wclogभारताचा सामना यंदा रविवारी नसून शुक्रवारी खेळला जाणार होता. पर्थ येथील वाकाच्या खेळपट्टीवर बरोब्बर साडेपाच वाजता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सामना सुरू होणार होता. सुंदर, मोकळे, निळे आकाश आणि स्वच्छ हवामान क्रिकेटच्या खेळासाठी सज्ज होते. सकाळी कार्यालयात पोहोचलो. माझ्या क्रिकेटवेडय़ा मित्रांशी लगेचच संपर्क साधला आणि संध्याकाळी लवकर निघायची योजना आखली. दिवसभराच्या सगळ्या बैठका पाच वाजण्याच्या आधी संपवून पबमध्ये मॅच बघायचे आम्ही सर्वानी ठरवले होते.
पुढच्या आठवडय़ात एक मोठे प्रोजेक्ट अमलात आणायचे लक्ष्य आमच्यासमोर ठेवण्यात आले होते. फार कमी वेळात बऱ्याचशा गोष्टींची पूर्वकल्पना करून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमच्या हाती सोपवली होती. एवढे असूनसुद्धा गेल्या काही दिवसांपासून आम्ही जाणीवपूर्वक जास्त वेळ ऑफिसात थांबून सगळी कामे त्याच्या त्या दिवशी संपवायचा जवळपास यशस्वी प्रयत्न करत होतो. सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती. याचप्रमाणे माहितीतल्या लोकांपकी भारत-विंडीज सामना बघण्यासाठी कुणीही ‘पर्थ’यात्रा करणार नव्हते. प्राथमिक फेरीत भारताच्या उत्तम कामगिरीमुळे बऱ्याच चाहत्यांनी भारताचे अन्य सामने पाहण्याऐवजी उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीच्या सामन्यांची तिकिटे घ्यायला सुरुवात केली आहे.
सकाळपासून सर्वानीच फटाफट कामे करण्याचा सपाटा लावला होता. दुपारचे तीन वाजले होते आणि दोन-तीन गोष्टींशिवाय बाकी सर्व कामे आटोक्यात आल्याची दिसत होती. साडेपाच नाही तरी किमान साडेसहापर्यंत तरी निघता येईल अशी आम्हा सर्वाना खात्री होती. प्रकल्पाच्या ताज्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी साहेबांनी संध्याकाळी ४.३० वाजता तातडीची बैठक बोलावली. काम आटोक्यात असल्यामुळे सभा जास्त वेळ चालणार नसल्याची आम्हाला पूर्ण खात्री होती. आम्ही नििश्चत होऊन स्थितीचा आढावा साहेबांसमोर मांडला आणि सभा समाप्त होण्याची वाट बघत होतो. साहेबांनी सर्व मुद्दय़ांचा विस्तारित तपशील घेतला आणि शांतपणे सर्व ऐकून घेतल्यानंतर म्हणाले, ‘‘हे सर्व ठीक आहे, पण आपल्यासमोर एक मोठी समस्या आहे, ज्याचे समाधान आपल्याला शोधायला हवे. इतक्यात आमच्या साहेबांना वरिष्ठ साहेबांचा दूरध्वनी आला आणि ते बोलत होते. बैठक कक्षेमध्ये सन्नाटा पसरला. अचानक आम्हाला जाणीव झाली की, बैठकीत सहभागी होणारी मंडळी मूळ भारतीय होती.
अचानक सात वाजल्याचे लक्षात आले आणि आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ‘स्कोअर काय झाला असावा?’ हाच प्रश्न दिसत होता. लगेचच चार-पाच फोन बाहेर आले आणि कुजबुज सुरू झाली. वेस्ट इंडिजचे एव्हाना सहा फलंदाज किरकोळ धावा काढून तंबूत परतले होते. हळूच आमचे क्रिकेटबद्दल बोलणे सुरू झाले. हाती असलेली समस्या आम्ही लगेचच विसरलोच होतो. चर्चा लवकरच दिशाहीन झाली आणि भारताच्या गोलंदाजीत कशी सुधारणा करता येईल, यापासून ते भारतात रणजी क्रिकेट स्पध्रेचा स्तर कसा सुधारला पाहिजे, इथपर्यंत गेली. तेवढय़ात साहेबांचे बोलणे संपले होते आणि त्यांनी गंभीर आवाजात म्हटले की, ‘‘ही समस्या आपल्याला आजच सोडवायची आहे, दुसरा पर्याय नाही!’’ बैठक कक्षामध्ये पुन्हा शांतता पसरली, मॅच पाहण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार असल्याचे दिसत होते. मग साहेबांनी दहा मिनिटांची सुटी दिली आणि म्हणाले, ‘‘यानंतर आपण परत जमू या आणि हा प्रश्न सोडवून मगच उठू या!’’
बाहेत जाण्याऐवजी स्कोअर किती झाला आहे, ते बघू या असे बहुमत ठरले. कप्तान जेसन होल्डरच्या अर्धशतकाच्या मदतीने िवडीजने १८३ धावा जमवल्या होत्या. कुणीतरी उल्लेख केला की १९८३च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारतानेदेखील िवडीजसमोर हेच लक्ष ठेवले होते. मग िस्वग गोलंदाज मदन लालने ३१ धावांत ३ बळी घेतले होते, ही चर्चा रंगली. साहेबांना दरवाज्याजवळ उभे असलेले बघून चर्चा थांबली आणि हाती असलेल्या समस्येचे समाधान शोधण्यासाठी चच्रेची दिशा बदलली. मग चार तास गहन चच्रेत सगळे हरवून गेलो आणि शेवटी समाधान सापडले. आमच्या सर्वाच्या चेहऱ्यांवर समाधान दिसत होते आणि अचानक साहेबांनी विचारले, ‘‘जिंकलो का आपण?’’ कुणीतरी पटकन स्कोअर पाहत आणि आश्चर्यचकित होत म्हणाले, ‘‘हो, फक्त चार बळी राखून जिंकलो. सामना अत्यंत चुरशीचा झालेला दिसतोय. बघता आला असता तर मजा आली असती!’’
तेवढय़ात साहेबांना पुन्हा दूरध्वनी आला आणि त्यांनी घोषणा केली की, ‘‘आपण जी चर्चा करीत होतो तो प्रकल्प लांबवण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे!’’
मिहीर खडकीकर