04 March 2021

News Flash

स्वप्नपक्षी.. मधुबाला!

आणि जेव्हा मी ‘नीलकमल’च्या शूटिंगच्या वेळी मधुबालाला पाहिलं.. आणि पाहतच राहिलो

मधुबाला

कुलवंतसिंग कोहली

मी सहसा अंत्ययात्रांना जात नाही, पण त्या अंत्ययात्रेला गेलो होतो. कारण ती अंत्ययात्रा केवळ एका महान व्यक्तीची, एका अतुलनीय सौंदर्यवतीची, एका सर्वोत्तम अभिनेत्रीची किंवा एका सुपरस्टारची नव्हती; तर ती अंत्ययात्रा होती- भारतीय चित्रपट रसिकांनी पाहिलेल्या एका गूढरम्य स्वप्नप्रवासाची! त्या दिवशी दफनभूमीत त्या अभिनेत्रीचं शव दफन होणार होतं; पण त्या दफनभूमीतून सृजन होणार होतं लक्ष लक्ष आठवणींचं आणि कोटी कोटी दंतकथांचं!

ती अंत्ययात्रा होती मधूची.. तुमच्या-आमच्या मधुबालाची. अंत्ययात्रेला हजारो चित्रपट रसिक होते, स्टार्स होते, निर्माते, दिग्दर्शक होते. नव्हता फक्त दिलीपकुमार. अर्थात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मधुबालाच्या वाढदिवसालाही तो नव्हता आणि अंत्ययात्रेला हजर असलेले निर्माते, दिग्दर्शक, स्टार्सही नव्हते. अगदी थोडय़ा लोकांनी मधुबालाला तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या होत्या. मी त्या थोडय़ांतला एक होतो. मधुबाला तेव्हा अतिशय आजारी होती. एकाकी होती. मी तिला शुभेच्छा द्यायला गेलो त्या वेळेपर्यंत किशोरकुमार तिला वाढदिवसाचं शुभचिंतन करायला आला नव्हता. ती त्याची असोशीनं वाट पाहत होती. मी दहा-पंधरा मिनिटं तिथं थांबलो. मधुबालाचं तडफडणं मला पाहवत नव्हतं. पुढच्या वर्षी वाढदिवसाला भेटण्याच्या शुभेच्छा देऊन मी तिथून उठलो. ती कसनुसं हसली. मला म्हणाली, ‘‘कुलवंतजी, कहां अब मिलना नसीब होगा? दस-पंधरा दिन निकालूंगी तो भी बहोत है।’’ मी गदगदलेल्या आवाजात म्हणालो, ‘‘नाही मधूजी, दस-पंधरा दिन की क्या बात कर रही हो? और दस दशक आप जी लोगी!’’ मी निघालोच तिथून.

तशी मधुबालाच्या आधी माझी व तिच्या पिताजींची- अताउल्लाखान यांची मत्री झाली होती. छोटय़ा बेबी मुमताजला घेऊन ते या स्टुडिओतून त्या स्टुडिओत जात. मुमताज ही साधारणपणे माझ्याच वयाची होती. ती ‘बसंत’ चित्रपटातून पहिल्यांदा पडद्यावर चमकली. तिचं नाव चित्रपटाच्या श्रेयनामावलीत नव्हतं, पण तरी तिनं लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. नंतर वर्षभर ती कुठल्याच चित्रपटात दिसली नाही. अर्थात ती विस्मरणात गेली. पण एक दिवस उत्साहानं राज कपूर आमच्या प्रीतममध्ये आले. पापाजींना म्हणाले, ‘‘मी आता हिरो होणार. केदार शर्मा मला घेऊन चित्रपट करताहेत.’’ त्यांच्या निळ्या डोळ्यांत वेगळीच चमक दिसत होती. मी मधेच त्यांना विचारलं, ‘‘वीरजी, हिरॉइन कोण आहे?’’

‘‘मधू.. मधुबाला!’’

‘‘ती ‘बसंत’वाली मुलगी?’’

‘‘हां, बिलकूल. वही लडकी. लेकीन वह अब लडकी नहीं रहीं कुलवंत. बस्स- देखते रह जाओगे।’’

आणि जेव्हा मी ‘नीलकमल’च्या शूटिंगच्या वेळी मधुबालाला पाहिलं.. आणि पाहतच राहिलो. मी मागे म्हटलं होतं की, माला सिन्हा ही पडद्यावरची सर्वात सुंदर नायिका आहे. पण पडद्यावर सुंदर दिसणारी आणि प्रत्यक्षात त्याहूनही अधिक सुंदर असलेली नायिका फक्त एकच- मधुबाला. पडद्यावर कित्येक वेळेला मेकअपच काम करून जातो. पण मधुबालाला मेकअपची गरजच नव्हती. किंबहुना, मेकअपला तिच्यामुळे सौंदर्य प्राप्त होतं असं मला वाटायचं.

