ज्याची सारेच चार वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते, ती घटका आता समीप आली आहे. क्रिकेट विश्वातील १४ देश या क्रिकेट विश्वचषकाच्या या कुंभमेळ्यासाठी सज्ज झाले असून श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील सलामीच्या लढतीने थरारपूर्ण नाटय़ाचा पडदा उघडणार आहे.
मायदेशातील खेळपट्टय़ा, वातावरण आणि मिळवलेले विजय या साऱ्यांमुळे न्यूझीलंडचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे. यापूर्वी न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धची मायदेशातील मालिका जिंकली होती. कर्णधार ब्रेन्डन wc15मॅक्क्युलम, रॉस टेलर, केन विल्यमसन यांनी फलंदाजीमध्ये चमक दाखवली आहे. त्याचबरोबर अष्टपैलू कोरे अँडरसनही चांगल्या फॉर्मात आहे. टिम साऊदी हे संघाचे प्रमुख अस्त्र असेल, त्याला या वेळी मिचेल मॅक्क्लिनॅघम आणि कायले मिल्स यांची चांगली साथ लाभेल.
श्रीलंकेच्या संघाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावलेली असली तरी विश्वचषकाचा नूर काही औरच असतो. त्यामुळे ‘जुने जाऊ दे मरणालागुनी’ म्हणत श्रीलंकेने हा पराभव विसरण्याचे ठरवले आहे. श्रीलंकेकडे तिलकरत्न दिलशान, कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने हे अनुभवी त्रिकूट असून यांच्यापैकी एकाने जरी ५० षटके खेळून काढली तरी त्यांना आव्हानात्मक धावसंख्या उभारता येऊ शकते. लहिरू थिरीमाने आणि दिनेश चंडिमलसारखे युवा फलंदाजही त्यांच्याकडे आहेत. कर्णधार अँजेलो मॅथ्यूज हा उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. लसिथ मलिंगाच्या तंदुरुस्तीवर श्रीलंकेची गोलंदाजी अवलंबून असेल; कारण मलिंगा जर पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर प्रतिस्पध्र्याना त्याच्यापासून नक्कीच सावध राहावे लागेल.
न्युवान कुलसेकरा आणि थिसारा परेरा यांच्यावर मध्यमगती माऱ्याची जबाबदारी असेल, तर सचित्रा सेनानायके, जीवन मेंडिस यांच्यावर फिरकीची भिस्त असेल.

सामना क्र. : १   न्यूझीलंड वि. श्रीलंका (अ-गट)
स्थळ : हेगले ओव्हल, ख्राइस्टचर्च   ल्ल वेळ : पहाटे ३.३०
लक्षवेधी खेळाडू
कुमार संगकारा (श्रीलंका) : क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये यशस्वी ठरलेला श्रीलंकेचा महत्त्वपूर्ण खेळाडू. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांमध्ये
कोणत्याही परिस्थितीमध्ये दमदार फलंदाजी करून संघाला आव्हानात्मक
धावसंख्या उभारून देणारा हुकमी एक्का. फलंदाजीबरोबरच यष्टिरक्षणाची जबाबदारी उत्तमपणे सांभाळणाऱ्या संगकाराचा हा अखेरचा
विश्वचषक आहे.
टिम साऊदी (न्यूझीलंड) : आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पध्र्याची भंबेरी उडवण्यात टिम साऊदी पटाईत आहे. मायदेशातील खेळपट्टय़ांवर आतापर्यंत त्याने चमकदार कामगिरी करत संघाला घवघवीत यश मिळवून दिले आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात साऊथी हे न्यूझीलंडचे प्रमुख अस्त्र असेल.

बोलंदाजी
आम्ही १९९६ साली विश्वचषक जिंकला होता. पण त्यानंतर एकदाही आम्हाला जेतेपदावर शिक्कामोर्तब करता आलेले नाही. दोनदा आम्हाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे, पण या वेळी आम्हाला त्याच्यापुढे जाऊन जेतेपद पटकवायचे आहे. विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्यासाठी आम्ही सज्ज झालो असून पहिल्या सामन्याच्या प्रतीक्षेत आहोत.
– महेला जयवर्धने (श्रीलंका)
विश्वचषकाची सारेच आतुरतेने वाटत पाहत असतात आणि आता काही तासांवर ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. न्यूझीलंडचा संघ सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात आहे. दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढय़ संघावर आम्ही विजय मिळवला असल्याने संघाचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे आणि त्याचाच फायदा आम्हाला या विश्वचषकात होईल.
ब्रेन्डन मॅक्क्युलम (न्यूझीलंड) :

आमने सामने
सामने ९७ – श्रीलंका : ४० ’ न्यूझीलंड : ४१ ’ टाय / रद्द : १६

संघ
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लहिरू थिरीमाने (उपकर्णधार), कुमार संगकारा (यष्टीरक्षक), तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने, दिनेश चंडिमल, दिमुथ करुणारत्ने, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, धम्मिका प्रसाद, न्युवान कुलसेकरा, रंगना हेराथ, सचित्रा सेनानायके.
न्यूझीलंड :  ब्रेंडन मॅक्क्युलम (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, ग्रँट इलियट, टॉम लॅथम, मार्टिन गप्तील, मिचेल मॅक्क्लिनॅघम, नॅथन मॅक्क्युलम, कायले मिल्स, अ‍ॅडम मिलने, डॅनियल व्हेटोरी, केन विल्यम्सन, कोरे अँडरसन, टिम साऊदी, ल्युक रोंची (यष्टिरक्षक), रॉस टेलर.