापरल्यास गुलाब, जास्वंद, मोगऱ्याच्या रोपांना येतील भरपूर कळ्या; प्रमाण व पद्धत बघा, (Video)

छोटी बाल्कनी व सोसायटी पार्किंग किंवा बंगल्यांच्या झाडांवरती ही झुंबरे शोभून दिसतात व जागाही वाचवतात. झाडांच्यासुद्धा आवडीनिवडी असतात. तसेच प्रत्येकाची वाढण्याची सवयही वेगळी असते. काहींना सरळ वर जायला आवडते, तर काहींना जमिनीवर धावायला आवडते, तर काहींना वरून खाली झेपावयाला आवडते. त्यांच्या आवडीनुसार व आपल्या जागेच्या उपलब्धतेनुसार झाडांची निवड करावी लागते. छोट्या बाल्कनीत रांगेने झाडे ठेवली तर मर्यादित झाडे बसतात, त्यामुळे बाल्कनीच्या स्लॅबला हुक लावून त्यात कुंड्या अडकवता येतात. त्यासाठी तारेच्या बास्केट किंवा प्लास्टिकच्या कुंड्या मिळतात. या कुंड्या किंवा टोपल्यांचा आकार सहा बाय सहा बाय सहा पेक्षा जास्त मोठा नसावा. या टोपल्याच्या आत पूर्वी मॉस भरत असत. पण आता मॉस काढण्यावर बंदी आहे, कारण त्याने ऑर्किडसारख्या वनस्पतींचे अधिवास नष्ट होतात. त्यामुळे या कुंड्या भरण्यासाठी तळास नारळाच्या पिंजलेल्या शेंड्या (कॉयर), नारळाच्या झाडाच्या बुंध्याचे वल्कल किंवा जुने ज्युटचे पोते वापरावे. त्यामध्ये तीन भाग कोकोपीथ व एक भाग सेंद्रिय माती वापरून कुंडी भरून घ्यावी. कोकोपीथ घातल्याने ओल धरून ठेवण्यास मदत होईल व प्लास्टिकच्या कुंडीत हवा चांगली खेळती राहील. या टोपल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावता येतात.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: निसर्गाचा चमत्कार बांबू

स्पायडर प्लँट हे पांढऱ्या, हिरव्या रिबिनींचे चिमुकले रोप खूप लोकप्रिय आहे. कारण हे घरात कमी उन्हात तसेच बाहेरही छान वाढते. ही रोपे टोपलीत लावून ती आकड्यास लटकवावी. झाडांच्या मुळांपासून नवीन रोपं वाढतात व टोपली गच्च भरते. मुळांपासून नाजूक काड्या फुटतात व या काड्यांना रोपांचे फुटवे येतात. ही छोटी छोटी लोलकासारखी लटकलेली रोपं टोपलीची शोभा वाढवतात. यामध्ये नाजूक पानांची, हिरव्या पानांना पांढऱ्या कडांची अशी विविधता आढळते. टोपल्यांमध्ये लावण्यासाठी फर्नचा वापरही छान होतो. बारीक, नक्षीदार पानांची पोपटी रंगांची फर्न्स बाल्कनीला तजेला देतात. फर्नला सावली आवडत असल्याने पोर्चमध्ये, कमी उन्हाच्या बाल्कनीत जरूर लावावीत.

