अर्थशास्त्राच्या ‘नोबेल’चे यंदाचे मानकरी अँगस डेटन यांनी, भारतासारख्या देशातील वाढत्या गरिबीसाठी आíथक सुधारणांना जबाबदार धरणाऱ्यांचा युक्तिवाद त्यांच्याच गळ्यात तर घातलाच. पण त्याचबरोबर गरिबी झपाटय़ाने दूर झाल्याचे सरकारचे दावे किती फसवे आहेत, हेही दाखवून दिले..

‘भारतीय सर्वसाधारणपणे फार उंच नसतात याचे कारण त्यांच्या जनुकांत नाही तर एकंदरच असलेल्या कुपोषणामध्ये आहे’, ‘व्यक्तीची उंची ही त्याच्या लहानपणी झालेल्या योग्य पोषणाची निदर्शक आहे’, ‘जे वृद्ध एकत्र कुटुंबात १८ वर्षांपेक्षा कमी तरुणांसमवेत राहतात त्यांना अधिक मनस्तापास तोंड द्यावे लागते’, ‘सरकारी आíथक धोरण आखणे तज्ज्ञांच्या ज्ञानापेक्षा लोकांच्या गरजांवर आधारित हवे’, ‘श्रीमंत देशांकडून गरीब देशांना दिल्या जाणाऱ्या मदतीमुळे उपायापेक्षा अपायच अधिक होतो..’, ‘ज्या व्यवस्थेत संपत्तीनिर्मितीचे नियंत्रण मूठभर लोकांच्या हाती असते त्या व्यवस्थेत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी मोठय़ा प्रमाणावर वाढते..’ प्रथमदर्शनी ही सर्व निरीक्षणे कोणा एका समाजाभ्यासकाची वा ललित लेखकाची आहेत, असा समज झाल्यास काही गर नाही. परंतु ही सर्व ठोस मते सखोल अभ्यासांती अँगस डेटन यांनी मांडली असून सोमवारी त्यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. या महागौरवाबाबत ते भारताचेच आभार मानतील. याचे कारण गरिबीवरील अभ्यासासाठी त्यांना रसद आणि कच्चा माल पुरवला तो भारताने. गरिबी आणि शारीरिक-बौद्धिक वाढ यांतील संबंध सिद्ध करण्यासाठी पुरून उरतील इतकी उदाहरणे त्यांना पुरवली ती भारताने आणि मुख्य म्हणजे गरीब आणि गरिबी मोजण्याचे मापदंड विकसित करण्याची संधी त्यांना मिळाली ती भारतातच. इतकेच काय गरिबी निर्मूलनाच्या सरकारी उपायांतील फोलपणा दाखवून देण्याच्या मुद्दय़ावर त्यांचे वाद झाले तेही भारतीय अर्थतज्ज्ञांशी. अशा तऱ्हेने डेटन यांच्या नोबेल पुरस्कारात भारताचा सिंहाचा वाटा असून त्यामुळे जमेल तेवढय़ा भारतीयांना त्यांच्या अभ्यासाची ओळख करून देणे हे कर्तव्य ठरते.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : शेवटी आर्थिक फटका शेतकऱ्यांनाच!
