(तोताराम रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणी गिऱ्हाईक मिळतंय हे निरखतोय. पिंजऱ्यात विठ्ठलपंत पहुडलेत. समोरच्या अरुंद बोळातून आळोखेपिळोखे देत चंपक अवतरतो. आता पुढे..)
wc13तोताराम : आज भल्या सकाळीच आलास. तुझं येणं माझ्यासाठी शुभशकुन आहे.
चंपक : शुभशकुन, कसा?
तोताराम : तू गेलास आणि गिऱ्हाईकांची रीघ लागली. दिवस संपताना मी खूश आणि शेंगदाण्यांची अख्खी पुडी मिळाल्याने विठ्ठलपंत खूश. असाच येत जा.
चंपक : आज वर्ल्डकपमध्ये मोठ्ठं कोडं आहे.
तोताराम : तणाव नाही. विठ्ठलपंत जागे व्हा, कोडं सोडवा-बक्षीस मिळवा.
(विठ्ठलपंत ट्रम्प कार्ड हाती देतात.) क्या बात है!
तोताराम : क्रिकेट कमी, ठस्सन जास्त दिसते. कांगारू आणि इंग्लंडच्या राणीची माणसं. खरं तर एकच वंशवेल, पण म्हणतात ना हाडवैर घराला पोखरतं. दोन्ही एकमेकांना पाण्यात पाहतात. क्षुल्लक कारणावरून वाद झडेल आणि वादाच्या ठिणगीची ‘राख’ कुठे पसरेल सांगता येत नाही. विश्वचषक सण मोठा. सणासुदीच्या काळात बार्मी-आर्मीच्या माणसांवर ते विजय मिळवतील. मात्र विजय सोपा नसेल, पण आयुष्यात सोपं काहीच नसतं. कांगारूंचा कर्णधार खेळणार नाही, पण त्याने फरक पडत नाही. त्यांचा जोश आणि ‘जेम्स’ महत्त्वाचे ठरतील.
चंपक : बार्मी-आर्मीला साजरं करण्यासारखं काहीच नाही?
तोताराम : नाही कसं. खुशी हो या गम, पिनेवालोंको बस्स बहाना चाहिए..