18 October 2019

News Flash

विडी संपली ; जळते जिणे.. 

आईला आधार देण्यासाठी, खेळण्या-बागडण्याच्या कोवळ्या वयातील मुलगी विडय़ा तयार करण्याचे काम शिकते.

(संग्रहित छायाचित्र)

एजाजहुसेन मुजावर  aejajhusain.mujawar@expressindia.com

घरबसल्या होणारे विडी-काम कमी झाल्याची सर्वाधिक झळ सोलापूर परिसरातील तरुण मुलींना बसते आहे..

यंत्रमागांचे सोलापूर हे राज्यातील एके काळचे चौथ्या क्रमांकाचे औद्योगिक शहर. वस्त्रोद्योगाच्या भरभराटीच्या काळात इतर भागांतून स्थलांतरित होऊन पोट भरण्यासाठी सोलापुरात आलेल्या आणि येथेच स्थिरावलेल्या प्रमुख समाजघटकांपैकी एक म्हणजे पद्मशाली तेलुगु समाज. तेलंगणातून आलेला हा समाज पारंपरिक जीवनपद्धतीत आपले अस्तित्व ठेवून आहे. आज सुमारे तीन-साडेतीन लाख लोकसंख्येच्या घरात असलेल्या विणकर पद्मशाली तेलुगु समाजातील तरुणाई यंत्रमागाप्रमाणेच विडी उद्योगाशी जोडली गेली आहे. पुरुष मंडळी यंत्रमाग उद्योगात, तर महिला परंपरेने विडी उद्योगात मजुरी करतात. कष्टाच्या कामामुळे असेल कदाचित, यंत्रमाग कामगारांमध्ये प्रचंड व्यसनाधीनता दिसून येते. त्यामुळे घर, संसार सावरण्याची जबाबदारी शेवटी महिलांवर येऊन पडते. विडय़ा तयार करून मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीचा आधार यासाठी उपयोगी पडतो. दररोज घरी बसून एक हजार विडय़ा तयार करण्याची सोय असल्याने महिलांना दिवसभर विडी कारखान्यात जावे लागत नाही. विडी कारखान्यात विडय़ा पोहोचवण्यासाठी जायचे, कच्चा माल घेऊन घरी यायचे, एवढा अपवाद वगळता महिला विडी कामगार सहसा घराबाहेर पडत नाहीत. एखाद्या पाहुण्याच्या घरी कार्यक्रम असेल किंवा धार्मिक कीर्तनासाठी जायचे असेल तर किंवा अगदी मजुरीवाढ अथवा अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा विडी कारखाना वा कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चाला जायचे तरीही.. या कष्टकरी महिला सोबत विडय़ा तयार करण्याचे साहित्य घेऊनच जातात. दिवसभर हजार विडय़ा तयार केल्यानंतर दीडशे रुपयांपर्यंत मजुरी पदरात पडते. यंत्रमाग कामगार असलेला नवरा दारूच्या आहारी बुडालेला असल्याने तो नियमित कामावर न जाता घरीच रिकामा बसून झोपून राहतो. दारूसाठी पैशांची चणचण होऊ लागली की, तो बायकोच्या मजुरीच्या पैशावर हात मारतो. दारूबरोबर मटणही लागते. त्यासाठी मारझोड करणे हा नवऱ्याचा जणू शिरस्ताच ठरतो. बायको ही शेवटी नवऱ्याचीच ताबेदार राहते. पुढे दारूच्या सततच्या व्यसनामुळे आजारी पडलेल्या नवऱ्यासाठी दवाखान्याचा खर्च तिच्यावरच येऊन पडतो. आजारपणामुळे दारू नाही, पण यंत्रमागावरील काम कायमचेच सुटते. मानसिक आणि शारीरिक यातना सहन करीत महिला विडय़ा तयार करण्याचे काम करीत संसाराची जबाबदारी पेलत असतात. या कामासाठी हातभार म्हणून घरातील मुलींना जुंपले जाते. आई व मुलगी दोघीही विडय़ा वळण्याचे काम करतात.

सोलापूरच्या पूर्व भागातील गल्लीबोळांत घरोघरी हेच चित्र दिसते. आईला आधार देण्यासाठी, खेळण्या-बागडण्याच्या कोवळ्या वयातील मुलगी विडय़ा तयार करण्याचे काम शिकते. दारुडय़ा बापाकडून आईचा होणारा छळ आणि संपूर्ण घराची होणारी परवड बघवत नाही. म्हणून लहानगी मुलगी ही समजूतदार होते आणि स्वत:ला विडीकामात झोकून देते; परंतु तेथूनच तिचेही भवितव्य अशाच अंधाराच्या दिशेने नेणारे असते, हे तिच्या बालसुलभ मनाला कळणार कसे? शिक्षण अर्धवट सोडून मुलगी जशी आईच्या पाऊलवाटेवर विडय़ा वळण्याच्या कामात स्वत:ला गुंतवून घेते, तसा मुलगा बापाच्याच मार्गाने यंत्रमाग कारखान्यात कामाला जातो. पुढे तोदेखील ‘बाप’च होतो, तर मुलगी परंपरेने ‘आई’!

