टाटा इंडिका, आरिया, सफारी, इंडिगो, नॅनो अशा गाडय़ांनंतर आता टाटा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक अत्यंत प्रगत अशी नवीन गाडी बाजारात आणत आहे. मिड रेंज सेडान कारमधील ह्य़ुंदाई एक्सेंट किंवा होंडा अमेझ या दोन गाडय़ांच्या क्लासमधील ही नवीन गाडी टाटासाठी खास आहे. गाडीचे फिचर्स आणि तंत्रज्ञान याबाबतीत ही गाडी ग्राहकांसाठीही खास ठरणार आहे. गाडी आहे टाटा ‘झेस्ट’..

टाटा मोटर्सच्या गाडय़ा म्हटल्या की साधारणपणे एक ठोकळेबाज आकार डोळ्यासमोर येतो. या गाडय़ांचा पुढील भाग, इंजिन, तंत्रज्ञान आणि अंतर्गत रचना यात फारसा फरक आढळून येत नाही, असे म्हटले जाते. त्यातच इंडिगोसारखी सेडान गाडी ही इंडिकाचं एक्स्टेन्शन असल्याने तिच्याकडूनही बूट स्पेस वगळता फार वेगळ्या अपेक्षा ठेवता येत नाहीत. नॅनो आणि सफारी या दोन गाडय़ांचं वेगळेपण बाजूला केलं, तर टाटाच्या गाडय़ांचा चेहरामोहरा सारखाच असतो. मात्र या वेळी टाटा मोटर्सने पहिल्यांदाच ऑटोमोबाइल मार्केटमध्ये थेट सेडान गाडी उतरवली आहे. ही गाडी उतरवताना गेली तीन वर्षे त्यासाठी संशोधन आणि परीक्षणे चालू होती. त्यातून झेस्ट ही गाडी साकारली आहे. ही गाडी चालवण्याचा अनुभव उत्तमच आहे. आरामदायक अंतर्गत रचना, आकर्षक बाह्य़रूप, इंजिनची क्षमता, गाडी चालवण्यासाठीचे तीन वेगवेगळे मोड्स, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर यामुळे ही गाडी चालवणे हा सुखद अनुभव ठरतो.

या गाडीची खासियत म्हणजे ही गाडी तुम्ही तीन वेगवेगळ्या मोड्समध्ये चालवू शकता. गाडीमध्ये सिटी, स्पोर्ट आणि इको हे तीन मोड्स आहेत. केवळ एक बटण दाबून तुम्ही गाडीचा मोड बदलू शकता. शहरात गाडी चालवायची असताना पॉवर आणि मायलेज यांचा ताळमेळ साधण्यासाठी सिटी मोडवर गाडी चालवता येते. त्याशिवाय हायवेवर सुसाट वेगाचा अनुभव घ्यायचा झाल्यास स्पोर्ट मोडवर गाडी टाका. गाडीचा वेग आणि पीकअप चट्कन वाढल्याचं लक्षात येतं. तर जास्तीत जास्त मायलेजसाठी इको मोडवर गाडी चालवण्याची सुविधा टाटा मोटर्सने या गाडीद्वारे दिली आहे. या तीनही मोड्सची चाचणी केली असता खरोखरच भन्नाट अनुभव मिळतो.

सुरक्षा व्यवस्था
सुरक्षेच्या दृष्टीने गाडीत प्रत्येक आसनाला सीट बेल्ट्स देण्यात आले आहेत. पुढील दोन आसनांना तीन पॉइंट सीटबेल्ट्स, मागील दरवाजांच्या बाजूच्या दोन्ही आसनांना तीन पॉइंट सीटबेल्ट्स आणि मधल्या आसनासाठी लॅप बेल्ट अशी सुविधा आहे. त्याशिवाय स्पीड सेन्सिंग ऑटो लॉक, रिमोट सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, पुढील दोन्ही आसनांसाठी एअरबॅग्ज अशी तरतूद सुरक्षेसाठी केली आहे.

इतर सुविधा
या महत्त्वाच्या बाबींबरोबरच गाडीची चावी फोल्डेबल आहे. गाडीवर असलेल्या अ‍ॅण्टेनामुळे सिग्नल मिळण्यास मदत होते. ड्रायव्हरशेजारच्या आसनासाठी व्हॅनिटी आरशाची सुविधाही आहे. तसेच तापमानाप्रमाणे नियंत्रणात येणारी वातानुकुलन यंत्रणाही गाडीत उपलब्ध आहे. गाडीतील अद्ययावत एण्टरटेन्मेण्ट सिस्टीममुळे गाडीत ऑक्झिलरी, मेमरी कार्ड आणि पेन ड्राइव्ह यांच्यासह मोबाइल ब्लुटूथच्या सहाय्याने जोडण्याची सुविधा आहे. ब्लुटूथ सहाय्याने मोबाइल गाडीच्या यंत्रणेशी जोडला गेल्यानंतर गाडी चालवताना फोन उचलणे किंवा फोन कट् करून मेसेज पाठवणे या दोन्ही गोष्टी स्टिअरिंग व्हीलच्या बाजूलाच दोन वेगवेगळ्या बटणांद्वारे दिल्या आहेत.

