‘होणार सून मी..’ या मालिकेतील मनीष या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता सचिन देशपांडे याने संजीव कोलते दिग्दर्शित ‘तानी’ या गाजलेल्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. हौशी रंगभूमी, स्पर्धेतील एकांकिका, मग टीव्ही, चित्रपट केल्यानंतर आता सचिनला एक चांगले व्यावसायिक नाटक करण्याची दुर्दम्य इच्छा आहे.
सचिन देशपांडे
चारचाकी गाडी चालविण्याचे ‘पॅशन’ काही औरच असते. कॉलेजमध्ये असल्यापासूनच कारचे पॅशन मला आहे. गाडी चालविण्याबरोबरच अनेक मित्रांना गाडी शिकविण्याचीही मला हौस आहे. मारुती हा माझा आवडता ब्रॅण्ड असला तरी अनेक गाडय़ा चालविण्याचा आनंद मी लुटला आहे. कार चालविताना कारचा ‘फील’ आला पाहिजे. तरचे कार चालविण्याचा आनंद घेता येतो, असे मला तरी वाटते. त्यामुळे व्हील हातात धरण्यापूर्वी पायातले बूट काढून नंतरच मी गाडी स्टार्ट करतो. गाडी स्टार्ट केल्यानंतर तेल, पेट्रोलची पातळी चेक केल्यानंतर मग गिअर टाकून हळूहळू वेग घेण्यातली मजा काही औरच असते, असे मला वाटते.  कारचा ‘फील’ घेत घेत ती चालवली तरच अधिक मजा येते. माझा गुरू मंदार देवस्थळीसारखाच मीसुद्धा मारुतीप्रेमी आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. लवकरच मी मारुतीची स्विफ्ट डिझायर ही गाडी घेणार आहे. शुभ्रधवल रंगाच्या स्विफ्ट डिझायरचा ‘लुक’ अतिशय उत्तम दिसतो. पाच जण अगदी आरामात बसून आरामदायी प्रवास करू शकतील, अशी या गाडीत लेगस्पेस आहे. मारुतीच्या सिदान किंवा मिनी सिदान प्रकारातील स्विफ्ट डिझायर मला आवडते कारण त्याला एक दणकट असा ‘मॅनली फील’ आहे. नजीकच्या काळात मी स्विफ्ट डिझायर घेणार आहे. परंतु, कार पॅशन माझी इथेच थांबत नाही. माझी ‘अल्टिमेट ड्रीम कार’ विचाराल तर ती आहे ‘रोल्स रॉइस’. ‘रोल्स रॉइस’ची रईसी शान म्हणजे शब्दांत सांगणे अवघड ठरावे अशी असते. जेव्हा केव्हा योग येईल तेव्हा रोल्स रॉइस खरेदी करायला आवडेल.
शब्दांकन – सुनील नांदगावकर