चिंटू रोज झोपेत गादी ओली करतो..मानसीला सतत नखं कुरतडायची सवय लागलीय..सुजयचे आई-बाबा त्याला जरा रागावले की तो श्वास रोखून धरून त्यांना घाबरंघुबरं करतो..लहान मुलांच्या अशा सवयींचं मूळ त्यांच्या भावविश्वात आहे का?..पालकांना नेहमीच त्रासदायक वाटणाऱ्या बच्चेकंपनीच्या या वागणुकीविषयी सांगताहेत बालरोगतज्ज्ञ  डॉ. शरद आगरखेडकर.

हल्ली आई आणि बाबा दोघंही सहसा नोकरी करत असतात. पूर्वीसारखी एकत्र कुटुंबही आता न राहिल्यामुळं अर्थातच लहानग्यांना अगदी एक वर्षांच्या वयापासूनच पाळणाघर लावलं जातं. ही गोष्ट चूक की बरोबर हे ठरवत बसण्यापेक्षा अनेकदा त्याला पर्याय नसतो हे लक्षात घ्यायला हवं. पण त्या लहानग्यासाठी मात्र आई-बाबांना सोडून पाळणाघरात राहायला जाणं हा खूप मोठा बदल असतो. आई आपल्याजवळ नाही याची भीती, चिंता त्याच्या मनात घर करून राहणंही साहजिक आहे. काहीही करुन आई-बाबांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायला हवं हेही त्या छोटय़ा जीवाला चटकन उमगतं. या दोन्ही गोष्टींमधून नखं खाणं किंवा आईबाबांसमोर श्वास रोखून धरणं, अशा गोष्टींना सुरुवात होते. गादी ओली करणं हेदेखील अगली लहान मुलांपासून १०-१२ वर्षांच्या मुलांपर्यंत सर्रास दिसतं.
पूर्ण वेळ पालकांनी मुलांसाठी घरी थांबणं जरी शक्य नसलं तरी त्याला वेळ देणं फार गरजेचं आहे. पण हल्ली ‘क्वालिटी टाईम’ या शब्दाची व्याख्या बदलायला लागलीय. मुलाला हवी ती वस्तू आणून देणं, त्याला रोज-रोज चॉकलेट किंवा आकर्षक पाकिटातल्या वेफर्स सारखा खाऊ घेऊन देणं म्हणजे त्यांच्याबरोबर वेळ घालवणं नव्हे. मुलं आपल्या बोलण्यातून काही सांगू शकत नसली तरी पालकांचा सहवास मुलांना हवा असतो. लहान मुलांना आईनं दर दोन- तीन तासांनी मायेनं जवळ घेतलेलं आवडतं. त्या स्पर्शात मुलांना सुरक्षितता वाटते, आधार वाटतो.
मुलांच्या वयाची पहिली पाच वर्षे खूप महत्वाची असतात. या काळात मुलांच्या भाषेचा विकास होतो, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा परस्परसंबंध समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात तयार होते, वेगवेगळी शारिरिक कामे ती करु लागतात. मुलं जेव्हा पालकांबरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडून मुलांना सतत नवीन शिकायला मिळतं. रोज रात्री एखादी छानशी गोष्ट वाचून दाखवणं, त्या गोष्टीतल्या वेगवेगळ्या भूमिका पालक आणि मुलांनी एकमेकांत वाटून घेऊन त्याप्रमाणं हावभाव करून त्या गोष्टीचा आनंद घेणं हे खरंच शक्य नाही का? सध्या सुट्टय़ा लागल्यामुळं घराघरात मुलांना संस्कारवर्गात किंवा ‘अ‍ॅक्टिव्हिटी क्लब’मध्ये घालायची टूम निघाली असेल. पण प्रत्येक मुलाच्या गरजा, त्यांचा मजा करण्याचा मूड हे आपण लक्षात का घेत नाही? कधी मुलांना खूप पळावंसं वाटतं, तर कधी त्यांना फक्त चित्रंच काढायची असतात, कधी दिवसभर सायकल फिरवावीशी वाटते, तर कधी मातीत हात घालून त्यापासून वेगवेगळ्या कलाकृती बनवण्याचा मूड असतो. आपल्या छोटुकल्याचा मूड ओळखून त्याला तसं करण्याची संधी देणं हे पालकांकडून व्हायला हवं. निदान जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तसा प्रयत्न नक्कीच करता येईल.
भीती आणि चिंतेतून मूल दबतं. बोलताना अडखळणं, तोतरं बोलणं, गादी ओली करणं, नखं खाणं या गोष्टी त्यातून सुरू होऊ शकतात. या गोष्टी मुलं मुद्दाम ठरवून त्रास देण्यासाठी करत नाहीत. त्यांना कशाची भीती वाटते किंवा त्यांना पालकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं, असं पुन:पुन्हा सांगावसं का वाटतं याचा विचार पालकांनी करायला हवा. अर्थातच पालक म्हणून आपण कुठे चुकलो का, मुलांना वेळ देण्यात कमी पडलो का, त्यांना कारण नसताना अति धाकात ठेवलं का या सर्व गोष्टींचा मनाशी विचार करायला हवा. मुलांना वेळ देणं अगदीच शक्य नाही, असं सहसा होत नाही. आई आणि बाबा आलटून पालटून मुलासाठी वेळ काढू शकतील.

गादी ओली करणे
झोपेत लघवी करुन गादी ओलू करणाऱ्या मुलांना देण्याच्या गोळ्यांच्या जाहिराती नेहमी बघायला मिळतात. पण पालकांनी स्वत:च्या मनाने अशा गोळ्या मुलांना देऊ नयेत. काही पालक अशाच जाहिराती बघून आणलेले ड्रॉप्स मुलांनाच्या नाकात घातलात. पण त्याचेही काही दुष्परिणाम असू शकतात. त्यामुळे गादी ओली करण्याच्या समस्येबद्दल  डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अनेकदा ही समस्या कोणतंही औषध न घेताही बरी होते. लहान मुलांच्या मूत्राशयाची मूत्र साठवून ठेवण्याची क्षमता हळूहळू तयार होते. यामुळेही झोपेत लघवी होण्याची तक्रार असू शकते.

श्वास रोखून धरणे
श्वास रोखून धरणे हा बहुतेक वेळा आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचा प्रकार असतो. मुलाच्या पाठीवर पाण्याचा हबकारा मारला, त्याच्या तोंडावर फुकर घातली की सहसा मुलं श्वास रोखून धरणं थांबवतात. काही मुलांचं हिमोग्लोबिन कमी असतं. शरीरात मज्जांमधून होणारं संदेशवहन अशा मुलांमध्ये बिघडलेलं असू शकतं. मुलांच्या आहारात गूळ, शेंगदाणे, नाचणी, अंडं, पालेभाज्या हे घटक असतील तर त्यांचं हिमोग्लोबिन वाढू शकेल. असं सगळं असलं तरी मूल श्वास रोखून धरत असेल तर एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
डॉ. शरद आगरखेडकर. (शब्दांकन : संपदा सोवनी)  ashalaka@gmail.com