-आरती कदम

२६ वर्षांच्या शहानाने आत्महत्या का केली असेल? सर्जरीत पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या शहानाला भविष्यात काय करायचं आहे, हे माहीत असतानाही आयुष्यच संपवावं असं कोणत्या क्षणी वाटलं असेल? दुसऱ्या कुणाच्या तरी निर्णयासाठी स्वत: बळी पडण्याचा निर्णय तिने का घेतला असेल? प्रश्न अनेक आहेत आणि आता ते तिच्या मृत्यूमुळे अनुत्तरित राहिले आहेत; पण मृत्यूपूर्वी तिने लिहिलेल्या पत्रात, ‘सगळ्यांना पैसाच हवा असतो,’ या म्हणण्यातून पैसा इतका मोठा झाला असेल का, की तिच्यापुढचे सगळेच रस्तेच बंद झाले? आताच्या काळात, हुंडाविरोधी कायदा होऊन ६० वर्षं होऊन गेल्यानंतरही एका उच्चशिक्षित मुलीने हुंड्याच्या कारणामुळे आत्महत्येचा पर्याय स्वीकारावा? यातलं अपयश नेमकं कुणाचं?

Japan moving closer to a future female empress_
जपानला महिला सम्राज्ञी मिळणार का? कायदा काय सांगतो?
telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

डॉ. शहाना केरळ, तिरुवनंतपुरमच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये सर्जरीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती. तिथेच शिक्षण घेणारा डॉ. रुवैस आणि तिने लग्न करायचं ठरवलंही. सगळं कसं सुरळीत सुरू होतं. असं म्हटलं जातं, की शहानाच्या कुटुंबीयांनी या लग्नासाठी स्वत:हून १५ एकर जमीन, ५० सोन्याची नाणी आणि एक कार देण्याचं कबूल केलं होतं; पण बोट दिल्यावर हातच ओरबाडून घेण्याच्या प्रयत्नात या प्रियकराच्या कुटुंबीयांनी १५ एकर जमिनीबरोबरच १५० सोनाची नाणी आणि बीएमडब्लू कारही मागितली. दोन वर्षांपूर्वीच वडील गमावलेल्या शहानाला, तिच्या कुटुंबीयांना ती मागणी पूर्ण करणं शक्यच नव्हतं. त्यांनी आपली असमर्थता व्यक्त केली आणि डॉ. आ. ई. रुवैसने कुटुंबीयांच्या म्हणण्याखातर लग्न मोडलं. याचा जबर धक्का बसलेली शहाना नैराश्यात गेली. इतकी की, कॉलेज हॉस्टेलमध्येच ॲनेस्थेशियाचा ओव्हरडोस घेऊन तिने आपलं आयुष्य संपवलं. स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास करणारं हरहुन्नरी आयुष्य एका निर्णयाने कायमचं संपलं. आता या प्रकरणाची शहानिशा होईल. गुन्हेगाराला शिक्षा होईलच. त्याची सुरुवातही झाली आहे. केरळ राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष पी. सीतादेवी यांनीही याविरोधात कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे. डॉ. रुवैसला अटकही झाली आहे; पण एका बातमीत म्हटल्याप्रमाणे केरळमधली या वर्षीची ही नववी हुंडाबळी होती.

आणखी वाचा-‘काळ्या’ मुलींच्या जागतिक सौंदर्यस्पर्धेत भारताची सॅन रेचेल द्वितीय!

आजही मुली हुंड्यासाठी बळी जात आहेत. कुणी लग्नाआधी, तर कुणी लग्नानंतर; पण बळी जाणं काही थांबलेलं नाही. ही शोकांतिकाच आहे. मुलींचं असं बळी जाणं हे सरकारच्या या विरोधात कठोर कारवाई न करण्याचं अपयश की अशा प्रसंगांना कसं तोंड द्यायचं याचं प्रशिक्षणच न देणाऱ्या शिक्षणव्यवस्थेचं की लहानपणापासून नमतं घेण्याचेच संस्कार देणाऱ्या कुटुंबव्यवस्थेचं की अशा प्रसंगांच्या वेळी ठामपणे पाठीशी न उभ्या राहणाऱ्या समाजव्यवस्थेचं?

दरवर्षी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर हा कौटुंबिक हिंसाचारविरोधी पंधरवडा म्हणून पाळला जातो. आताही तो चालूच आहे. या काळात स्त्रिया हिंसाचाराला बळी जाऊ नयेत यासाठी उपाय सुचवले जातात, योजना आखल्या जातात; पण स्त्रियांवरचे अत्याचार काही थांबत नाहीत. उलट दिवसेंदिवस ते वाढतच चालले आहेत. नुकत्याच ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो’ने जाहीर केल्यानुसार गेल्या वर्षी २०२२ या एका वर्षात भारतातली स्त्रियांवरील अत्याचार वा गुन्ह्यांची तब्बल ४ लाखांच्या वर प्रकरणे नोंदवली गेली. दर तासाला ५१ गुन्ह्यांची पोलिस ठाण्यात नोंद होते. (नोंद न झालेली प्रकरणं यापेक्षा किती तरी अधिकच असतील) या अत्याचार करण्यात उत्तर प्रदेश पहिला, तर महाराष्ट्र दुसरा आहे. त्यातील सर्वाधिक संख्या कौटुंबिक अत्याचारांची आहे.

आणखी वाचा-रेडिओ जॉकी ते मिझोरामच्या सगळ्यात तरुण महिला आमदाराचा मान; जाणून घ्या बेरिल व्हॅनीहसांगी यांचा प्रेरणादायी प्रवास

आपल्याच म्हणवणाऱ्या माणसांकडून होणारा हा अत्याचार आणि त्याला बळी जाणं हे आजही भारतीय स्त्रियांचं प्राक्तन असावं, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आणि लग्नाआधीच जेव्हा शहानासारख्या २६ वर्षीय तरुणीला आपल्याच प्रियकराच्या नाकर्तेपणाला बळी जावं लागतं तेव्हा मात्र ‘यामागचं अपयश कुणाचं?’ हा प्रश्न ज्वलंत होत त्याचं उत्तर मागतो.

arati.kadam@expressindia.com