23 September 2017

News Flash

क्रांती, कॅस्ट्रो आणि जग

अमेरिकेस विरोध, म्हणजेच भांडवलशाहीस विरोध, हे त्यांच्या कथित क्रांतीचे सूत्र होते.

मुंबई | Updated: November 28, 2016 3:06 AM

स्वत:च्या सत्तांतरात अमेरिकेचा अडथळा आहे हे लक्षात आल्यावर कॅस्ट्रो यांनी अमेरिकेच्या विरोधात आगलावी भूमिका घेण्यास सुरुवात केली..

शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेचा प्रत्येक शत्रू हा सोविएत रशियाचा मित्र मानला जात होता आणि सोविएत रशियाविरोधातील प्रत्येकास आपल्याकडे ओढण्याचा अमेरिका प्रयत्न करीत होता. या खेळात अनेक हुकूमशहांनी स्वत:चे भले करून घेतले. कॅस्ट्रो हे अशांचे शिरोमणी.

उजवीकडचे असोत किंवा डावीकडचे. आपापल्या प्रदेशांत क्रांती करून आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा दावा करणाऱ्यांत नेहमीच अनेक साम्यस्थळे असतात. त्यांची शारीरिक क्षमता दांडगी असते. ते सलग २०-२० तास काम करू शकतात. अमोघ वक्तृत्व हे अशांचे आणखी एक वैशिष्टय़. परिणामकारकता न गमावता हे सातत्याने, दिवसेंदिवस तेच तेच बोलू शकतात आणि त्यांच्या शब्दांवर जनता विश्वास ठेवू शकते. तसेच हे सगळे कथित क्रांतिकारक आपल्या खासगी आयुष्याविषयी कमालीचे साशंक असतात आणि त्याची कधीही वाच्यता होणार नाही, याविषयी दक्ष असतात. त्याचप्रमाणे आपण म्हणजेच व्यवस्था असा समज करून देण्यात हे सर्व नेहमीच यशस्वी होतात. किंबहुना आपण असताना व्यवस्थेची गरजच नाही, असा त्यांचा दावा असतो आणि तो जनतेच्या मनावर ठसवण्यात त्यांना यश येत असते. स्वत:ला नेहमीच ते व्यवस्थेच्या वर ठेवतात आणि आपण जनतेसाठी किती त्याग केला आहे, याच्या खऱ्याखोटय़ा.. बऱ्याचशा खोटय़ाच.. कहाण्या सांगून आपल्याबाबतची सहानुभूती कमी होणार नाही, याची दक्षता त्यांच्याकडून नेहमीच घेतली जाते. आपणच कसे गरिबांचे वाली आहोत आणि त्यांचे हित फक्त आपल्यालाच कसे कळते याचा बेमालूम आभास हे सर्व उत्तमरीत्या करू शकतात. अशा व्यक्ती कधीही बेसावध नसतात आणि थेट जनतेशी संवाद साधण्यातच त्यांना जास्त रस असतो. तसेच अशा नेत्यांना आपल्या नेतृत्वमंडलात दुसऱ्या क्रमांकावर कोणीही चालत नाही. तसा जरा जरी कोणी प्रयत्न केला तर नेतृत्वाची अभिलाषा बाळगणाऱ्यांना ते शांतपणे दूर करतात. ते तसे दूर झाले नाहीत तर या जगातूनच नाहीसे होतात. या सगळ्यांत आणखी एक कमालीचे साम्य म्हणजे या सर्व कथित क्रांतिकारकांचे दृश्यभान उत्तम असते आणि स्वत:ची अशी एक खास वेशशैली ते विकसित करतात. कोणताही क्रांतिकारक वैयक्तिक देहभानाबाबत कधीही बेढब आणि अजागळ नसतो. परंतु ऐतिहासिक सत्य हे की अशा कथित क्रांतिकारकांत नेहमीच एक हुकूमशहा दडलेला असतो आणि त्यांच्या डोळ्यादेखतच त्यांच्या कथित क्रांतीची अखेर होत असते. फिडेल कॅस्ट्रो यांच्याबाबत हे सर्व घडले.