maval lok sabha mahayuti marathi news, shrirang barne latest news in marathi
श्रीरंग बारणे यांच्या अडचणी वाढल्या, चिंचवडमधून भाजपाचा विरोध कायम
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

डेटन मूळचे स्कॉटलंडमधील एिडबरा या रम्य गावचे. इयान फ्लेिमग या लेखकाचा मानसपुत्र असलेला जेम्स बाँड ज्या महाविद्यालयात शिकतो, त्याच महाविद्यालयाचे डेटन हे विद्यार्थी. ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर हेदेखील याच महाविद्यालयाचे विद्यार्थी. परंतु डेटन आता ब्रिटनमधे वास्तव्यास नसतात. बुद्धिवैभवासाठी प्रतिष्ठित अशा प्रिन्स्टन या अमेरिकेतील महाविद्यालयात ते अध्यापनाचे काम करतात. गरीब, गरिबी आणि त्यास तोंड देण्याचे, ती दूर करण्याचे विविध मार्ग हा खास त्यांच्या अभ्यासाचा विषय. वरवर पाहता तो रूक्ष वाटला तरी त्यात वेगवेगळ्या समाजांतील भावनिक, सांस्कृतिक आणि अर्थातच सामाजिक पदर गुंतलेले असतात. डेटन यांचे वैशिष्टय़ हे की या सगळ्यांची वेगळी मांडणी त्यांनी वेगळ्या पद्धतीने केली. गरिबीच्या मोजमापनाचे म्हणून काही निकष असतात. डेटन यांनी ते सर्व बाजूला ठेवले. या मोजमापनासाठी त्यांनी स्वत:ची पद्धत विकसित केली. सर्वसामान्य पण कुशल गृहिणी ज्याप्रमाणे स्वयंपाकघरात हाताशी असलेल्या घटकांतूनच उत्तम पाककृती सादर करते त्याप्रमाणे डेटन यांनी सहज उपलब्ध असलेल्या माहिती तपशिलांतून, लोकांच्या जीवनशैलीय निरीक्षणांच्या आधारे गरिबी मापनाची पद्धत तयार केली. यातील महत्त्वाचा मुद्दा क्रमांक दोन म्हणजे हे सर्व करताना त्यांनी स्वत:ला आपल्या अभ्यासिकेपुरतेच मर्यादित ठेवले नाही. गरिबीची पाहणी करण्यासाठी ते देशोदेशी हिंडले. त्यांच्या अभ्यासकांचा चमू गावोगावच्या चावडय़ांवर जाऊन स्थानिकांशी गप्पांतून माहिती काढत असे. शहरांइतके ग्रामीण जीवन गरीब आणि श्रीमंत यांतील दरी न दर्शवण्याइतके अपारदर्शी नाही. गावात कोणाचे बरे चालले आहे आणि कोणाचे नाही, याची सहज माहिती सर्वाना उपलब्ध असते. डेटन यांनी अशाच माहितीच्या आधारे गरीब आणि श्रीमंतीचा माग काढला. गरीब हे का गरीब आहेत आणि त्यांतलेच असूनही काहींचे का बरे चालले आहे, याचा पारदर्शी तपशील त्यांना अशा संशोधनातून मिळत गेला. त्यामुळेच त्यांच्यासारख्या अभ्यासकास देशोदेशीचे सांस्कृतिक संदर्भठिपके जोडून सुरेख रांगोळी मांडता आली. भारतात असलेली अन्त्योदय ही संकल्पना इंडोनेशियातील अशाच एका संकल्पनेशी कशी मिळतीजुळती आहे, असे डेटन दाखवून देऊ शकले ते अशा हिंडत्या संशोधन शैलीमुळेच. २००३ साली प्रिन्स्टन विद्यापीठासाठी केलेल्या संशोधनात आणि नंतर सादर केलेल्या ‘मेझिरग पॉव्हर्टी’ या निबंधात डेटन यांनी अशी अनेक उदाहरणे सादर केली आहेत. त्यामुळे त्यांचे आíथक लिखाण जिवंत होते आणि सर्वसामान्यांस ते समजू शकते. याच निबंधात त्यांनी गरिबी मोजणे, स्वत:ला, आपल्या आप्तेष्टांना सरकारी मदतीसाठी गरीब या वर्गवारीत घुसवणे आदी उद्योग कसे सर्रास सुरू होतात याचे यथार्थ आणि आपल्याला सहज जाणवेल असे वर्णन केले आहे. डेटन असे दाखवून देतात की एखाद्यास तू गरीब आहेस का, असा थेट प्रश्न विचारल्यास त्यातील बरेचसे ओशाळे होतात. परंतु गरिबांसाठी म्हणून असलेल्या सोयी-सुविधांचा फायदा घेताना मात्र त्यांच्यातील हे ओशाळेपण नाहीसे होते, असे त्यांचे निरीक्षण आहे. ते आपल्याला पटल्याशिवाय राहणार नाही. १९९० नंतर आपल्याकडील गरिबीच्या चच्रेस विशेष धार आली. कारण नरसिंह राव सरकारने राबवलेले उदारीकरणाचे धोरण. यात खासगीकरण अनुस्यूत होते. सरकारी मालकीचे जे जे फायदेशीर नाही ते ते फुंकून टाका, हा त्यामागील अंतर्भूत संदेश. त्यामुळे डाव्यांचे आणि डाव्या उजव्यांच्या सीमारेषेवर असलेल्या समाजवाद्यांचे पित्त खवळले. पुढे कडवे उजवेही या उदारीकरणाचे टीकाकार बनले. या गरीब निरीक्षणावर आधारित ‘डेटा अँड डॉग्मा : द ग्रेट इंडियन पॉव्हर्टी डिबेट’ असा सविस्तर निबंधच त्यांनी लिहिला.