इंजिन
टाटा झेस्ट ही गाडी पेट्रोल आणि डिझेल दोन प्रकारच्या इंजिन्समध्ये उपलब्ध आहे. यापैकी पेट्रोल इंजिन रेव्होट्रॉन १.२टी, ४ सिलेंड्रिकल, टबरेचार्जड् आहे. रेव्होट्रॉन या प्रकारातील इंजिन टाटाने आपल्या इंग्लंडमधील इंजिनीअरिंग टीमकडून खास तयार करून घेतलं आहे. या इंजिनची क्युबिक क्षमता ११९३ सीसी एवढी असून ५००० आरपीएमला ९० पीएस एवढी शक्ती हे इंजिन देतं. टॉर्क क्षमता १७५० ते ३५०० आरपीएमसाठी २०० एनएम एवढी आहे. त्यामुळे गाडीचा वेग अचानक कमी झाला, तरी गाडी तिसऱ्या किंवा दुसऱ्या गिअरमध्येही आरामात खेचली जाते.
डिझेल इंजिन ४ सिलेंड्रिकल, टबरे इंटरकूल्ड असून त्याची क्युबिक क्षमता १२४८ सीसी एवढी आहे. तर या इंजिनाची पॉवर ४००० आरपीएमसाठी ९० पीएस एवढी आहे. या इंजिनाची टॉर्क क्षमता १७५० ते ३००० आरपीएमसाठी २०० एनएम एवढी आहे. या सेगमेण्टमधील अत्यंत पॉवरफुल इंजिन म्हणून या गाडीकडे पाहण्यास हरकत नाही.

बाह्य़ रूप
सेडान प्रकारातील टाटा झेस्ट ही गाडी दिसायला आकर्षक आहे. मात्र या गाडीचे बाह्य़ रूप ह्य़ुंदाई एक्सेंट किंवा होंडा अमेझ यांच्याशी मिळतंजुळतं आहे. गाडीच्या बॉनेटजवळील ग्रीलचा भाग मात्र टाटा इंडिका, इंडिगो, आरिया या गाडय़ांसारखाच आहे. ही गाडी उभी असली, तरी त्यात गतिमानता दिसावी, यादृष्टीने गाडीचा मागचा भाग, दरवाजांवरील स्ट्रिप्स यांचा उत्तम उपयोग केला आहे. रूफटॉप अ‍ॅण्टेनामुळे तर गाडीच्या बाह्य़रूपात आणखीनच भर पडते. गाडीची चाके पंधरा इंच व्यासाची असून टायर टय़ुबलेस आहेत. गाडीच्या ३९९५ मिमी लांबीमुळे गाडी छान लांबलचक दिसते. टेल लाइट्सही आपल्या अनोख्या आकारामुळे लक्ष वेधून घेतात.

अंतर्गत रचना
ही गाडी पाच जणांच्या कुटुंबासाठी अत्यंत आदर्श सेडान ठरू शकते. दोन अधिक तीन अशी या गाडीतील आसन व्यवस्था आहे. गाडीतील पुढील दोन्ही आसने अत्यंत आरामदायक आहेत. लाँग ड्राइव्हदरम्यान चालकाला अजिबात त्रास होणार नाही, अशा सीट्समुळे ड्रायव्हिंग हा सुखद अनुभव ठरतो. सीट्स पूर्णपणे फॅब्रिक असून रग्बी प्रकारातील आहेत. गाडीचा डॅशबोर्ड दोन रंगांमध्ये बनला आहे. यात जावा ब्लॅक आणि लाट्टे हे दोन रंग आहेत. चारही दरवाजांना पॉकेट्स आहेत. त्याचप्रमाणे बूट आणि एसी व्हेण्ट्स यांचीही सुविधा आहे. गाडीत हरमान या कंपनीची ध्वनिव्यवस्था असून त्यामुळे गाडी चालवताना म्युझिक ऐकणं, हा भन्नाट अनुभव आहे. गाडीत आठ स्पीकर्स असून यात दोन स्पीकर्स आणि दोन ट्विटर्स पुढे आणि दोन स्पीकर्स व दोन ट्विटर्स मागे असे विभाजन करण्यात आले आहे. गाडीची बूट स्पेसही खूप चांगली असून त्यात सामान ठेवण्यात काहीच अडचण येणार नाही.