अमेरिकेस विरोध, म्हणजेच भांडवलशाहीस विरोध, हे त्यांच्या कथित क्रांतीचे सूत्र होते. परंतु अमेरिकाविरोध हा कॅस्ट्रो यांचा सत्ता राखण्यासाठीचा देखावा होता. अमेरिकाविरोधाची जाहीर भाषा करणाऱ्या या नेत्याने मधुचंद्रासाठी अमेरिकेचीच निवड केली होती आणि त्या देशात आपल्या मित्रपरिवारासह मौज करणे त्यांना आवडत असे. परंतु पुढे स्वत:च्या सत्तांतरात अमेरिकेचा अडथळा आहे हे लक्षात आल्यावर कॅस्ट्रो यांनी अमेरिकेच्या विरोधात आगलावी भूमिका घेण्यास सुरुवात केली आणि बघता बघता ते जगातील सर्व समाजवादी, डावे यांच्या आकर्षणाचा विषय झाले. गेल्या शतकात दोन क्रांतिकारकांनी तरुणांना वेड लावले. एक चे गव्हेरा आणि दुसरे फिडेल कॅस्ट्रो. क्युबातील अध्यक्ष बातिस्ता यांची राजवट उलथून पाडण्यात कॅस्ट्रो यांना चे याची साथ होती. गनिमी काव्यासाठी चे ओळखला जात असे. तो मूळचा अर्जेटिनाचा. मेक्सिकोत त्याची आणि कॅस्ट्रो यांची ओळख झाली. दोघेही साम्यवादी विचारांचे आणि क्रांतीचे स्वप्न पाहणारे. अशाच पहिल्या क्रांतीसाठी कॅस्ट्रो यांना चे याची साथ मिळाली. १९५९ सालच्या पहिल्या दिवशी बातिस्ता यांची राजवट उलथून पाडण्यात यश आल्यानंतर दोघेही काही काळ एकत्र होते. त्या वेळी सत्ता हाती घेतल्यानंतर कॅस्ट्रो यांनी चे याच्या हाती तुरुंगाचे नियंत्रण दिले आणि चे याच्या देखरेखीखाली बातिस्ता यांचे शेकडो सहकारी फासावर लटकवले गेले. एव्हाना सत्ताधीश झालेल्या कॅस्ट्रो यांनी चे याच्याकडे क्युबाच्या बँकेचे प्रमुखपद दिले. पुढे चे लॅटिन अमेरिकेत क्रांतीचा प्रसार करण्यासाठी गेला असता बोलिव्हियाच्या जंगलात त्याची हत्या झाली. यामागे कॅस्ट्रो यांचा हात असल्याचा संशय व्यक्त झाला होता आणि त्याचे कधीच निराकरण होऊ शकले नाही. वास्तविक बोलिव्हियाच्या जंगलात सुरक्षा फौजांनी वेढल्यानंतर त्याची सुटका करण्यासाठी क्युबाच्या संरक्षण दलांची तुकडी तनात होती. परंतु कॅस्ट्रो यांनी तिला कूच करण्याचे आदेश दिले नाहीत. त्याआधी काही दिवस या दोन क्रांतिकारकांतील संपर्क तुटला होता आणि संबंधांत तणाव निर्माण झाला होता. दोन तलवारी म्यानात ज्याप्रमाणे एका वेळी राहू शकत नाहीत त्याचप्रमाणे दोन क्रांतिकारकही एकाच प्रदेशात एकत्र नांदू शकत नाहीत. चे याचा अंत झाला आणि कॅस्ट्रो यांना रान मोकळे मिळाले.

