wclogoझोपी गेलेल्याला कुणी जागे करू शकेलही, पण झोपी गेल्याचं सोंग घेणाऱ्याला कोण कसं जागं करू शकेल? यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्यपूर्व सामन्यात, ‘पंचांनी चुकीचे निर्णय घेतले नसते, तर (भारताला हरवून) बांगलादेश विजयी झाले असते. पराभव आमच्या माथी लादला गेला’- असे कडक बोल आहेत बांगलादेशच्या पंतप्रधानांचे. त्यांची योग्य ती दखल घ्यायची, कारण हे बोल आहेत खास करून भारताशी स्नेहसंबंध जोपासणाऱ्या शेजारी देशाच्या पंतप्रधानांचे.
मेलबर्नमधील बांगलादेशीयांनी एक समारंभ आयोजला होता. त्या समारंभात बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नझमुल हसन निमंत्रित होते. पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाक्यातून त्यांच्याशी थेट संपर्क साधला फोनवर. त्यांच्या संदेशासाठी, फोन लाऊडस्पीकरवर जोडला गेला आणि त्यांचे मनोगत मेलबर्नमधील बांगलादेशीयांना ऐकवलं गेलं. क्रिकेटपटूंना शुभेच्छा देऊन शेख हसीना म्हणाल्या, ‘‘पंचांनी चुकीचे निर्णय घेतले नसते, तर (भारताला हरवून) बांगलादेश विजयी झाले असते. इन्शाला! (म्हणजे प्रभूंची इच्छा). आगामी काळात बांगलादेश विजयी होईल, एके दिवशी बांगलादेश जगज्जेते होतील.’’
संघनायक मश्रफी मुर्तझा व त्याचे सहकारी यांना नाराज होण्याचं कोणतंही कारण नाही, असे सांगून बांगलादेशच्या पंतप्रधान पुढे म्हणाल्या, ‘‘तुम्ही दु:खीकष्टी, नाराज व्हावं, असं कोणतंही कृत्य तुमच्या हातून घडलेलं नाही. आपल्या बांगलादेश संघाला कसं हरवलं गेलंय, ते साऱ्यांनी पाहिलंय! भविष्यकाळात आम्ही जिंकूच जिंकू.’’
‘बीडी न्यूज’ने फोनवरील त्यांच्या संदेशाची बातमी दिली २१ मार्चला. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलनं विंडीजविरुद्ध नाबाद २३७ धावा बदडून काढल्या, त्या दिवशी. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, भारत-बांगलादेश सामन्यानंतर दोन दिवसांनी पंचांच्या निर्णयावर त्यांनी ‘चुकीचे’ असा शिक्का मारला, ‘पक्षपाती’ असा नव्हे! ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) ही इंडियन क्रिकेट समिती बनलीय,’ अशा बेताल आरोपांच्या सुरात सूर मिसळण्याचं त्यांनी कटाक्षानं टाळलं.
दादागिरी आरोप टाळा!
शेख हसीना यांच्या वक्तव्याची दखल घ्यायची, कारण त्या बांगलादेशच्या पंतप्रधान. कारण, त्यांचं धोरण भारताशी मित्रत्वाचं. ईशान्य भारतातील व परिसरातील दहशतवादी कारवायांना त्या थारा देत नाहीत. बेगम खालीद झिया यांच्या पाकिस्तानवादी भूमिकांपेक्षा शेख हसीना भारतासाठी खूप अनुकूल. भारत स्वत:ला महासत्ता समजतो, त्या गुर्मीत राहातो, मोठय़ा भावासारखी दादागिरी करतो, असा प्रचार श्रीलंका, नेपाळ व बांगलादेशमध्ये मोठय़ा प्रमाणावर केला जातो. त्याची दखल शेख हसीनांना घ्यावी लागते अन् जनभावनांना भावेल असं, पण सौम्य शब्दांतलं का होईना ‘सदोष’ पंचगिरीबाबतचं निवेदन करावं लागतं. भारतानं ते समजून घेतलं पाहिजे. याचा प्रतिवाद करण्याचा मोह टाळला पाहिजे.