‘नीलकमल’ हा केदार शर्माचा चित्रपट. त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर आमच्याकडून जेवण जायचं. कित्येकदा मीच जेवण घेऊन जात असे. केदार शर्मा, राजजी यांच्याबरोबर बऱ्याचदा अशोककुमार असत. अताउल्लाखान आणि चित्रपटातली अन्य मंडळी असत. पण मधुबाला मात्र त्यात जेवायला येत नसे. तिच्याजवळ तिचा डबा असे. तिच्याशी थेट बोलण्याची कुणालाच मुभा नव्हती. अताउल्लाखान मधुबालाला कुणाशीही बोलू देत नसत. आणि तीही आपल्या वडलांची खूप इज्जत करत असे. तीही तिच्या मेकअप रूमच्या बाहेर फारशी येत नसे. इथेच माझी व अताउल्लाखान यांची चांगली जानपहेचान झाली. वयाचा अडसर बाजूला गळून पडला आणि आम्ही मित्र झालो.

अताउल्लाखान उंचेपुरे, देखणे होते. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची मार्दवतायुक्त बेदरकारी होती. ती त्या काळात त्यांना शोभून दिसे. त्यांना आपल्या मुलीचा प्रचंड अभिमान वाटायचा. तिचं अलौकिक सौंदर्य त्यांना सतत अस्वस्थ ठेवायचं. तिला कोणी फसवील, तिचा गैरफायदा घेतील या भीतीनं त्यांनी तिला आपल्या नजरेच्या व धाकाच्या कुंपणातच ठेवलं. नंतरच्या काळात ते कुंपण तिच्या प्रगतीस मारकही ठरलं. परंतु प्रारंभीच्या काळात ते मधुबालाला हितकारक ठरलं. मधुबालाला आपल्या स्वत:विषयी प्रचंड आत्मविश्वास होता. तिचा एकूणच वावर आत्मविश्वासपूर्ण होता. मी एकदा अताउल्लाखाननाच विचारलं की, ‘‘ ‘बसंत’नंतर काय झालं? कुठं गायब झालात तुम्ही?’’ त्यांनी सांगितलं, ‘‘अरे, उसकी भी एक कहानी है। ‘बसंत’नंतर कौतुक झालं, पण काम मिळेना. शेवटी आमच्या दिल्लीतल्या घरी परत गेलो. अवस्था वाईट झालेली. बेबीला यात फार काही मोठी गोष्ट वाटली नाही. चित्रपटाच्या मायावी दुनियेतून परत झोपडीत गेलो. घरी गेल्यावर थोडय़ा वेळानं मी बेबीला शोधू लागलो तर ती दिसेना. मी घाबरलोच. पण काही वेळानं बेबी परत आली. मी तिला ओरडू लागलो, तर तिकडे फारसं लक्ष न देता तिनं झोपडीवर एक पाटी लावली. त्या पाटीवर लिहिलं होतं- ‘ये किसी तवायफ़ का घर नहीं है। यहाँ पर फिल्म अ‍ॅक्ट्रेस बेबी मुमताज रहती है।’ ती झोपडपट्टी शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांची होती. ही पाटी लावल्यावर मी घाबरलोच. मी तिला म्हणालो, ‘बेबी, हे का लावतेयस? आपली पंचाईत होईल.’ तर ती म्हणाली, ‘नाही अब्बू. याने काही अडचण निर्माण होणार नाही. उलट, मुंबईतून कोणी आपल्याला शोधत आलं तर त्याचा फायदाच होईल.’ आणि तसंच झालं. बॉम्बे टॉकीजमधून अमिया चक्रवर्ती आम्हाला शोधत शोधत आले तेव्हा त्या पाटीनंच त्यांना आमच्याकडे आणलं.’’

