आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जाहीर केली, तेव्हापासूनच क्रिकेट चाहत्यांनी प्राथमिक फेरीतील सामने प्रत्यक्षात बघण्यासाठी तिकिटे विकत घ्यायला सुरुवात केली होती. स्पर्धा जशी जवळ आली, तशी प्राथमिक फेरीतील जवळपास सर्व मुख्य सामन्यांच्या तिकिटांसाठी ‘हाऊसफुल’चा फलक लागला. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या भारताच्या धुलाईमुळे आणि प्राथमिक फेरी कोण पार करू शकेल, या अनिश्चिततेमुळे बऱ्याच समर्थकांनी हात आवरता घेतला होता. ‘काय निकाल लागतोय, ते बघू आधी आणि मग ठरवू’ असा निर्णय काही हुशार क्रिकेटप्रेमींनी तेव्हा घेतला
होता.
विश्वचषक प्राथमिक परीक्षेचा निकाल लागला असून, उत्तीर्ण झालेल्या आठ संघांपकी आशियातील कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या चारही संघांचा समावेश आहे. आशियात जितके क्रिकेटशौकीन आहेत, तेवढे जगात कुठेही नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्यक्षात सामना पाहणाऱ्यांपकी या देशांतील प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना फारसे आव्हान न देऊ शकणाऱ्या (अ-गटातील पात्र ठरणारा शेवटचा संघ) बांगलादेशशी होणार असून, उपांत्य फेरीत आणि बहुदा अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहते या सामन्यांची तिकिटे मिळविण्याच्या मागे लागले आहेत. उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या संघांची घोषणा होताच मुंबईतील शेअर बाजारामध्ये काम करणाऱ्या राहुल आणि सुरेश मेनन या भावंडांनी wclogताबडतोब आपल्या ट्रॅव्हल एजंटला फोन फिरवला आणि ‘‘आज पॅकेज का क्या भाव है?’’ असे खडसावून विचारले. काहींनी आयसीसीच्या संकेतस्थळाकडे तिकिटाचा शोध घेत झेप घेतली, तर काहींनी विमान कंपन्यांच्या कार्यालयात फोन करून ‘‘ऑस्ट्रेलियासाठी तिकिटे कशी हो?’’ अशी चौकशी करायला सुरुवात केली आहे.
बांगलादेशवर विजय मिळाल्यावर (मिळेलच अशी या सर्वाना खात्री आहे!) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया किंवा याहून पसा वसूल अशी भारत विरुद्ध पाकिस्तान लढत बघण्याची शक्यता उद्भावली आहे. ५०-६० हजार रुपयांत मिळणारी विमानाची तिकिटे आता ७०-७५ हजार रुपयांत मिळायला सुरुवात झाली आहे. हा खर्च आपल्या आवाक्यात नसल्यामुळे काहींनी ‘फेसबुक’अथवा ‘व्हॉट्सअ‍ॅप’सारख्या समाजमाध्यमाचा वापर करून ऑस्ट्रेलियात काही दिवस राहता येईल का? अशा मित्रांचा किंवा नातेवाईकांचा शोध सुरू केला आहे. आयसीसी, एमसीजीने आपल्या संकेतस्थळांवर जाहिराती वाढवल्याचे जाणवते. या शिवाय ई-बे, गम त्री विवागोसारख्या अनेक कंपन्यांनी विश्वचषक तिकीट विक्रीचा प्रसार करायला सुरुवात केली आहे. नंतर अधिक दरांनी विकता येतील, अशा पूर्वकल्पनेने काही हुशार व्यवहारचतुरांनी जास्त तिकिटे विकत घेतली होती. आता त्याची विक्री करण्यासाठी बरेच ई-मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅप संदेश गेले दोन-तीन दिवस गिरक्या घालत आहेत.     
प्राथमिक फेरीची तिकिटे न पटकावणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी हाती लाभली आहे. भारत पाकिस्तान किंवा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना प्रत्यक्षात बघता न आल्यामुळे ही संधी हातातून जाऊ न देण्याचा निर्णय अनेक क्रिकेटप्रेमींनी घेतलेला दिसून येत आहे. ऑस्ट्रेलिया खेळत असलेल्या सामन्यांऐवजी दुसऱ्या कुठल्याही सामन्यांचे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिन्या करत नसल्यामुळे सामान्य क्रीडाप्रेमी सामना पाहण्याच्या सुखापासून वंचित राहिले आहेत. पसे देऊन केबलवर सामना पाहण्याऐवजी त्यांच्यासमोर आता एकच पर्याय राहिलेला आहे आणि तो म्हणजे ‘हाऊसफुल’चा फलक लागण्याआधी एक तरी तिकीट बळकावून विश्वचषकातील इतिहासाचा प्रत्यक्ष साक्षीदार बनण्याचा. तिकिटांची उपलब्धता प्रकाशवेगाने जरी कमी होत असली, तरी ‘वर्ल्ड कप तिकीट के लिये कुछ भी करेगा’ अशी धारणा असलेले हे क्रिकेटप्रेमी पुढचे सामने पाहण्यासाठी जमेल ते करतील, यात वाद नाही.
मिहीर खडकीकर