पुदिन्याच्या कुटुंबातील पण वास नसलेला व गोलाकार पाने असलेला मिंट, याला जमिनीवर लावल्यास आडवे पसरायला आवडते अन् शिंकाळ्यात लावले तर सरसर खाली उतरते. याला पाणी आवडते. त्यामुळे कुंडी भरताना कोकोपीथबरोबर थोड्या बारीक चिंध्या कुंडीत घालाव्यात ज्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा ताण बसला तर रोप शॉकमध्ये जाणार नाही. मिंटची वाढ जोमाने होते. काड्या लावून रोपे येत असल्याने कुंड्या वाढवायला सोपे पडते. पाने तजेलदार दिसतात. एक टोपली वर, एक टोपली खाली अशी रचना केल्यास हिरवे तोरण अथवा पडदा होऊ शकतो.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: पापडीची लागवड

जाड बांबूचे एक एक फुटाचे तुकडे करून मधल्या पोकळीत माती भरून हे बांबूचे तुकडे आकड्याला लटकवू शकतो. मिंट यात छान वाढते. मिंटप्रमाणेच मनी प्लँट, आयव्ही यांचीही शिंकाळी छान दिसतात. त्रिकोणी, जांभळ्या पानाचा ऑक्झॅलिससुद्धा शिंकाळ्यात छान वाढतो आणि सुंदर दिसतो. शिंकाळ्यासाठी अतिशय लोकप्रिय आहे डाँकीज् टेल. ही मांसल पानांची छोटी रोपे कुंडीतून एक-दीड फूट खाली उतरतात. ही भरगच्च कुंडी अतिशय आकर्षक दिसते. याच्या छोट्या तुकड्यापासून नवीन रोपे करता येतात. वाटिकांमध्ये याची तयार शिंकाळी मिळतात पण महाग असतात. पेल्टोफोरमच्या तुकतुकीत पानाच्या अनेक जाती शिंकाळ्यात शोभतात. फारशी देखभाल न करता सावलीत छान वाढतात. आयपोमिया व रताळ्याचे वेलही शिंकाळ्यासाठी वापरता येतात. शिंकाळ्यात पाने तर शोभतातच, पण विविधरंगी फुलांची शिंकाळी बागेत अधिक उठावदार दिसतात. ऋतुमानाप्रमाणे फुलांमधला बदलही छान वाटतो. पोर्टुलाका या कुटुंबातील बहुतेक सदस्य शिंकाळ्यात छान वाढतात. किंचित मांसल पानांचा केशरी पिवळा, राणी रंगातला एकेरी, दुहेरी अतिशय तलम फुले असलेला पोर्टुलाका अतिशय सहज रुजतो. वाटिकेत रोपं मिळतात. काडी खोचूनही नवीन रोप करता येते. याचा रानातला भाऊ म्हणजे घोळ. घोळ बागेत तण म्हणून येतं. मात्र, याची आंबटसर भाजी छान लागते. नाजूक पिवळी फुले दिसतातही छान, पण हे शिंकाळ्यात शोभत नाही.

बालसम, पिटुनिया, लालुंग्या पानांचा बेगोनिया यांच्यासुद्धा लटकणाऱ्या टोपल्या सुंदर दिसतात. बारीक पाने, नाजूक फुले, आडवी वाढणारी अथवा उंचीवरून खाली पडायला आवडणारी झाडे शिंकाळ्यासाठी योग्य ठरतात. जाळीच्या टोपल्या असल्या तर त्यांना वरचेवर पाणी घालावे लागते. हे पाणी घालताना काळजीपूर्वक घालावे. इमारतीच्या भिंतीवर अथवा लोकांच्या बाल्कनीत पाणी व माती जाणार नाही याची दक्षता घ्यावी. प्लास्टिकची शिंकाळी असल्यास त्याला भोकं नसल्याने पाणी साठून मुळे कुजण्याचा धोका असतो. त्यासाठी अधेमधे शिंकाळी काढून माती थोडीशी मोकळी करावी. ज्या आकड्यास शिंकाळी अडकवले असतील ते पक्के आहेत ना याची खात्री करावी. छोट्या बाल्कनीत वेगवेगळ्या प्रकारची फुलांची व पानांची ही हिरवी झुंबरे वाऱ्यावर हळूवार झुलतात व आपल्याला आणि इतरांनाही आनंद देतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Terrace garden types of plant chandeliers asj

First published on: 28-09-2023 at 12:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×