अताउल्लाखान आमच्याकडे जेवायला यायचे. त्यांना बाहेरचं जेवण आवडायचं. चमचमीत आणि मसालेदार पदार्थ त्यांना आवडत. त्यात ‘प्रीतम’शी त्यांचं खाण्याचं नातं जुळलं आणि त्यामुळे माझ्याशीही जुळलं. ते दिलखुलास गप्पा मारत बसायचे. त्यांना थोडीशी बढाया मारायचीही सवय होती. त्यांनी त्यांच्या दिल्लीच्या वास्तव्यातील एक गंमत मला सांगितली. बेबीचा आवाज चांगला होता. जवळचे पैसे संपत आलेले. तेव्हा ते तिला घेऊन गेले दिल्ली रेडिओ स्टेशनवर. त्याकाळी रेडिओ स्टेशनवरच्या लोकांना थेट भेटता यायचं. अताउल्लाखानांनी स्टेशन डायरेक्टरला सांगितलं- ‘ही बेबी मुमताज आहे. हिच्याकडून पन्नालाल घोष यांच्यासारख्या महान संगीतकारांनी गाणं गाऊन घेतलंय.’ डायरेक्टरसाहेबांनी ‘बसंत’ पाहिलेला. त्यांना बेबी मुमताजला पाहून गंमत वाटली. तिचं गाणं त्यांनी ऐकलं व रेडिओ स्टेशनवर काम करणाऱ्या मंटो, खुर्शिद अन्वर यांना बोलावून घेतलं. त्यांना तिचा आवाज आवडला. खुर्शिद अन्वर यांनी लगेचच बेबी मुमताजच्या आवाजात गाणं रेकॉर्डही करून टाकलं. बेबी रेडिओ सिंगर झाली.

दिल्लीतील झोपडपट्टीतून अमिया चक्रवर्ती तिला देविकाराणींकडे बॉम्बे टॉकीजमध्ये घेऊन गेले. त्यावेळी बॉम्बे टॉकीज एका नव्या चित्रपटाची आखणी करत होतं. त्यात ते युसूफखान नावाच्या नव्या नटाला संधी देत होते. तो नटही अताउल्लाखान ज्या भागातले आहेत तिथलाच.. पेशावरचाच होता. ‘ज्वारभाटा’ हे त्या चित्रपटाचं नाव होतं. या चित्रपटात बेबी मुमताजला एक बालकलाकार म्हणून काम मिळालं होतं. अताउल्लाखान सांगत होते, ‘‘देविकाराणीनं एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगला बॉम्बे टॉकीजचा महत्त्वाचा घटक उपस्थित नव्हता.. अशोककुमार. देविकाराणींनी सांगितलं, ‘युसूफखान हे नाव वाईट नाही, पण पडद्यावर ते फार विचित्र दिसेल. जहांगीर, वासुदेव, दिलीपकुमार यापैकी एक नाव तू निवड.’ युसूफखाननं ‘दिलीपकुमार’ हे नाव निवडलं. नंतर त्यांनी बेबीकडे आपला मोहरा वळवला व तिला म्हणाल्या, ‘बेबी, तुझं नाव खूप परिचयाचं आहे. आपण तुझंही नाव बदलू या. काहीसं हटके असायला हवं नाव. तू आजच इतकी सुंदर दिसतेस.. मोठी झाल्यावर गजब करशील. त्यामुळे तुझ्या नावाचा आत्ताच नीट विचार करायला हवा. मधुराणी किंवा मधुबाला यातलं एक नाव निवड.’ बेबी काय बोलणार? मीच निवडलं नाव- मधुबाला. पण ‘ज्वारभाटा’मध्ये बेबीला काम मिळालं नाही. तिचा रोलच कापला गेला. वर्षभर काम नाही. महिन्याच्या महिन्याला पैसे मिळत. पण त्याला काही अर्थ नव्हता. मी चिडलो. पण माझ्या हातात काहीच नव्हतं. माझा राग त्यावेळी लुळापांगळा होता. मी मनात खूणगाठ बांधली- की आज मी गरीब आहे, लाचार आहे म्हणून हे माझ्या गोड मुलीवर अन्याय करताहेत. पण भविष्यात जेव्हा आयुष्याची पानं माझ्या हातात येतील, तेव्हा या लुळ्यापांगळ्या रागात मी काटेरी भाले रोवीन. आज मला हे हवं तसं नाचवताहेत. मी त्यांना तेव्हा मला हवं तसं नाचवीन. आपण विस्मरणात जाऊ या भीतीनं मी बॉम्बे टॉकीजला ‘आम्हाला करारातून मुक्त करा,’ असा आग्रह धरला. त्यांनी बेबीला करारातून मोकळं करून घेतलं आणि बेबी मुमताजची गाडी हळूहळू रुळावरून धावू लागली. (मला राहून राहून वाटतं, ‘ज्वारभाटा’च्या वेळेला बेबी मुमताजचा- म्हणजे मधुबालाचा रोल कापला गेला, हा नियतीचाच संकेत असणार. ती दिलीपसाबच्या पहिल्या चित्रपटातून वगळली गेली आणि नंतर त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातूनही! नियतीपुढे कुणाचा इलाज नसतो.)