त्यानंतर अलीकडेपर्यंत, म्हणजे सलग जवळपास पाच दशकांहून अधिक काळ, कॅस्ट्रो यांची निरंकुश सत्ता अबाधित होती. या काळात अमेरिकेचे ११ अध्यक्ष होऊन गेले आणि यातील प्रत्येकाने कॅस्ट्रो यांची सत्ता उखडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. इतकेच काय, अमेरिकेने हर प्रकारे कॅस्ट्रो यांना ठार करण्याचाही प्रयत्न केला. कॅस्ट्रो यांचे सिगार व्यसन लक्षात घेता त्यात स्फोटके भरण्यापासून ते त्यांना आइस्क्रीममधून विषबाधा करण्याच्या प्रयत्नांपर्यंत अमेरिकेने त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा हर प्रकारे प्रयत्न केला. यासाठी जवळपास १०० कोटी रुपये अमेरिकेने खर्च केले असे म्हणतात. परंतु ते सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. कॅस्ट्रो यांना हा आपला विजय वाटत होता. एका अर्थी तो तसा होता हे खरे असले तरी त्यामुळे क्युबाचे काही भले होत होते असे नाही. अमेरिकेच्या विरोधात म्हणून कॅस्ट्रो हे तत्कालीन सोविएत रशियाच्या कच्छपि लागले होते. परंतु तो देखावा होता. आत्ममग्न स्वघोषित क्रांतिकारी आपल्या तात्कालिक सोयीसाठी फक्त असे बहाणे करीत असतो. सोविएत युनियनवरील प्रेमनाटकाच्या बदल्यात कॅस्ट्रो यांना त्या देशाकडून अमाप पसा आणि तितकेच अमाप खनिज तेल मिळत गेले. हा शीतयुद्धाचा काळ. अमेरिकेचा प्रत्येक शत्रू हा सोविएत रशियाचा मित्र मानला जात होता आणि सोविएत रशियाविरोधातील प्रत्येकास आपल्याकडे ओढण्याचा अमेरिका प्रयत्न करीत होता. या खेळात अनेक हुकूमशहांनी स्वत:चे भले करून घेतले. कॅस्ट्रो हे अशांचे शिरोमणी. या खेळामुळे वास्तविक जग १९६२ साली तिसऱ्या महायुद्धापर्यंत येऊन ठेपले. क्युबाच्या आखातात रशियाने आपली क्षेपणास्त्रे डागली होती आणि त्यांचा रोख अमेरिकेवर होता. सुदैवाने हा तणाव निवळला आणि रशियन नौका माघारी गेल्या. यातून कॅस्ट्रो यांचा प्रभाव अधिकच वाढला. अशा प्रवृत्तीच्या हुकूमशहांना जागतिक मंचावर मिरवणे आवडते. कॅस्ट्रो त्यास अपवाद नव्हते. अमेरिकाविरोधी जगाचे ते प्रवक्ते बनले. यातून स्वार्थ साधण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. क्युबाची दरिद्री अवस्था हे त्याचे उदाहरण. ऐंशीच्या दशकाच्या अखेरी बíलनची भिंत कोसळल्यानंतर आणि त्या वेळी रशियात सत्तेवर असलेल्या मिखाईल गोर्बाचोव यांनी स्वहस्ते शीतयुद्धास मूठमाती दिल्यानंतर तर क्युबाची अवस्था अधिकच बिकट झाली. क्युबन शब्दश: अन्नाला मोताद होते. रशियाची मदत आटल्याने क्युबाची चांगलीच गळचेपी झाली. वास्तविक त्याच काळात कॅस्ट्रो यांच्या विरोधात उठाव होईल अशी अटकळ बांधली जात होती. तसे झाले नाही.

