पंजाबी चवीमुळे आमच्याकडे जशी मुंबईतली चित्रपट उद्योगातली मंडळी झुकली, तशी आधी आजूबाजूच्या दादर परिसरातील आणि नंतर सर्व मुंबईभरातील लोकांना प्रीतमच्या पंजाबी जेवणाची सवय होऊ लागली. आम्हीही एव्हाना पक्के मुंबईकर झालो. कित्येकदा माझ्या मुलांना घेऊन आम्ही (मी आणि माझी पत्नी) दादर चौपाटीवर फिरायला जात असू. त्यावेळची दादर चौपाटी म्हणजे खरोखरच फिरण्यालायक जागा होती. कमी गर्दी. आरडाओरडा तर मुळीच नाही. फेरीवाल्यांचा विळखा नाही. छान अरबी समुद्र. किनाऱ्यावरची पांढरीशुभ्र पुळण. क्षितिजावर दूरवर दिसणाऱ्या होडय़ा, तराफे. मासे पकडण्यासाठी गेलेले व परतणारे कोळी. हे सगळं पाहून आम्ही मंत्रमुग्ध होऊन जात असू. टोनी, गोगी, डिंपी ही मुलं पुळणीत किल्ले करत असत. त्यांच्यासाठी किल्ला बनवायचं सामान घेऊन जावं लागे. कामाचे कितीही गाडे उपसत असलो तरी मी मुलांसाठी वेळ काढत असे. नव्हे, काढावाच लागत असे! दादर चौपाटीला गेल्यावर कित्येकदा आमचं वेळेचं भान हरपत असे. मग पत्नीला किंवा मला संध्याकाळच्या ‘प्रीतम’मधल्या कामांचे स्मरण होई. आणि मग आम्ही भराभरा चौपाटीवरून परतत असू. गाडीनं फार तर चार-पाच मिनिटं लागत परतायला.

चौपाटीला जाता-येताना भव्यदिव्य असं शिवाजी पार्क लागत असे. या मैदानाच्या परिघावर लावलेली आणि जपलेली झाडं, सभोवार बांधलेला कट्टा, एका बाजूला गणपती- बाप्पाचं मंदिर, व्यायाम म्हणून चालणारी ज्येष्ठ नागरिक मंडळी आणि क्रिकेट खेळणारी तरुण मुलं! आजूबाजूला उभ्या राहिलेल्या तीनमजली इमारती. त्यातल्या बऱ्याचशा इमारती एकसारख्या दिसत. त्यावेळच्या दादरकरांनी.. खरं म्हणजे पार्ककरांनी सारखेपणाचं सौंदर्य त्यात जपलं होतं. अक्षरश: विलोभनीय दृश्य असे शिवाजी पार्कचं! मनात अभिमान दाटून येत असे.. आपण एका महान शहरात राहतोय याचा. माझ्या दृष्टीसमोरच या मैदानात पुढे अनेक बदल होत गेले. तिथून कारमधून जाता-येताना माझी गाडी मी काही क्षण शिवाजी पार्कच्या बाजूच्या रस्त्यावर लावत असे आणि मगच पुढे जात असे. शिवाजी पार्क ही आमच्या दादरची शान आहे.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