तिस्ता नदीच्या पाण्याचं वाटप, सीमारेषेलगतच्या काही भूभागांची अदलाबदल व बांगलादेशीयांची भारतात घुसखोरी, हे आहेत भारत-बांगलादेश यातील वादाचे मोठे मुद्दे. क्रिकेटचा विषय त्या मानानं किरकोळ, पण भरतखंडात लोकांच्या हृदयाला हात घालणारा! भारताच्या दादागिरीचे आरोप क्रिकेट क्षेत्रातही होत आहेत. शेजारी बांगलादेशला भारतीय दौऱ्यावर बोलावलंच जात नाही, कारण त्यांच्या सामन्यांना टीव्ही रेटिंग (टीआरपी) हलका मिळतो. या नफ्यातोटय़ापलीकडे पाहाण्याची ऐपत आज भारतीय मंडळात आहे. तशी पुरोगामी पावलं भारतानं टाकली, तर अशा प्रासंगिक वादातून राईचे पर्वत उभे राहणार नाहीत!
अपील का केलं नाही?
आता समाचार घेऊ या मुस्तफा कमाल यांच्या आजवरच्या दोन बेफाम निवेदनांविषयी. कमाल मोशाय हे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष व आयसीसीचे सध्याचे अध्यक्ष. भारत-बांगलादेश सामन्यातील काही निर्णय पंचांनी आधीच ठरवून घेतले होते. ‘इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल’चं रूपांतर इंडियन क्रिकेट कौन्सिलमध्ये झालेलं आहे, ही त्यांची वक्तव्ये. कोणत्याही क्षेत्रातील महासत्तेविरुद्ध आवाज उठवणं सोयीस्कर असतं. भारताला आज तीच किंमत मोजावी लागत्येय.
पहिला वादग्रस्त प्रसंग विराट कोहली बाद झाल्यानंतरचा. सकाळी ११ वाजून ३४ मिनिटे: रैनाला पंच इयन गोल्ड यांनी पायचीत ठरवलं नाही. बांगलादेशनं अपील केलं. टीव्ही पंच स्टीव्ह डेव्हिस यांनी रिप्ले अभ्यासले. चेंडूचा टप्पा डाव्या यष्टीच्या रेषेबाहेर. निदान त्या क्षणी चेंडूचा बहुतांश भाग डाव्या यष्टीबाहेर. तिसरे पंच स्टीव्ह डेव्हिस यांनी मैदानी पंचांचा निर्णय योग्य ठरवला.
दुसरा वादग्रस्त प्रसंग- ४१व्या षटकात भारत ३ बाद १९५, रोहित शर्मा ९०वर. स्क्वेअर लेगचे पंच अलीम दार यांनी, चेंडू फलंदाजाच्या कमरेपेक्षा उंच उसळलाय म्हणून नोबॉल ठरवला. मग रोहितनं उंच फटकावला. तो झेल पकडला गेला. पंचांचा निर्णय चूक, एवढंच नव्हे तर ‘आधीपासून ठरवलेला’ असं मुस्तफा मोशॉय म्हणतात. मग मैदानात कर्णधार मुर्तझाने त्याविरुद्ध अपील का केलं नव्हतं? दुसरी गोष्ट, पंचांनी नोबॉल घोषित केल्यामुळे साहसी फटका मारण्यास रोहित सरसावला. पंचांचा निर्णय चूक असेल, तर त्याची शिक्षा फलंदाज रोहितला होणं, हे त्याच्यावर अन्यायकारक नाही का?
शेख हसीना यांचं नाराजीचे निवेदन भारतानं समजून घ्यावं. ते निवेदन न ऐकल्यासारखं वागावं. उद्या-परवा बांगलादेश जगज्जेता व्हावा, अशाही शुभेच्छा द्याव्यात. मुख्य म्हणजे बांगलादेशला नियमितपणे भारतात बोलवावं, पण मुस्तफांच्या बेताल आरोपांचा समाचार योग्य ठिकाणी, योग्य वेळी जरूर घ्यावा!
 वि. वि. करमरकर