याचे कारण प्रशासनात आपल्या समर्थकांची कॅस्ट्रो यांनी केलेली भरती. फिडेल यांचा धाकटा भाऊ राउल याच्याकडेच प्रशासनातील बरेच अधिकार होते. परिणामी फिडेल यांच्या अधिकारास वाटत होते तितके आव्हान तयार होऊ शकले नाही. यामागील आणखी एक कारण म्हणजे शेजारील व्हेनेझुएलात सत्तेवर आलेला ह्य़ुगो चावेझ हा अमेरिकाविरोधी हुकूमशहा. चावेझ आणि आशियात अमेरिकेविरोधात उभा राहू पाहणारा चीन यामुळे कॅस्ट्रो यांच्या अर्थविचारांस पुन्हा बळ मिळाले आणि त्यांना आपला गाडा अधिक पुढे रेटता आला. याच वेळी कॅस्ट्रो यांनी चातुर्याने भ्रष्टाचार विरोधाची हाक दिली आणि काळ्या पशाच्या निर्मितीसाठी शेकडोंना तुरुंगात डांबले. इतकेच काय, भ्रष्टाचार विरोधात लढण्यासाठी कॅस्ट्रो यांनी जनमानसावरील आपल्या प्रभावाचा वापर करीत तरुण स्वयंसेवकांच्या फौजा तयार केल्या. हे सर्व कॅस्ट्रोसमर्थक ठरवतील ती व्यक्ती भ्रष्टाचारी म्हणून जाहीर केली जायची आणि त्याची रवानगी तुरुंगात व्हायची. ही भ्रष्टाचारमुक्ती, काळ्या पशाचा नायनाट म्हणजेच प्रगती असे कॅस्ट्रो सांगत. परंतु यामुळे सामान्य क्युबनवासीयाच्या जगण्यात काहीही फरक पडत नव्हता. परिणामी हळूहळू जनतेचा भ्रमनिरास होत गेला. यामुळे आणि प्रशासनावरील आपली पकड अधिक सल होऊ नये या विचाराने २००६ साली कॅस्ट्रो यांनी पोटावरील शस्त्रक्रियेचे कारण पुढे करीत सत्ता आपल्या भावाच्या हाती दिली. दोन वर्षांनी हा भाऊ राउल हाच सत्ताधीश झाला.

तो पूर्णपणे फिडेल यांच्यापेक्षा वेगळा. त्याने आíथक सुधारणांचा मार्ग पत्करला आणि सामान्य क्युबन नागरिकास संपत्तीचा अधिकार दिला. हे फिडेल यांना पटणारे नव्हते. त्यात २०१४ साली अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी क्युबाशी राजनतिक संबंध प्रस्थापित केले आणि थेट क्युबालाच भेट दिली. रुग्णालयात असलेल्या फिडेल यांच्या साक्षीने ओबामा यांनी क्युबावासीयांना लोकशाही मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. फिडेल अस्वस्थ झाले. पण काहीही करू शकले नाहीत. अप्रत्यक्ष निषेधाचे पत्र तेवढे त्यांनी प्रसृत केले. त्यामुळे ना त्यांच्या राजकीय प्रकृतीत सुधारणा झाली ना शारीरिक. ते होणारच नव्हते. कारण एव्हाना दोन्हीही कालबाह्य़ ठरले होते. त्यांची क्रांती एव्हाना विरली होती. आता प्रकृतीही विझली. दोन्हींचे असे होणे अटळ होते.

क्रांती आपल्या पिल्लांना खाते असे म्हणतात. ते अर्धसत्य आहे. ती पिल्लांना खातेच. पण ती अखेर आपल्या निर्मात्यालाही नष्ट करते. फिडेल अलेक्झांड्रो कॅस्ट्रो यांच्या जगण्यामरण्याचा आपल्यासाठी हा अर्थ आहे.

