खोटय़ा पदवी प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पिंपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी केलेल्या आंदोलनाला संततधार पाऊस आणि पक्षातील गटबाजीचा चांगलाच फटका बसला. अजित पवार यांच्या दौऱ्यात मोठय़ा संख्येने उपस्थित राहणारे नेते, पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी या आंदोलनाकडे सपशेल पाठ फिरवली. त्यामुळे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत आंदोलनाची औपचारिकता पूर्ण करावी लागली.
मंगळवारी सकाळी तावडे यांच्या विरोधात आंदोलन होणार असल्याचे निरोप राष्ट्रवादीकडून कालपासून देण्यात येत होते. प्रत्यक्षात आंदोलनाच्या निर्धारित वेळेत मोजकीच मंडळी हजर राहिली. त्यामुळे दहा वाजताचे आंदोलन बारा वाजता झाले. भर पावसात वाघेरे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात महापौर शकुंतला धराडे, नगरसेवक अरुण टाक, अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक नाना काटे, मच्िंछद्र तापकीर यांच्यासह ३० ते ४० जणांनी सहभाग घेतला. पक्षातील जवळपास सर्वच बडय़ा नेत्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली. पावसामुळे घाईघाईने हे आंदोलन उरकण्यात आले. पत्रकारांशी बोलताना वाघेरे यांनी तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तावडे यांनी नागरिकांची फसवणूक केली आहे. राज्य सरकारमध्ये असा खोटारडा मंत्री असणे, हे राज्याचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली. राज्याचा शिक्षणमंत्री हाच मोठा ‘विनोद’ असल्याची टीका महापौर धराडे यांनी केली.