त्यातच, मुक्त अर्थव्यवस्थेची मोठी झळ गेल्या २५-३० वर्षांत यंत्रमाग आणि विडी उद्योगाला बसली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावाने धूम्रपानविरोधी कायद्यांची अंमलबजावणी करताना विडी उद्योगावर गंडांतर आले. सोलापुरातील सुमारे ७० हजार महिला विडी कामगारांचा रोजगारच धोक्यात आला. विडी उद्योगाचे उत्पादन घटत चालले तशी महिला विडी कामगारांची संख्याही कमी होऊ लागली. कायम सेवेतील विडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आहे. कायद्यानुसार किमान वेतन पदरात पडत नसले तरी भविष्यनिर्वाह निधी योजना, कामगार विमा आरोग्य योजना आदी सवलती मिळतात; परंतु अलीकडे विडीकामाचे कंत्राटीकरण होऊ लागल्याने त्याचा परिणाम विडी कामगारांच्या सामाजिक सुरक्षेवर होत आहे.

पूर्वी विडी उद्योग चांगल्यापैकी चाले. कायम विडी महिला कामगारांपैकी तरुण मुलींना विवाहासाठी जास्त पसंती मिळत असे. अलीकडे कंत्राटी पद्धतीमुळे विडी उद्योगात कामगारांना भवितव्य उरले नाही. त्यामुळे गारमेंट उद्योगासारखा नवा पर्याय येतो आहे; परंतु विडय़ांचे काम घरीच बसून करण्याची सोय आहे. तशी सोय नसल्यामुळे महिलांना घरातील मंडळी गारमेंट उद्योगात पाठवत नाहीत. त्यातून हाताला काम मिळण्याची शाश्वती हळूहळू कमी होऊ लागल्यामुळे अल्पशिक्षित तरुण मुलींच्या विवाहाच्या समस्या तयार होत आहेत. त्यातूनच फसवणुकीचेही प्रकार घडले आहेत. तरुण मुलींचे विवाह जुळविण्याच्या नावाखाली एजंटांची टोळी सक्रिय झाल्याचे प्रकार मध्यंतरी पाहावयास मिळाले होते. गुजरातच्या सीमेवर लहान-मोठय़ा शहरांत राहणाऱ्या तरुणांना विवाहासाठी मुलींची स्थळे मिळवून देण्याचा धंदाच या एजंटांनी चालविला. अनेक पालक मंडळी त्यांच्या जाळ्यात सापडली. काही रक्कम देऊन मुलींचे विवाह गुजरातमधील तरुणांशी लावताना या तरुणांची पाश्र्वभूमीदेखील पाहिली गेली नाही. काही मुलींचे विवाह तर अक्षरश: मनोरुग्ण, शारीरिक अपंग मुलांशी झाल्याचे प्रकार घडले. बळी पडलेल्या अनेक मुली परतही आल्या नाहीत. आई-वडील हयात नसलेल्या पोरक्या मुलींना तर अक्षरश: विकण्याचे पाप त्यांच्या नातेवाईकांकडून घडल्याचे सांगितले जाते. अशा प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल का होत नाही, कारण बहुतेकदा दोन्हीकडून साटेलोटे झालेले असते. हे प्रकार अलीकडे काही प्रमाणात थांबले आहेत.

विडी कामगारांचे भवितव्य अधांतरी असल्यामुळे घरातील तरुण मुलींच्या विवाहाच्या जबाबदारीचे ओझे वाढले असताना हे ओझे हलके करण्यासाठी पालक तडजोडी करण्यावर भर देतात. सासरी गेल्यानंतर मुलींचे पुन्हा हाल होतात. विडय़ांचे काम कमी झाल्यामुळे एकीकडे हातात मजुरी पडत नाही, तर दुसरीकडे नवऱ्याच्या दारू-मटणाच्या इच्छा पुरवाव्या लागतात. अशा कात्रीत सापडलेल्या तरुण विवाहित मुलींना वाममार्गावर नेण्याचे प्रकार घडत आहेत. हे काम त्या भागातील काही महिला एजंटच नव्हेत तर खुद्द नवरे मंडळीच करीत असल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे. अशा पद्धतीने वेश्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या काही तरुण महिलांचा शोध निरामय आरोग्य धाम या संस्थेने घेतला, त्यातून नवरा स्वत: आपल्या पत्नीला कुंटणखान्यापर्यंत कसा सोडून जातो, याचे किस्से काही तरुण मुलींकडून सांगितले गेले. अशा प्रकारे महिला विडी कामगारांची तरुणाई अंधकारमय वातावरणात भरकटते आहे. त्यातून त्यांचे आरोग्याचे प्रश्न उभे राहतात. या अभागी तरुणींना परिसरातील गावगुंडांचा आणि पोलिसांचा त्रास सहन करावा लागतो.