First Published on November 28, 2016 3:06 am

Web Title: cuban revolutionary leader fidel castro
 1. H
  Harish Joshi
  Nov 28, 2016 at 2:56 am
  फिडेल कॅस्ट्रो हे हुकूमशहा होते पण भारतात तरी कोणती खरी लोकशाही होती?आतापर्यंत काँग्रेस किंवा इतर पक्ष हे काही घराण्यांची खाजगी मालमत्ता झालेत. भाजपमध्ये पण आता येत्या काळात घराणेशाही वाढेल तर मग फक्त काही घराण्यांना निवडून देणे हीच आमची भारतीय लोकशाही असे म्हणावे लागेल कारण भारतीय लोकांच्या मनातून नेत्यांची डोळे झाकून गुलामगिरी करायची सवय गेलेली नाही. आज कोणता सर्वसामान्य माणूस हा अमाप पैसा खर्च न करता निवडुन येऊ शकतो का?तर नाही. त्यामुळे आपण अदृश्य अशा हुकुमशाहीतच राहतो असे म्हणावे लागेल.
  Reply
  1. M
   Manoj
   Nov 29, 2016 at 1:16 am
   totally one sided - is it word to word translation of any american article ? you can blame him in whatever words, the fact remains - Cuban people accepted him for 5 decades...last sentence is totally wrong -"kranti aplya nirmatyala nasht karte" - in this case how can we say this ? .............
   Reply
   1. नवनाथ पवार
    Nov 28, 2016 at 8:47 am
    इकॉनॉमिस्टच्या ह्या लेखात आणि आपल्या अग्रलेखात आश्चर्यकारकरित्या साम्य आहे. चरित्राचा भाग ग्राह्य धरला तरी विश्लेषणही सारखेच ?
    Reply
    1. N
     Nikhil Kamat
     Nov 28, 2016 at 4:10 am
     क्रांतीने कमीत कमी फेडेल कॅस्ट्रोन खाल्ले नाही कारण ५० वर्षे त्यांनी सत्ता गाजविली. दुसरे म्हणजे चे चा खून अमेरिकेने केला हे आता सिद्ध झाले आहे . उगाच टीका करायची म्हणून तुकडी होती वगैरे बरोबर नाही. पूर्वी अग्रलेख मूल्यमापन करू नलिहिले जात हल्ली एकांगी टीका जास्त असते. निदान माणूस मेल्या नंतर तरी ......... आणि टीका करायची ती अस्थानी असू नये सर्वांवर करा जी दिसून येत नाही काही पक्ष आणि वव्यक्तींची बाजू घेऊन त्यांचे ते सत्व खरे असे लिहिणे न होत nahiye....
     Reply
     1. N
      Ninad Lahamage
      Nov 28, 2016 at 5:00 am
      तुमच्याशी पूर्णपणे मत आहे.डोळे झाकून कोणत्याही विचारसरणीच्या नादी लागण्यापेक्षा तटस्तपणे विचार करणे केव्हाही योग्य!
      Reply
      1. ओंकार
       Nov 28, 2016 at 4:24 am
       हुकूमशाही पेक्षा लोकशाही कधीही चांगली. नेता कितीही क्रूर असला तरी त्याला हटवण्याची संधी पाच वर्षांनी जनतेस मिळते. लोकशाही व्यवस्था, न्यायव्यवस्था यांना पर्याय नाही. गांधी-नेहरूंच्या ऐवजी साम्यवादी क्रांतिकारी भगतसिंग यांच्या किंवा कट्टर समाजवादी क्रांतिकारी सुभाषचंद्र बोस यांच्या हाती सत्ता गेली असती भारतात कदाचित हाच प्रकार घडला असता. गांधी-नेहरूं सारखे लोकशाहीवादी नेतृत्व आपल्याला लाभले हे आपले भाग्य आहे.
       Reply
       1. P
        pabande
        Nov 28, 2016 at 10:46 am
