मोठय़ा स्पर्धामध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या संघांमध्ये भारताचा समावेश होतो. यंदाच्या विश्वचषकात युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अफलातून होते आहे. या संघाला जेतेपद राखण्याची उत्तम संधी आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने व्यक्त केले.
‘‘भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाने मी खूपच प्रभावित झालो आहे. ज्या वेळी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होतो, तेव्हा भारताच्या क्षेत्ररक्षण या कच्च्या दुव्याचा आम्ही फायदा घ्यायचो. परंतु आता तसे नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत ए बी डी’व्हिलियर्स आणि डेव्हिड मिलर या महत्त्वाच्या फलंदाजांना त्यांनी धावचीत केले आणि सामन्याचे चित्रच पालटले,’’ असे हॉगने सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघाच्या सुमार कामगिरीविषयी विचारले असता हॉग म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियाच्या प्रदीर्घ दौऱ्यात भारतीय संघाला एकही विजय मिळवता आला नाही. मात्र विश्वचषकापूर्वी मिळालेल्या विश्रांतीचा पुरेपूर फायदा उठवत भारतीय
संघाने या स्पर्धेत तीन दमदार विजय
मिळवले आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात स्थिरावला आहे. इथल्या परिस्थितीत खेळपट्टीशी कसे जुळवून घ्यायचे हे त्यांना समजले आहे. जेतेपद राखण्याची त्यांना सर्वोत्तम संधी आहे.’’