पूर्वी गुटगुटीतपणा हे खात्यापित्या घरचे लक्षण मानले जायचे. आता सौंदर्याची व्याख्या बदलली आहे. त्यातूनच बारीक असण्याला खूप जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे आरोग्याविषयी लोकांची जागरूकताही वाढत चालली आहे. पण या सगळ्यात झटपट बारीक होण्यासाठी काही जणांकडून शॉर्टकट वापरले जातात. विचित्र पद्धतीची आहारयोजना म्हणजे ‘फॅड डाएट’ हा त्यातला एक भाग. या फॅड डाएटमुळे वजन कमी होत असले तरी त्याचे दुष्परिणामच अधिक आहेत.

स्त्रियांमध्ये स्थूलपणा प्रामुख्याने छाती, कंबर आणि मांडय़ांवर वाढतो, तर स्थूल पुरुषांमध्ये पोट सुटलेले दिसते. जीवनशैलीतला बदल हे याचे प्रमुख कारण म्हणता येईल. ओटय़ावर उभ्याने स्वयंपाक करणे, डायनिंग टेबलवर जेवणे, पलंगावर झोपणे किंवा अगदी परदेशी पद्धतीचे स्वच्छतागृह वापरणे या रोजच्या कामांमध्ये खाली बसणे आणि उठण्याची क्रिया देखील केली जात नाही. मांडय़ा आणि पोटाला व्यायामच होत नसल्यामुळे त्यावर चरबी साठत जाते.

आरोग्य चांगले राहण्यासाठी वजन उतरवणे चांगलेच आहे, पण सौंदर्याची काहीतरी अचाट कल्पना मनात बाळगून ‘झीरो फिगर’चा ध्यास धरणे बरे नव्हे. पुरेशा माहितीअभावी स्वत:हूनच आपल्या आहारात अघोरी बदल करू लागलो तर वजन कदाचित झटकन उतरेलही, पण आरोग्याच्या दुसऱ्या तक्रारी मात्र सुरू होतील.

‘फॅड डाएट’का नको?

* फॅड डाएट करणे सुरुवातीला खूप सोपे वाटते. अचानक आहारात बदल झाल्यामुळे डाएट सुरू केल्यावर वजन पटकन कमी झालेलेही दिसते. साधारणपणे पंधरवडय़ाने मात्र अशा आहाराचा कंटाळा येऊ लागतो. डाएट पाळणे चुकत जाते आणि व्यक्ती पुन्हा पूर्वीसारखे खाऊ लागते आणि कमी झालेले वजन पुन्हा वेगाने वाढते.

* महत्त्वाची बाब अशी, की फॅड डाएटमध्ये शरीराला आवश्यक असणारे सर्व अन्नघटक मिळत नाहीत. तरुण वयात त्याचे सगळे दुष्परिणाम कदाचित जाणवणार नाहीत. पण वय वाढत जाते तसे ते जाणवायला सुरुवात होते.

* फॅड डाएटमध्ये अतिप्रथिने खाल्ल्यास मूत्रपिंडावर त्याचा ताण येतो. पिष्टमय पदार्थ अजिबात न खाल्ल्यामुळे शरीराला शक्ती पुरत नाही.

* वजन उतरवण्यासाठी उपासमार करून घेण्याचा पर्याय अनेकांकडून वापरला जातो. शरीरात पिष्टमय पदार्थाचा साठा कमी असतो. उपासमारीत हा साठा पहिले दोन दिवस पुरतो. नंतरही उपासमार सुरूच राहिली तर शरीरातील प्रथिने आणि स्निग्ध पदार्थाचे साठे वापरले जाऊ लागतात. परिणामी शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते. तसेच काही जीवनसत्त्वांची कमतरताही निर्माण होते. लोह किंवा जीवनसत्त्व ‘बी १२ची’ कमतरता यात दिसू शकते.

* आपल्या शरीरात साधारणत: ७० टक्के पाणी असते. फॅड डाएटमध्ये पाणी कमी होऊन आधी त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात. शरीरातील पेशींना प्रथिने न मिळाल्यामुळे या पेशी नष्ट व्हायला लागून त्याची परिणती रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यात होते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे नष्ट झालेल्या पेशींची जागा ‘फॅट सेल्स’ घेतात आणि वजन जितके कमी झाले त्यापेक्षा थोडे जास्तच वाढते.

* डोके दुखणे, अर्धशिशी, रक्तदाब कमी होणे, बद्धकोष्ठ, मूत्रपिंडावर ताण येणे, शरीरातील चैतन्य कमी होणे असे विविध दुष्परिणाम फॅड डाएटच्या काळात समोर येऊ लागतात.

वजन कसे उतरवावे?

* आपल्या प्रकृतीनुसार समतोल आहार घेऊन आणि त्याला व्यायामाची जोड देऊन वजन उतरवणे हा योग्य मार्ग आहे. या प्रक्रियेत शरीरातील अतिरिक्त फॅट सेल्स नष्ट होतात. आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही, तसेच शरीरात कोणतीही कमतरता निर्माण होत नाही. कमी उष्मांक (कॅलरी), कमी चरबी असलेला आहार आणि नियमित व्यायाम गरजेचा.

*  आहारात योग्य बदल आणि व्यायाम या दोन्हीची मदत घेऊन महिन्याला २ ते ३ किलो वजन उतरत असेल, तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही निवडलेला पर्याय योग्य आहे असे मानण्यास हरकत नाही. अशा रीतीने उतरवलेले वजन पुढेही टिकू शकते. वजन वाढण्यासाठी काही वेळ गेलेला असतो, त्यामुळे वजन उतरवतानाही पुरेसा वेळ द्यायला हवा. त्यात घाई नको.

‘फॅड डाएट’ म्हणजे काय?
* ठरवून कमीत कमी खाणे, उपासमार करून घेणे
* दिवसभर फक्त फळेच खाऊन राहणे
* केवळ ज्यूस पिणे
* फक्त सॅलड्स खाणे
* केवळ प्रथिने असलेले पदार्थ खाणे
* पिष्टमय पदार्थ अजिबात न खाणे
* ३, ५ किंवा ७ दिवस एकच कुठलातरी पदार्थ खाऊन राहणे
* फक्त भातच खाणे
* फक्त केळी खाऊन राहणे
* जेवणाऐवजी फक्त आइस्क्रीम खाणे

drjoshivaishali@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)