        अयोग्य: पुरुषो नास्ति , योजकस्तत्र दुर्लभ: आणि याच योजकाचे यतार्थ वर्णन आपण पहिल्या परिच्छेदात केले आहे ... या योजकाला आपण क्रांतिवीर हुकूमशहा संबोधता ... आणि आडवळणाने त्याचा संबंध कुठे जोडला गेलाय याचा सुजाण वाचकांना सुगावा पण लागावा अशी तजवीज करून ठेवता .. किती ते भाषा सौंदर्य ! सद्दाम बद्दल पण असेच काहीसे होते का हो ! कि तो अमेरिकन मुत्सद्दी पाणा चा बळी होता ! ओसामा चे पण दृश्यभान किती छान होते ! नेहरूंनी तर शांतिदूतांची प्रतिमाच अख्य्या जगात कायम करण्याचा प्रयत्न केलेला..
        Reply
        1. P
         pabande
         Nov 28, 2016 at 10:48 am
         एका ठिकाणी मात्र आपले भाषा चुकली साहेब "क्षेपणास्त्रे डागली होती" असे झाले असते तर काय झाले असते !
         Reply
         1. P
          pabande
          Nov 28, 2016 at 11:00 am
          संस्कृती वगैरे प्रतिगाम्यांच्या लक्षण हो ! आपले संपादक पुरोगामी आहेत ... अमेरिका आणि युरोप हीच राष्ट्रे नव्हे देश या लावर जगण्यास लायक बाकी किस खेत कि मूली ...
          Reply
          1. P
           Prashant
           Nov 28, 2016 at 3:42 pm
           एवढेच साधर्म्य तुम्हाला हुकूमशहांमध्ये दिसत असेल तर एकदा चर्चिल आणि ट्रम्प मधील साधर्म्य देखील लोकांना समजावून सांगा! सगळेच मजेशीर आहे कुबेर साहेब! डोळ्यावरील चष्मा उतरावा एकदा. म्हणजे जरा व्यवस्थित दिसायला लागेल.
           Reply
           1. प्रमोद तावडे
            Nov 28, 2016 at 5:55 pm
            आपण लिहिलेला अग्रलेख हा उजव्या बाजूने रेखाटलेले व्यक्तिचित्र आहे. आता डाव्या बाजूने दिसणारे व्यक्तिचित्र हे असे आहे. . वाचकांनी कोणते विश्वासार्ह मानावे?
            Reply
            1. P
             prasad
             Nov 28, 2016 at 4:52 am
             अग्रलेख वाचल्यानंतर हे मोदींचेच वर्णन तर नाही ना.. असे वाटले!
             Reply
             1. P
              prasad
              Nov 28, 2016 at 2:42 pm
              फोबिया असेलही .. पण मोदींचे आतापर्यंतचे एकंदरीत वागणे आणि वरील लेखात लिहिलेली एका हुकूमशाहाची लक्षणे यात बरेच साम्य आहे!
              Reply
              1. P
               Prashant
               Nov 30, 2016 at 3:40 pm
               मान्य आहे कॅस्ट्रो कसा हि का असेना पण त्याचा काळात Quba ने प्रगती केली. साक्षरता पासून हेअल्थ सारे सर्व बाबतीत डेव्हलोप देशाना लाजवेल असे कार्य केले. लोकांना कोण किती हुकूमशहा आहे कोण दयाळू आहे या पेक्षा त्यांचा दैनंदिन गरज किती चांगल्या पद्धतीने सोडवल्या जातात हे महत्वाचे असते.
               Reply
               1. R
                Ranjit RB
                Nov 29, 2016 at 2:59 am
                अत्यंत एकांगी लेख. पूर्णपणे अमेरिका धार्जिणा आणि फी. कॅस्ट्रो ला गुन्हेगार ठरविणारा. क्युबा ने काय काय कमावला आहे ते एकदा पहा किंवा कमीत कमी इंटरनेट वर तरी शोध घ्या. प्रत्येक वेळी तुमचेच अँगल खरे या भ्रमात राहाल तर तुमची अवस्था पण तुमचा फंडिंग एजन्सी सारखी नक्कीच होईल.
                Reply
                1. R
                 ravindrak
                 Nov 28, 2016 at 4:41 am
                 हा लेख काँग्रेस, राष्ट्रवादी ,दलदल, डावे पक्ष आणि पुरोगामी यांच्यावर लिहिलेला आहे असा भास झाला.लेखाचा शेवट हि बरेच काही सांगणारा ( तुमची दुसरी बातमी आहे,कपिल सिब्बल/काँग्रेस यांच्या मता प्रमाणे नोटा बदलीचा त्रास फक्त मुसलमानांना झाला )