हळूहळू दादरची सर्व थरांतली माणसं ‘प्रीतम’मध्ये जेवायला येऊ  लागली. मी काऊंटरवर असल्यानं माझी अनेकांशी ओळख होऊ  लागली. प्रत्येकाशी काही शब्द तरी बोलण्याचा आमचा स्वभाव आहे. माणसांशिवाय आम्ही राहूच शकत नाही. नवनवीन ओळखी करून घेणं व त्या जपणं हा माझा स्वभावच बनलाय. त्यातही आमच्या व्यवसायामुळे आयुष्यातील तृप्तीचा मार्ग हा पोटातून जातो याची जाणीव झालीय. त्यावेळी तरुण वय असल्याने भेटलेल्या व्यक्तींनी जर आपलं नाव सांगितलं तर तेही लक्षात राही. त्यामुळं आमचं कुटुंब हे फक्त कोहलींचं कुटुंब न राहता ते सर्वसमावेशक बनलं. पापाजी दररोज संध्याकाळी प्रीतममध्ये येऊन बसत असल्याने त्यांचं मित्रमंडळ वेगळं. माझं वेगळं. नंतर मुलांचं वेगळं. बिजी आणि पत्नीचं मंडळ वेगळं.. असे सगळेच या सर्वसमावेशकतेत सामावून जाऊ  लागले. मला फक्त एकाच गोष्टीची खंत नेहमी जाणवते, की मी चांगलं मराठी बोलू शकत नाही. मला मराठी बोललेलं सगळं कळतं. पण ही वैभवशाली भाषा बोलता येत नाही याचं मात्र दु:ख होतं. टोनी, गोगी, डिंपी ही मुलं मात्र अस्खलित मराठीत बोलतात. इतकी, की फोनवर ते बोलत असतील तर तुम्हाला कळणारही नाही, की पलीकडचा माणूस हा मुळातला पंजाबी आहे.

अशाच आमच्या ग्राहकांपैकी एक ग्राहक होते. त्यांचा चेहरा परिचित होता. येता-जाता ‘हाय.. हॅलो’ व्हायचं, पण त्यांचं नाव माहिती नव्हतं. ते सरदारजी होते. निरंकारी होते ते. गुरुद्वाराच्या जवळ ते राहत असत. त्यांचा मुलगाही आमच्याकडे येत असे.

ते जेवण झाल्यावर माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘‘सरदारजी, तुमच्याशी बोलायचं आहे.’’

मी म्हणालो, ‘‘अरे, बोला ना! त्यात काय मोठंसं?’’

बोलता बोलता सरदारजींचं नाव कळलं- कहालसिंगजी. ते म्हणाले, ‘‘सरदारजी, मी एक बिल्डिंग बांधतोय. त्यात फ्लॅट्स आहेत. पण ते विकले जात नाहीयेत. (समुद्रकिनाऱ्याजवळ बिल्डिंग बांधतायत आणि ती विकली जात नाही? दादरमध्ये अशी स्थिती शक्य तरी आहे का, असा मला प्रश्न पडला.)  खूप प्रयत्न करतोय, पण काही जमत नाहीये फ्लॅटविक्रीचं. आता त्यात हॉटेल करता येईल का?’’

मी- ‘‘कुठं बांधताय?’’

कहालसिंग -‘‘दादरच्या समुद्रकिनाऱ्याजवळ!’’

मी- ‘‘ओय.. समुद्रकिनाऱ्याजवळ आहे ना, मग ते चालेल की!’’

कहालसिंग- ‘‘मग एक चक्कर माराल का तिकडे? मला सल्ला द्या.’’

मी ‘हो’ म्हणालो आणि दुसऱ्याच दिवशी दुपारी कहालसिंगजी त्यांची गाडी घेऊन आले. आम्ही त्या जागेवर गेलो. जागा अगदी दादर चौपाटीलगतच होती. बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं. लोकेशन तर मस्तच होतं. मी आमच्या आर्किटेक्टना बोलावलं. त्यांना विनंती केली की, ‘‘जरा बघा या खोल्यांचं, फ्लॅट्सचं हॉटेलात रूपांतर कसं करता येईल ते.’’ आर्किटेक्ट साहेबांनी फ्लॅट्सची तपासणी केली, काही आकडेमोड केली. आणि त्यांनी तिथं हॉटेल करता येऊ  शकेल असं सांगितलं. मी कहालसिंगजींना सल्ला दिला की, तुम्ही येथे हॉटेल करा. तर ते म्हणाले, तुम्हीच माझ्याबरोबर येथे हॉटेल सुरू करा.’’