..केदार शर्मा यांनी ‘नीलकमल’साठी राज कपूर आणि मधुबाला ही नवी जोडी निवडली. अताउल्लाखान यांचा आग्रह होता, की तिचं नाव मुमताजच ठेवावं. देविकाराणीनं अपमानित केलेलं नाव तिला द्यायला नको असं त्यांना वाटत होतं. पण केदार शर्मा यांनी निर्णय दिला, की ‘मधुबाला’ हेच नाव कायम ठेवावं. केदार शर्मानी भारतीय चित्रपटाला निळ्या डोळ्यांचा राजपुत्र व सौंदर्याची खाण असलेली राजकन्या दिली. ‘नीलकमल’ दाणकन् आपटला. पण राजजी आणि मधुबाला मात्र रसिकांच्या मनात पक्के घर करून राहिले. त्यानंतर या दोघांनी एकत्र फक्त दोन चित्रपट केले. मी मधुबालाच्या निर्वाणानंतर राजजींना एकदा विचारलं की, ‘‘असं का घडलं? तुम्ही दोघांनी अजून चित्रपट करायला हवे होते.’’ त्यावर राजजी पटकन् म्हणाले, ‘‘तसा नियतीचा संकेत नव्हता. बाकी काही नाही.’’

आपल्या अलांच्छित सौंदर्यानं व अभिनयाच्या चतुरस्रतेनं मधुबालानं नंतर जग पादाक्रांत केलं. मधुबाला आपल्या पित्याच्या धाकानं कायम चूप राहायची. तिच्या वतीनं सर्व निर्णय अताउल्लाखानच घ्यायचे. ते पशाचे लोभी होते असं सगळे म्हणतात. मी त्यांना स्पष्टच विचारलं की, ‘‘तुम्ही असं का करता?’’ तर ते म्हणाले, ‘‘कुलवंत, मी अशी गरिबी पाहिली आहे की परत मागे जाणं नको. त्यात आमच्याकडे कमावणारी मधू एकटीच आहे. आधी भविष्याची सोय, मग बाकी सर्व.’’ हा त्यांचा दृष्टिकोण चुकीचा होता. मुलीच्या जिवावर ते जगत होते.. तिचा विचार न करता! प्रदीपकुमार एकदा याविषयी मला म्हणाला, ‘‘यार, मधुबाला अ‍ॅक्ट्रेस चांगली आहे. पण ती कोणतेही चित्रपट करते. चांगला चित्रपट, वाईट चित्रपट असा विवेक ती करत नाही. असं केलं तर ती मागे पडेल.’’ पण सुदैवानं तसं झालं नाही. कितीही वाईट चित्रपट असला तरी मधुबालाला कोणी वाईट म्हटलं नाही. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा ऑराच तसा होता. ती रूपेरी पडद्यावर आली रे आली की पडदा झगमगून उठे.

मधुबालाशी ती स्टार झाल्यानंतर माझी चांगली ओळख झाली. तिच्यातलं हळवं मन मला कळत गेलं. ती कोणाचंही दु:ख बघून अंतर्बा हलून जात असे. त्या व्यक्तीबद्दल तिला सहानुभूती वाटे. ती त्या व्यक्तीच्या प्रेमातही पडे. ‘नीलकमल’च्या वेळी केदार शर्मा यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. केदार शर्मा पत्नीवर निरतिशय प्रेम करत असत. ते उन्मळून गेले होते. त्यांचं ते दु:ख पाहून मधुबालाला अतिशय वाईट वाटलं. तिच्या मनात त्या तिशीतल्या गृहस्थाबद्दल प्रेम निर्माण झालं. केदार शर्मानी तिला हळुवारपणे सांगितलं, ‘‘मधू, तू अजून लहान आहेस. तुझं अजून खूप आयुष्य जायचं आहे.’’ तिच्याबरोबर काम करणारे अभिनेतेही तिच्या प्रेमात असायचे. प्रेमनाथ तर तिच्यासाठी पागल झाला होता. तिनं त्याला गुलाबाचा गुलदस्ता भेट दिला होता. त्यानं मोठय़ा खुशीत ही गोष्ट दादामुनींना- म्हणजे अशोककुमारना सांगितली. तर त्यांनी प्रेमनाथची हवाच काढून टाकली. ते म्हणाले, ‘‘प्रेम, हे फार गंभीरपणे घेऊ नकोस. तिनं ‘महल’च्या वेळी मलाही गुलाबांचा गुलदस्ता दिला होता. ती भाबडी आहे. तिला तात्पुरती सहानुभूती वाटते. प्रेम निर्माण होतं. पण एकदा का अताउल्लाखान दिसला की हे सगळं गायब होतं.’’