                 Reply
                 1. S
                  Swapnil
                  Nov 28, 2016 at 12:26 pm
                  संपूर्णपणे बदनामी करणारा लेख. लोकसत्तेला सीआयए कडून पैसे येतात अशी अफवा उठली तर लगेचच विश्वास बसेल. कॅस्ट्रो यांनीच गव्हेरा यांना संपवलं असा कटाक्ष आहे लेखात. रशिया कडून तेल मिळवणे क्युबाच्या दृष्टीने मुत्सद्देगिरी आहे. क्युबाची दरिद्री अवस्था सत्यच. पण लेख एकांगी आहे व तत्कालीन परिस्थितीचा विपर्यास केला आहे. एका उत्कृष्ट अग्रलेखाची संधी लोकसत्ताकारांनी गमावली.
                  Reply
                  1. S
                   Sachin
                   Nov 28, 2016 at 2:08 pm
                   साम्यवाद हि फसलेली विचारधारा म्हणून बऱ्याचदा सिद्ध झालेली आहे. तरीपण आपल्या इथे तिचे गोडवे गायिले जातात आणि जेएनयू सारखी सापांची बिळे तयार होतात. काळा बरोबर आपण बदलायला हवे हे जो पर्यंत लक्षात येत नाही तो पर्यंत कुठलाही राज्यकर्ता यशस्वी होऊ शकत नाही. कॅस्ट्रो यांच्या कारकिर्दी कडे बदघीतले तर हेच लक्षात येते. संपादकांनी दोन-चार खडे बोल आपल्या इथल्या कम्युनिस्टांना सुनवायला हवे होते.
                   Reply
                   1. S
                    Sanjiv Tannu
                    Dec 5, 2016 at 2:53 am
                    कॅस्ट्रोंपासून इतिहास नेहमीच स्फूर्ती घेईल. ते इतिहासाचे वीरपुत्र होते. पन्नास वर्षे टीचभर पाकिस्तानला धडा शिकविण्याची भाषा करणारे व त्यासाठी लाखो निरपराध्यांचे बळी घेणारे आमचे राज्यकर्ते कोठे? आणि बलाढ्य अमेरिकेला पन्नास वर्षे माती खायला लावणारे कॅस्ट्रो कोठे?मानव विकासाच्या बाबतीत १७७ देशांच्या यादीत क्युबा ५२ व्या स्थानावर आहे आणि विकासशील देशाच्या यादीत क्युबा ५ व्या स्थानावर आहे. क्युबाच्या लोकांचे सरासरी आयुष्य ७७.३ वर्षे, साक्षरता दर ९८ टक्के, बालमृत्यू दर प्रतिहजार बालकांमागे ३.
                    Reply
                    1. S
                     Sagar
                     Nov 28, 2016 at 4:12 pm
                     आज पर्यंत इतका खराब लेख लोकसत्ता वर वाचला नाही.
                     Reply
                     1. S
                      shekhar
                      Nov 30, 2016 at 10:06 am
                      पत्रकार उजवीकडचे असोत किंवा डावीकडचे. आपापल्या वर्तमानपत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा दावा करणाऱ्यांत नेहमीच अनेक साम्यस्थळे असतात. त्यांची शारीरिक क्षमता दांडगी असते. ते सलग २०-२० तास काम करू शकतात. अमोघ लिखाण हे अशांचे आणखी एक वैशिष्टय़. परिणामकारकता न गमावता हे सातत्याने, दिवसेंदिवस तेच तेच लिहू शकतात आणि त्यांच्या लिखाणावर वाचक विश्वास ठेवू शकतात. तसेच हे सगळे कथित पत्रकार आपल्या खासगी आयुष्याविषयी कमालीचे साशंक असतात आणि त्याची कधीही वाच्यता होणार नाही, याविषयी दक्ष असतात.
                      Reply
                      1. Load More Comments