‘‘माझ्याकडे पैसे फारसे नाहीत. मी पापाजींना विचारतो. त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही कोणीही काहीही करत नाही.’’ मी त्यांना सांगितलं. मी जरी तेव्हा कर्ताधर्ता होतो तरी घरातल्या वडीलधाऱ्यांचा मान ठेवला गेला पाहिजे, त्यांचा अनुभव तुम्हाला नेहमीच योग्य दिशा दाखवतो असं मला वाटतं. ज्यांना असं मार्गदर्शन करायला वडीलधारे नाहीत ते दुर्दैवी होत. पण घरात वडीलधारे असूनही त्यांना विचारत नाहीत, त्यांचा सल्ला घेत नाहीत ते मात्र कपाळकरंटे!

कहालसिंगजी म्हणाले की, ‘‘मी तुमच्या पापाजींना ओळखतो. मीच त्यांना विचारतो.’’ दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी ते पापाजींना भेटले आणि त्यांना सगळं सांगितलं. पण पापाजींनी त्यांना सरळ नकार दिला.

पापाजी त्यांना म्हणाले, ‘‘कोणताही व्यवसाय भागीदारीत करायला माझा विरोध आहे. जमणार नाही!’’ ते बिचारे गेले. सहाएक महिने मधे गेले. त्यानंतर परत एकदा ते आले. मी चौकशी केली- त्या बिल्डिंगचं काय झालं म्हणून. कहालसिंगजी म्हणाले, ‘‘अजून काही तिची विक्री झालेली नाहीये. पण तुम्ही असं का करत नाही, तुम्ही तळमजल्यावर एक रेस्टॉरंट भाडय़ानं घ्या.’’ समुद्रकिनाऱ्यावरची जागा अशी चालून येतेय! मी पापाजींना पटवलं आणि रेस्टॉरंटच्या दृष्टीने पाहायला त्या इमारतीत गेलो. जागा बघितल्यावर ते म्हणाले, ‘‘कुलवंतजी, तुम्ही ही सगळी इमारतच भाडय़ानं का घेत नाही? मला तीन लाख खर्च आलाय. तुम्ही मला या अख्ख्या इमारतीचं महिना तीस हजार भाडं द्या. पागडी वगैरे काही नको. पापाजी म्हणतात त्याप्रमाणे पार्टनरशिपही करू नका.’’

मी विचार केला. पापाजींशी बोलून ती इमारत भाडय़ानं घ्यायचं आम्ही ठरवलं. भाडेकरार झाला. नंतर सगळं पाहता पाहता माझ्या ध्यानात आलं की या जागेच्या मागच्या बाजूला स्मशानभूमी आहे. संध्याकाळी सहानंतर त्या गल्लीत कुणी फिरकत नाही. लोकांच्या मनात या जागेबद्दल अनाठायी भीती आहे हे समजलं. मी तेव्हा लायन्स क्लबमध्ये काम करत होतो. आम्ही त्या परिसरात एक उद्यान तयार केलं. तो भाग गजबजता केला. मला कायम वाटतं, भुतंबितं ही भानगड माणसांच्या मनात असते. खरं तर तसं काही नसतं. माणसांच्या मनात दडलेली ही भुतं काढून टाकली की बस्स! मी त्या स्मशानाकडे लक्ष दिलं नाही. आम्ही वाजतगाजत ‘पार्क वे’ हे आमचं नवं हॉटेल सुरू केलं. चार-पाच वर्षांनी कहालसिगजींनी मला विनंती केली की ती इमारतच तुम्ही विकत घ्या. मग पापाजींच्या परवानगीनं ती इमारत आम्ही विकत घेतली.