पद्मशाली समाजातील घडामोडींचे जाणकार विश्लेषक प्रा. विलास बेत यांच्या माहितीनुसार या समाजात शिक्षणाचे जाळे अलीकडे पसरत आहे. पद्मशाली शिक्षण संस्थेचा शैक्षणिक विस्तार होतो आहे. मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र महिला महाविद्यालय कार्यरत आहे; परंतु त्यात गरीब व कष्टकरी घरातील मुलींचा सहभाग नगण्य आहे. गरीब घरातील मुलगी हुशार असूनही जास्त शिकली तर तिला अनुरूप नवरा मिळणार नाही, याची चिंता मुलींच्या पालकांना असते. मुलगी शाळा-कॉलेजला जाताना-येताना रस्त्यावर उनाड पोरांनी अडवून छेडछाड केली तर त्याची तक्रार आई-वडिलांकडे करण्याची सोय नसते. कारण त्यातून शिक्षण सुटण्याची भीती. शिक्षण पूर्ण होते ना होते, तोच विवाहाची घाई सुरू झालेली असते. अशापैकी काही शिकलेल्या मुलींना त्यांच्या पालकांशी संवाद साधून अन्य क्षेत्रांत नोकरी मिळवून दिली तर या मुलींना पूर्व भागापुढचे काहीच माहीत नसते. बाहेरच्या जगाशी ज्या मुलींचा संबंध आला, त्यांना नवीन स्वप्ने पडू लागली. त्यातून ब्युटी पार्लर, मेंदी यांसारखे रोजगार मिळवू लागल्या; परंतु यातदेखील समाजाची अजूनही मागासलेली दृष्टी कायम राहिल्याने नवी स्वप्ने पाहणाऱ्या मुलींना नव्या जगाशी जोडले जाणे हे कठीण होत आहे. उद्योग ओसरल्याने आर्थिक नाइलाज आहेच, परंतु नवीन काही करू देण्यास पालक मंडळी धास्तावली आहेत. महिलांची कुचंबणा होत असताना त्यांना समाजात मूलत: स्थान नाही. एखाद्या मुलीवर अन्याय झाला तर तिच्या बाजूने उभे राहायला समाज पुढे येत नाही. काही वर्षांपूर्वी सिटूचे नेते, नरसय्या आडम मास्तर हे दर आठवडय़ाला बुधवारी सुट्टीच्या दिवशी आपल्या कार्यालयात समाजातील कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी वेळ द्यायचे. घरातील भांडणे, नवरा दारू पिऊन मारहाण करतो, नवऱ्याने घरातून हाकलून दिले, मुलींचे रस्त्यावर छेडछाड होते, अशा स्वरूपाच्या तक्रारी घेऊन महिलांची अक्षरश: जत्रा भरायची. तेथे प्रश्न सुटले जायचे. त्यातून तरुण मुलींना मोठा आधार मिळत असे. पूर्वी समाजातील मान्यवर मंडळींचा दबदबा होता. त्यांच्या लवादामार्फत कौटुंबिक समस्यांचे निराकरण व्हायचे; परंतु पुढे हे काम थंडावले. दुसरीकडे पद्मशाली ज्ञाती समाज संस्थेनेही या प्रश्नांकडे वेळ दिला नाही. सामाजिक धाक राहिला नाही. अल्पवयीन मुलींचे विवाह ठरविणे, कधी एकदा ती मुलगी सासरी जाते असे पाहणे, या दृष्टिकोनाचा गैरफायदा इतर मंडळी घेतात. मुलींना परंपरेचा काच आहे आणि नव्या बदलांचा जाचही. त्यांना उच्च शिक्षण दिले जात नाही. शिक्षण नाही, नोकरी नाही आणि तिचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व संपवणे हेच सुरू आहे.

First Published on March 7, 2019 1:02 am

Web Title: women bidi workers facing problems in east solapur beedi workers