log55क्रिकेटविश्वात भूकंप होण्यासारखंच काही तरी त्या आलिशान हॉटेलात रहस्यमय पद्धतीनं आकार घेत होतं. आदल्या रात्री उशिरा चार वेगवेगळ्या सूटमध्ये चार दिग्गज क्रिकेटपटू उतरवले गेले होते. एकमेकांसमोर ते चौघेही येताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, ‘‘वीरू पाजी, तुम्ही? भज्जी, गौती, तुम्हीपण?’’ म्हणत युवराज सिंगने तिघांनाही मिठी मारली. थोडक्यात वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि गौतम गंभीर  गोपनीयरीत्या आणले गेलेले हे ते चार दिग्गज खेळाडू. ‘‘चला, उरलेले तिघे कोण हे कळले; पण इथं आपल्याला असं बोलवणारे कुठे आहेत?’’ भज्जीनं प्रश्न केला. ‘‘येतील, येतील ते. आलोय ना आपण इथपर्यंत, मग थोडा धीर धरू या!’’ सेहवाग समजुतीचा सूर लावू लागला. ‘‘वीरू पाजी, इतकी र्वष आपण धीरच तर धरतो आहोत..!’’ गौतम जास्तच गंभीर होत म्हणाला.
चौघांनाही फोन आला होता. ‘‘अजूनही वर्ल्ड कप खेळण्याचा मौका आहे!’’ या तातडीच्या निरोपाबरोबर गाशा गुंडाळून ते या हॉटेलवर आले होते. संघटनेने आपल्याला इकडे दुबईत का बोलावले असेल हे काही त्यांच्या लक्षात येईना; पण आयसीसीचे मुख्यालय दुबईमध्ये आहे. तेव्हा आपल्याला जो फोन आला त्यात काही तरी तथ्य असणार. संधी साधण्यावाचून पर्याय नव्हता. आता मधूनच आपला भारतीय संघामध्ये समावेश केला जाणार असेल, तर वर्ल्ड कप क्रिकेटविश्वात मोठा हलकल्लोळ माजणार, हे त्यांना माहीत होते. ‘‘बोर्ड काहीही करू शकते, त्यांनी आयसीसीला पटवले असणार!’’ युवराज खात्रीने म्हणाला. ‘‘ही टीम तर जबरदस्त खेळते आहे. मग आपल्याला कसं काय घेतलं जाईल? ..आणि कुणाच्या जागी?’’ गंभीरच्या प्रश्नाकडे सारेच अवाक्पणे पाहतात.
‘‘अश्विन एका डावात ५ बळी घेऊ नाही शकला. मी हे सहज करू शकतो. अश्विनला बॅटिंगही कुठे जमते? मी तर छकडा मारू शकतो, हे तर कुणीही भारतीय माझ्याबद्दल पैज लावून सांगू शकतो!’’ आपली वर्णी अश्विनच्या जागी लागली असावी, असा हरभजनचा अंदाज होता. ‘‘रोहित तर सारखा अपयशी होतोय. यूएईसारख्या िलबूटिंबू संघाबरोबर कसंबसं अर्धशतक केलं त्यानं. माझ्यासाठी त्यालाच माघारी पाठवला असणार.’’ गंभीर चिडला होता. ‘‘मला तर धोनीच्या जागेवरच खेळायचं आहे!’’ सेहवागने मोठाच बॉम्ब टाकला; पण हे या जन्मात तरी शक्य होणार नाही याची वीरूला कल्पना होती. आपल्याला कुणाच्या जागी बोलावलं असेल हे काही त्याच्या लक्षात येत नव्हतं.
‘‘आता कोणत्याही क्षणी निवड समितीबरोबर धोनीपण येईल. तेव्हा डोंट रिअ‍ॅक्ट!’’ युवराजने वीरूला सबुरीचा सल्ला दिला. ‘‘मला काय करायचेय त्याच्याशी? मला फक्त वर्ल्ड कप खेळायला मिळाल्याशी मतलब!’’ परिस्थितीमुळे सेहवाग शहाणा झाला होता. ‘‘हे बघ, उपकर्णधार केलं तर हो गपचूप!’’ हरभजनने मुद्दय़ाला हात घातला. त्याबरोबर वीरू उसळला. ‘‘धोनीच्या हाताखाली राहू?’’ हे ऐकताच युवराजला हसू आवरलं नाही. ‘‘अरे, तसेही भारतीय टीममधून खेळायचं तर धोनीच्या हाताखालीच खेळायला लागतंय ना?’’ आपल्याला रैनाच्या जागी घेतले असणार की रवींद्र जाडेजाच्या, याबाबत युवीला अंदाज येत नव्हता.
‘‘बांगलादेशचा अल-अमिन हुसेन रात्री उशिरापर्यंत बाहेर होता म्हणून शिस्तभंगाची कारवाई करून त्याला माघारी पाठवलं. असं काही भारतीय प्लेअरबाबतीत झालं नसेल ना? बीसीसीआयने पत्नी, प्रेयसी सोबत आणण्यास मनाई केली आहे. बाकी सगळे ऐकतील; पण विराट जुमानला नसणार. हो, हो, विराटला अनुष्कामुळे माघारी पाठवण्याचा निर्णय झाला असणार. पबमध्ये गेले असतील. काँग्रॅट्स ब्रदर, तुला विराटच्याच जागी घेतलाय!’’ हरभजनला मोठाच शोध लागला होता. काहीही गडबड झालेली का असेना, आपल्याला हा वर्ल्ड कप खेळायला मिळणार म्हणून चौघेही आनंदात होते. बेल वाजली. दोन अरब असामी एका मराठी चेहऱ्यासोबत तिथे आले. त्यांना पाहून हा नेमका काय प्रकार आहे हे त्या चौघांनाही कळेनासं झालं. तो अरब मोठय़ा अदबीनं म्हणाला, ‘‘तुम्हा चौघांनाही यूएई संघात येण्याचं निमंत्रण आहे. आयसीसीबरोबर सारे सोपस्कार पार पडले आहेत. चौघांनाही हे मान्य असेल तर संयुक्त अरब अमिरातीच्या संघात तुम्हाला सामावून घेतलं जाईल. तुम्ही तयार असाल तर करारावर स्वाक्षरी करा. इथे नोकरीचीही व्यवस्था केली जाईल.’’
‘‘आमच्या रक्तात जरी क्रिकेट असलं तरी हृदयात मात्र फक्त भारत आहे!’’ असं चौघंही जिवाच्या आकांतानं ओरडले आणि त्यांनी धूम ठोकली.
पहाटे तीनची वेळ होती. इरफान पठाण बेडवरून खाली पडला. युसूफ पठाण त्या आवाजाने जागा झाला. घामाने प्रचंड डबडबलेला इरफान युसूफ भाईजानला पडलेले भयंकर स्वप्न सांगू लागला. त्याच वेळी इरफान आणि युसूफ या दोन्ही पठाण बंधूंचे मोबाइल खणखणू लागले. मोबाइल स्क्रीनवर दुबईचा नंबर ‘फ्लॅश’ होत होता. दोघे बंधू एकमेकांकडे पाहात राहिले. नेमक्या याच वेळी मॅचमधील षटकादरम्यानचे ‘मौका.. मौका..’ हे गाणे वाजत होते.
ज्ञानेश्वर मर्गज