चारूशीला कुलकर्णी

“बऱ्याचदा मी अमेयला प्रेमानं समजावून सांगण्याचा प्रयत्न करते… तेवढ्यापुरता ‘हो हो’ करतो, पण नंतर मात्र पहिले पाढे पंचावन्न अशी त्याची स्थिती असते… आता कंटाळा आलाय त्याला अभ्यासावरून काही समजवण्याचा. मार्क कमी पडले की घरातल्या सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे खिळतात आणि ‘मार्क कमी का पडले?’ हा प्रश्न आला, की बोटं माझ्यावर रोखली जातात! तेव्हा इतका संताप येतो, की असं वाटतं, एक तर याला फटकवावं, नाही तर स्वत:चं डोकं फोडावं! पण उपयोग शून्य, हे लक्षात येतं आणि हताश वाटतं. त्यामुळे मी त्याचा अभ्यास हा विषय आता बाद केलाय.” शीतल आपली अगतिकता सुप्रियासमोर व्यक्त करत होती.

loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
private schools within one km of govt schools not obligated to have rte seats
वर्गभेद निर्माण करणारा शिक्षण हक्क!
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा

सुप्रियाचं डोकंही तिच्या घरच्या अशाच समस्येचा विचार करून करून पिकलं होतं. शीतलनं पुन्हा ‘अमेय अभ्यास पुराण’ सुरू केलं, तशी तर सुप्रियानंही तिची ‘री’ ओढत तिच्या मुलाचं- वेदांतचं उदाहरण दिलं. वेदांत पाच वर्षांचा होत आला होता, पण त्याचं बोलणं अजूनही अडखळल्यासारखं होतं. त्याला समजतं सगळं, पण जेव्हा काही उत्तर देण्याचा, बोलण्याचा विषय येतो तेव्हा ओठ घट्ट मिटून बसतो. घरचे सुप्रियाला म्हणायचे, की ‘तुझ्या लाडामुळे वेदांत असा वागतो. त्याला अभ्यास नकोय.’ त्याच्या बाईंनी सुप्रियाला बोलावून सांगितलं होतं, की ‘वेदांतला आहे त्याच वर्गात आणखी एक वर्ष ‘रिपीट’ करा.’

हेही वाचा… डेटिंग अ‍ॅपवरील ओळख म्हणजे लग्नाचे वचन नव्हे! दिल्ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण

सुप्रिया आणि शीतलच्या गप्पांमध्ये शेजारच्या डेस्कवरची हेमा सहभागी झाली. हेमानं तिचं मत मांडलं. ती म्हणाली, “वयाच्या मानानं अभ्यास खूप होतोय. त्यात मुलांना रट्टा मारण्यापलीकडे अभ्यास असतो हेच माहिती नाहीये. शिक्षकांनी फळ्यावर दिलेली प्रश्नोत्तरं, गाईडमधले ठरावीक उतारे पाठ करणं हाच या मुलांचा अभ्यास झालाय. यापलीकडेही स्वत:चा स्वत: काही अभ्यास करावा लागतो, हे मुलांना माहितीच नाहीये. आता नवं शैक्षणिक धोरण येतंय. त्यात भाषा अभ्यासाबरोबर व्यावसायिक-कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाचाही समावेश आहे. प्रॅक्टिकल सुरू झालं, की बहुतेक मुलं अभ्यासात रस घेतील असं वाटतं.”

नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षणाची बदलती पध्दत या विषयी शीतल आणि सुप्रिया अनभिज्ञ होत्या. त्या दोघी हेमाशी चर्चा करत राहिल्या. बदलू पाहणाऱ्या शिक्षणपद्धतीत मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावता येईल याचा आणि मुख्य म्हणजे फक्त आईच नव्हे, तर घरातल्या इतर मंडळींनाही त्यात कशी मदत करायला लावता येईल, याचा त्या तिघी विचार करू लागल्या.

अशा अनेक ‘आई’ आपल्या भोवताली असतात. त्यांची तक्रार एकच असते, की मुलं अभ्यास करत नाहीत. मोबाईल आणि टीव्हीशिवाय मुलांना फारसं काही सुचत नाही, खेळातही त्यांचं मन लागत नाही. मग घरच्यांनी करावं तरी काय? या सगळ्याचा सूर नवं शैक्षणिक धोरणानं बदलू शकेल, हा विश्वास शिक्षकांप्रमाणे पालकांनाही मिळायला हवा.

हेही वाचा… बलात्काराचा गुन्हा रद्द, फसवणुकीचा गुन्हा कायम…

याविषयी बोलताना शिक्षिका स्वाती धारणकर सांगतात, “नवं शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या कृती शिक्षणाला वाव देणारं आहे. बऱ्याचदा मुलांना एखादा विषय लवकर समजत नाही, किंवा कितीही समजवला तरी आकलन होत नाही. अशा वेळी कृती शिक्षण, प्रकल्प यांची मदत होते. मुलं स्वत: ती माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. त्या विषयाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करतात. नवं शैक्षणिक धोरण मुलांच्या याच चिकित्सक वृत्तीला खतपाणी घालू शकेल. शाळा स्तरापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत या अनुषंगानं बरेच बदल करण्यात आले आहेत. ते काय, हे प्रत्येक पालकानं एकदा तरी जरूर वाचून घ्यायला हवेत, शिक्षकांशी बोलून समजून घ्यायला हवेत. जेणेकरून आपल्या मुलांसाठी चांगलं काय ते लक्षात येईल. प्रत्येकाच्या हातात असणारा मोबाईल यासाठी गुरू होऊ शकतो.”

केवळ शीतल, सुप्रिया आणि हेमाच नव्हे, तर सर्वच आई-बाबांना बदलत्या शिक्षणपद्धतीची माहिती करून घेऊन मुलांच्या ते अंगवळणी पडावं यासाठी थोडंफार सहाय्य करावं लागणार आहे. पुस्तकी अभ्यास आणि कृती अभ्यासाचा मेळ बसला, तर ‘मूल अभ्यास करत नाही,’ ही समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकेल.

lokwomen.online@gmail.com