‘प्रीतम’ दादरच्या पूर्व भागात आहे, तर ‘पार्क वे’ पश्चिमेस. ‘पार्क वे’मध्ये आम्ही रेस्टॉरंट सुरू केलं. या रेस्टॉरंटची लोकप्रियता बघता बघता वाढू लागली. ‘पार्क वे’मधल्या एका कोपऱ्यातल्या टेबलावर एक निग्रही चेहऱ्याचे गृहस्थ नेहमी येऊन बसत. ते पांढऱ्या कपडय़ांतच असत. उलटे फिरवलेले काळे केस. मध्यम बांधा. बहुतेक वेळा त्यांनी पांढरा झब्बा घातलेला असे. ते अतिशय शांतपणे येऊन बसत. चहा घेत. बरोबरच्या लोकांशी बोलत आणि जात. मला आमच्या कर्मचाऱ्यांनी त्या सद्गृहस्थांविषयी सांगितलं व त्यांचं नावही सांगितलं. त्यांचं नाव होतं- श्रीकांत ठाकरे! ते जवळच राहत होते. मी त्यांच्याकडे गेलो. स्वत:हून त्यांचा परिचय करून घेतला. आणि एका प्रदीर्घ काळच्या ऋणानुबंधाला सुरुवात झाली. त्यांच्याशी गप्पा मारताना कळलं, की ते मराठीतल्या महान समाजसुधारकांचे- प्रबोधनकारांचे चिरंजीव आहेत आणि ‘मार्मिक’शी जवळून संबंधित आहेत. ‘मार्मिक’ मला माहीत होतं. इंग्रजीत ‘शंकर्स वीकली’ नावाचं व्यंगचित्राला वाहून घेतलेलं एक नियतकालिक होतं. ‘मार्मिक’नं मराठीत ती परंपरा सुरू केली होती. मला मराठी येत नसलं तरी चित्रांच्या भाषेला शब्दांची गरज नसतेच ना!

श्रीकांतजी अतिशय शांत, मितभाषी होते. त्यांच्या मनात काय चाललंय याचा पत्ता लागत नसे. पण त्यांचा स्वभाव अतिशय सौहार्दपूर्ण होता. त्यांना चहा आवडत असे. त्यांना होमिओपथीची खूप आवड होती, हे आज फार कमी लोकांना माहिती आहे. ‘पार्क वे’मध्ये बसून ते त्यांच्या ‘मार्मिक’संबंधात जी माणसं येत त्यांच्याशी बोलत असत. जवळपास दररोज संध्याकाळी ते येत असत. त्यांना भेटलं की बरं वाटे. एक अतिशय स्पष्ट बोलणारे आणि मनाने निर्मळ असे सभ्य गृहस्थ होते ते.

त्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांचे मोठे बंधू तिथं आले. श्रीकांतजींनी माझी आणि त्यांची ओळख करून दिली. ते होते महान व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे. खणखणीत आवाजाचे. दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे. फारसे उंच नसतानाही खूप उंच भासणारे. अत्यंत मनस्वी. स्वत:बद्दलचा आत्मविश्वास भरभरून बाळगणारे बाळासाहेब भेटल्यावर खरं म्हणाल तर मी थरारूनच गेलो होतो. १९६१ चा सुमार असेल तो. ‘मार्मिक’ सुरू झालं होतं आणि त्यातील बाळासाहेब आणि श्रीकांतजींच्या व्यंगचित्रांनी मराठी माणसांनाच नव्हे, तर सर्वानाच प्रभावित केलं होतं. दोघेही बंधू सच्चे कलावंत होते. कलेविषयीच्या त्यांच्या ओढीबरोबरच त्यांना असलेली राजकीय, सामाजिक जाण अद्भुत होती. त्यामागे पुण्याई होती प्रबोधनकारांच्या आशीर्वादाची! मी पंजाबी असूनही मला प्रबोधनकार ठाकरे माहिती होते, त्याचे कारण म्हणजे त्यांचा सामाजिक दृष्टिकोन. आणि व्यावसायिकाला या सगळ्याची माहिती  ठेवावी लागतेच. ती ठेवताना बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीही मी जाणून होतो. मात्र, त्यांना भेटल्यावर मी अक्षरश: त्यांच्या प्रेमात पडलो. साहेब अतिशय दिलदार माणूस! राजस वृत्तीचे साहेब कुटुंबवत्सलही होते. ते माणसाला एका क्षणात आपलंसं करत असत. त्यांची आणि आमची क्षणात मैत्री झाली. अगदी खरं सांगतो, बाळासाहेबांच्या घरात एखाद्या जवळच्या व्यक्तीसारखा मला प्रवेश असे. हळूहळू आमच्या परिवारांतही मैत्री झाली. भाभीजींचा आणि माझ्या पत्नीचा उत्तम स्नेह जुळला. सणावाराच्या दिवशी- विशेषत: दिवाळीला, नववर्षांच्या सुरुवातीला, त्यांच्या वाढदिवसाला आम्ही सहकुटुंब त्यांच्याकडे जात असू.