मला एक नक्की माहीत होतं- की हे दोघं कलाकार एकमेकांच्या खूप प्रेमात आहेत. नंतर त्या दोघांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुलीही ‘नया दौर’ चित्रपटासंदर्भात भर कोर्टात दिली होती. मधुबालाबरोबरचा हा तिचा प्रियकर म्हणजे दिलीपकुमार! तोच नायक- ज्याच्या पहिल्या चित्रपटात ती बालकलाकार असणार होती! दोघं परस्परांच्या अलोट प्रेमात होते. त्यांना शादीही करायची होती. पण अताउल्लाखान त्यांच्यात आडवे आले. तसं त्यांनी लग्न करायला कोणतीही हरकत नव्हती. दोघांचा धर्म एक, मूळ प्रांत (पेशावर) एक, व्यवसाय एक, आवडीनिवडी एक. पण अताउल्लाखान यांनी दिलीपकुमारना एक अट घातली. ती म्हणजे- तुम्ही दोघंही हिंदी चित्रपटातले महानतम कलाकार आहात. लग्नानंतर दिलीपकुमारजींनी केवळ मधुबालाबरोबरच चित्रपट करावेत. ही अट दिलीपकुमारना कशी मान्य होणार? काही काळ त्यांनी मधुबालाच्या होकाराची वाट पाहिली. पण वडलांच्या आज्ञेतल्या मधुबालाची हिंमत होईना. दिलीपकुमार एके दिवशी एका काजीला तयार करून ओमप्रकाशबरोबर तिच्याकडे गेले आणि तिला आपण लगेच लग्न करू या असं सांगितलं. पितृआज्ञेतील मधुबाला त्यावेळी गप्प बसली. दिलीपकुमार तिथून निघून गेले. त्यावेळी बी. आर. चोप्रांनी ‘नया दौर’ची आखणी केली होती. दिलीपकुमार आणि मधुबाला अशी स्टारकास्ट होती. पण शूटिंगसाठी मध्य प्रदेशात जाण्याचा विषय निघाला तेव्हा अताउल्लाखानने त्याला विरोध केला. मधुबालाला असलेल्या विकाराच्या तीव्रतेमुळे ती मुंबईपासून दूर जाऊ शकत नव्हती. आणि ही तीव्रता अताउल्लाखान कधीही स्पष्टपणे सांगत नसत. शेवटी झालेलं शूटिंग रद्द करून चोप्रांनी वैजयंतीमालाला घेऊन ‘नया दौर’ पूर्ण केला. नंतर त्यांनी मधुबालावर खटला दाखल केला. त्यात साक्ष देताना दिलीपकुमारना तिच्यावरील आपल्या प्रेमाची जाहीर कबुली द्यावी लागली. त्यावेळी आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून आज्ञाधारक मधुबालानं कोर्टात साक्षीत सांगितलं की, ‘‘युसूफने मला घरी येऊन ताबडतोब त्याच्याबरोबर बाहेर यायला सांगितलं. पण वडील घरात नसल्यानं मी नकार दिला. त्यानं अब्बाजानना शिव्या घातल्या. तो त्यावेळी दारू प्यायला होता. त्यानं माझा हात धरून मला बाहेर काढायचा प्रयत्न केला. पण मी नकार दिला तेव्हा त्यानं माझ्या थोबाडीत मारली.’’

ही गोष्ट अजिबात खरी नव्हती, हे जगजाहीर आहे. कारण दिलीपकुमार दारुडे नव्हते व त्यांचा तोल कधीही सुटत नसे. मधुबालानं असं सांगितलं, कारण तिचं तिच्या अब्बूवर प्रेम होतं. त्या खोटेपणाच्या आगीत ती कायम जळत राहिली. पण ती कृतज्ञतेच्या भावनेचा सन्मान करणारी होती. वडिलांनी आजवर जे केलं, त्याविषयी ती कृतज्ञ होती. पण या कृतज्ञतेच्या सन्मानापोटी मधुबालानं आपल्या पित्याचं एका प्रसंगात मुळीच ऐकलं नाही.

कोणता तो प्रसंग?

त्याविषयी पुढील लेखात..

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 1:01 am

Web Title: kulwant singh kohli articles on madhubala
Next Stories
1 ये है मुंबई  मेरी जान : निखळ  मैत्र
2 चंदन-मंजूची प्रेमकहाणी
3 खुदा का पाक बंदा
Just Now!
X