यासाठी त्यांनी भारताचीच निवड का केली? कारण जगातील गरिबांमधले जवळपास २० टक्के गरीब, दरिद्री एकटय़ा भारतातच राहतात. तेव्हा भारतातील पाहणीतले निष्कर्ष हे एकटय़ा भारताचेच राहत नाहीत. ते जगातील गरिबी मापनाचे आणि तीवरील उपाययोजनांचे महत्त्वाचे घटक ठरतात, असे त्यांचे म्हणणे. आपल्या लेखनातून डेटन यांनी वाढत्या गरिबीसाठी आíथक सुधारणांना जबाबदार धरणाऱ्यांचा युक्तिवाद त्यांच्याच गळ्यात तर घातलाच. पण त्याचबरोबर गरिबी झपाटय़ाने दूर झाल्याचे सरकारचे दावे किती फसवे आहेत, हेही त्यांनी दाखवून दिले. यामुळेच सकल राष्ट्रीय उत्पन्न, महागाई निर्देशांक, राष्ट्रीय नमुना पाहणी वगरे सरकारी अहवालांवर विसंबून राहणे त्यांना आवडत नाही. किंबहुना डेटन ते नाकारतातच. घरगुती पाहणीतून अधिक चांगले घटक समोर येतात असे त्यांचे निरीक्षण आहे. अट फक्त एकच. उदाहरणे भरपूर हवीत. कोणत्याही अर्थव्यवस्था वा समाजाविषयी सरसकट भाष्य करण्यासाठी उदाहरणांची संख्या तितकीच विपुल हवी, ती नसेल तर केलेले भाष्य वा काढलेले निष्कर्ष हे वरवरचे असतात असे त्यांनी सातत्याने दाखवून दिलेले आहे.

परंतु डेटन हे विचारधारा मानणाऱ्या अन्य काही अर्थतज्ज्ञांसारखे तुच्छतावादी नाहीत. पण म्हणून ते आशावादी आहेत, असेही नाही. द न्यूयॉर्कर साप्ताहिकात डेटन यांच्यावर नोबेलच्या निमित्ताने गौरवलेख लिहिताना जॉन कॅसिडे या ज्येष्ठ पत्रकाराने त्यांचे वर्णन ‘अ स्केप्टिकल ऑप्टिमिस्ट’ असे केले. म्हणजे संशयी आशावादी. ते अत्यंत रास्त ठरते. तसेच ते वास्तवही आहे. याचे कारण सत्य हे नेहमीच जे काही सुरू आहे त्याबद्दल असलेली तुच्छता आणि त्याबाबत असलेली आशा यांतील सांदीत अडकलेले असते. प्रसिद्धीचा प्रकाशझोत पडतो तो या दोन टोकांवर. महत्त्वाचे मधले नेहमीच दुर्लक्षित राहतात. डेटन यांना नोबेल मिळाल्यामुळे त्यांतील एक अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व पुढे आले. ते आणल्याबद्दल खरे तर नोबेलच्याच निवड समितीचे अभिनंदन. भारतातील दारिद्रय़ामुळे कोणास काही मिळाले असेल नसेल. परंतु या देशातील दारिद्रय़ाच्या अभ्यासाने अँगस डेटन यांना नोबेल पुरस्कार मिळण्यास मदत झाली हे निश्चित. तेव्हा एका अर्थाने ते आपल्यासाठी दरिद्री नारायण ठरतात. दारिद्रय़ कमी व्हावे यासाठी आपले अथक प्रयत्न सुरू होत असताना त्यामागील नारायणत्व डोळ्याआड होणार नाही ही आशा यानिमित्ताने व्यक्त करणे अस्थानी नाही.