पूर्वी एकदा असाच मी साहेबांकडे गेलो असताना त्यांचे पिताजी प्रबोधनकार ठाकरे यांना भेटलो. प्रबोधनकारांचं वय झालेलं होतं. पण वाणी खणखणीत होती आणि विचार स्पष्ट होते. त्यांनी सहजपणे बोलताना मला सांगितलं, ‘‘कुलवंत, आमचा बाळ बघ किती श्रीमंत आहे. बाहेर दरवाजात बघ किती चपला आहेत.’’ मला क्षणभर कळलंच नाही. ते पुढे म्हणाले, ‘‘कुलवंत, माणसाकडे किती पैसा आहे यावर त्याची श्रीमंती अवलंबून नसते, तर त्याने किती माणसं जोडली आहेत यावर त्याची श्रीमंती अवलंबून असते. हा चपलांचा ढिगारा बाळला भेटायला किती माणसं आली आहेत, ते दाखवतो. त्याची ही श्रीमंती फार मोठी आहे.’’ हे बोलताना प्रबोधनकारांचा वृद्ध चेहरा अभिमानानं फुलला होता. त्यांचे डोळे लकाकत होते. खरंच होतं ते. बाळासाहेबांची मनाची आणि माणसांची श्रीमंती अफाट होती. साहेबांचं बोलणं रोखठोक होतं. स्पष्ट होतं. ‘आत एक, बाहेर एक’ असा राजकारणी साचा नव्हता त्यांचा. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्यात ते हयगय करत नसत. ज्याला त्यांनी एकदा आपलं म्हटलं त्याला कधीच दूर लोटलं नाही. त्यासाठी ते कोणतीही किंमत मोजायला तयार असत. असाच स्नेह त्यांनी मला दिला. त्यांचा-माझा स्नेह अकृत्रिम होता. साहेबांना भेटायला कधीही गेलो तरी मला थेट प्रवेश असे. मी कधीही बाहेर थांबलो नाही. साहेबांनीच तशा सूचना दिल्या असाव्यात कदाचित. साहेब माझ्याकडून आमच्या शीख समाजाबद्दल जाणून घेत. त्यांना त्याविषयी फारशी माहिती नव्हती. पण जेव्हा त्यांना मी शीख समाजाच्या निर्मितीविषयी, परकीय आक्रमकांबरोबर त्याने केलेल्या संघर्षांविषयी सांगितलं, मोघल आणि ब्रिटिश राज्यकर्ते यांच्याशी शिखांनी अखेपर्यंत केलेल्या लढय़ांविषयी त्यांच्याशी बोललो तेव्हा ते पटकन् म्हणाले, ‘‘अरे, महाराष्ट्र आणि पंजाबची नाळ तर एकच आहे!’’

आमच्या स्नेहाची इमारत या नाळेच्या सांध्यामुळे जास्तच भक्कम झाली! त्यांच्या आणखी काही हृदय आठवणी पुढील भागात..

– कुलवंतसिंग कोहली

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर